व्यक्तिपूजा आणि भारतीय समाज – पार्श्वभूमी
कुणाला काय आवडेल? आणि कुणाला कशाचा तिटकारा वाटेल? सांगता येत नाही. कधी कधी तत्त्वांच्या आहारी (!) गेल्याने परिप्रेक्ष्य धूसर होऊन जातो. तसंच काहीसं मनाला वाटून गेलं जेव्हा काही मंडळींनी नरेंद्र मोदींच्या पुतळ्याला श्रद्धेने नमस्कार केला आणि काहींनी (जवळजवळ सगळ्यांनी) मनापासून या गोष्टीचा तिरस्कार केला. तिरस्कार किंवा निंदा करणाऱ्यांचे नेतृत्व खुद्द मोदी समर्थक करत होते. ज्याचे त्याचे विचार आहेत. पण तरीही माझ्या स्वभावाला अनुसरून मी या विरोधाला “का?” हा प्रश्न विचारलाच! त्यानंतर जे काही विचार मनात आले ते तुमच्यासमोर मांडत आहे.
का #१ : व्यक्तिपूजेला विरोध का?
अनेकांचा सूर हा “व्यक्तिपूजा चुकीची आहे” असा होता. मोदी जी आल्यापासून झालंय असं की भारत अनेक वर्षे काही ठराविक लोकांनाच नेते समजत होता असा साक्षात्कार, सोशल मीडिया वरील अनेकांना झाला. आणि मग ते जुन्या देवांची जागा नवीन देवांनी भरून काढण्यात (replace करण्यात) गर्क झाले. यात मोठ्या प्रमाणात यशही संपादन केले. राजकीय पक्ष आपापल्या परीने जेव्हा जमेल तेव्हा किंवा फायद्याचे असेल तेव्हा एकमेकांना “तुम्ही व्यक्तिपूजा करता, (म्हणून) तुम्हाला समाजाचे काहीही पडलेले नाही” असं म्हणून हिणवतात. त्यामुळे आपल्यावर हा आरोप लागू नये याची प्रत्येक नेता काळजी करतो. आणि नंतर त्यांचे समर्थक काळजी करतात.
का #२ : काळजी का?
व्यक्तिपूजेचा आरोप लागणार नाही याची काळजी करत असताना आपण सगळे विसरून गेलो की भारत एक “समाजवादी” देश आहे. समाजवादात खरं सांगायचं तर व्यक्तीला (Individual) आणि स्वतंत्र व्यक्तित्त्व (Individuality) यांना समाजापुढे गौण समजलं जातं. आपल्या शिक्षणपद्धतीवर समाजवादाचा प्रचंड पगडा असल्याने “समाजवादी नेते/लोक” सोडल्यास बाकी समाजाला मोठं मानायचं नाही हे सामान्यांच्या (आपल्या) रक्तात भिनलेलं आहे. थोडक्यात Exclusivity, अनन्यता. यातून, मी किंवा आम्ही (कोणाकडे किती सामर्थ्य आहे त्यावरून ठरवा) ज्यांना पूजनीय मानतो त्यांचीच पूजा झाली पाहिजे याचे बाळकडू मिळाले. थोडक्यात जोपर्यंत संपूर्ण शिक्षित-सभ्य-सुसंकृत इत्यादी इत्यादी समाजाला एखादी व्यक्ती पूजनीय वाटत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची पूजा वर्ज्य आहे. कारण “व्यक्तीपेक्षा समाज महत्त्वाचा आहे” या वाक्याला आपण संपूर्ण सत्य मानतो.
का #३ व्यक्तीपेक्षा समाज महत्त्वाचा आहे.. का?
या प्रश्नाच्या उत्तराचे मूळ, मला पाश्चात्य विचारपद्धती आणि धर्माच्या उत्पत्तीत दिसते. भारत अनेक कोटी देवांचा देश आहे पण गेल्या १००-१५० वर्षात बोटांवर मोजता येतील इतकेच देव असणाऱ्या विचारपद्धतींनी आपल्या समाजमनाचा ठाव घेतलेला आहे. “सगळे समान आहेत” या तत्त्वाचे देखील मूळ इथेच कुठेतरी सापडेल. म्हणूनच देव – देवतांना देखील सामान्य माणसासारखे कसे होते? हे दाखवण्याची, “समतोल” साधण्याची, मोठी चढाओढ सुरु असते. या असंतुलित, समानतेच्या भोवती गोवलेल्या पण अनेक कोटी देव देवतांवर असलेल्या श्रद्धेला धक्का न लागू देता समाजाला बांधण्याच्या जटिल प्रक्रियेतून भारतीय समाज गेला आहे, जात आहे. ही एक विचित्र कसरत आहे, कारण भारतीय संस्कृतीनुसार माणूस कशालाही/कोणालाही देवता मानू शकतो. थोडक्यात समाज भारतीय पण समाजमूल्ये परकीय!
