संभ्रम आणि व्याख्या

संभ्रम आणि व्याख्या

Spread the love

त्याला परीघ बनवायची हौस, तिला