का #४ व्यक्तीपेक्षा (खरंच दरवेळेस) समाज महत्त्वाचा आहे का?
या प्रश्नाचे उत्तर समानतेच्या मूल्यांना छेद देतो. मानवी इतिहासाचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की मानवी मूल्यांत, सामाजिक जाणिवांत क्रांती नेहमी एक व्यक्तीच घडवून आणते. आणि मग लोक, समाज त्यांचे अनुसरण करतात. मग महत्त्वाचा प्रश्न हा मनात येतो की ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या निकषांच्या आधारे समाजाच्या वर (पुढे) नाही का? प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे की खरंच या व्यक्ती क्रांतीची स्वप्ने बघणाऱ्या किंवा त्याचा विरोध करणाऱ्या समाजापेक्षा जास्त महत्त्वाच्या नाहीत का? आणि जर याचं उत्तर “हो” असेल तर सगळे समान कसे? मला माहित आहे तुमच्या मनात देखील अनेक उत्तरे येतील ज्यांचे पालुपद “समान म्हणजे तसं नाही तर, अमुक गोष्टीसाठी समान”. थोडक्यात समानतेचे देखील काही निकष असतातच. यातून व्यक्तीपेक्षा (खरंच दरवेळेस) समाज महत्त्वाचा आहे का? हा प्रश्न “आ” वासून समोर उभा राहतो.
सहज सुचलं म्हणून..
विरोधाभास असूनही समानतेचा अट्टाहास फोफावला किंवा लादला गेला की “ऍनिमल फार्म” होतं. कधी वेळ मिळाल्यास जॉर्ज ऑरवेल यांचे “ऍनिमल फार्म” हे पुस्तक नक्की वाचा.
का #५ मग व्यक्तिपूजेला विरोध का?
आधीच सांगतो मी व्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा समर्थक आहे फक्त जसे ते बाकीच्यांना मिळते तसे मलाही मिळाले पाहिजे! (जे आपल्या संवैधानिक देशात घडत नाही.. असो) जर भारतीय संस्कृती कोणालाही/कशालाही देवतेचा दर्जा देऊ शकण्याला मान्यता देते, काही व्यक्ती खरोखरंच समाजापेक्षा महत्वाच्या असतात, त्यांचे विचार- कर्तृत्त्व समाजाच्या पुढे असते, आणि समानतेचा डोलारा पण-परंतु आणि जर-तर वर उभा असेल तर, समजा कोणाला एखादी व्यक्ती पूजनीय वाटत असेल तर त्याचा विरोध का असावा? मला पूजनीय वाटणारी व्यक्ती कदाचित तुम्हाला वाटणार नाही म्हणून माझ्यासाठी पूजनीय असलेली व्यक्ती अ-पूजनीय कशी होऊ शकते?
आणि शेवटी
व्यक्तिरूपी माणसाच्या पूजेला विरोध असेल तर आपणा सर्वांना जवळजवळ सगळ्या पद्धती, पुतळे, सोहळे बंद करावे लागतील. आजकाल ज्यांना आपण देवाचा दर्जा दिलेला आहे त्या सगळ्या व्यक्ती “माणूस” होत्या. सर्व गुणदोषांनी युक्त माणूस! म्हणजे खरं तर त्यांची पूजा वर्ज्य असली पाहिजे. त्यांच्या आरत्या देखील वर्ज्य असल्या पाहिजेत. पण आपण ते करणार नाही कारण व्यक्तिपूजा चुकीची असली तरीही काही व्यक्तींना आपण पूजनीय मानलंच पाहिजे असा आपल्या (विचित्र) समाजाचा दंडक आहे. जॉर्ज ऑरवेल म्हणतात तसं “All men are equal. But, some men are more equal than others”.
माझं काम समाजाला दिशा दाखवण्याचं नाहीये, मी फक्त मला पडलेले प्रश्न आणि त्यांच्या अनुषंगाने मला दिसणाऱ्या विरोधाभासाला शब्दांत मांडत आहे. आपण जेव्हा सर्वव्यापी पावित्रा घेतो तेव्हा त्याची पडताळणी ऐतिहासिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून झाली पाहिजे इतकाच काय तो हेतू. बाकी आपापले विचार!
माझे विचार जाणून घ्यायचे असल्यास इथे पहा!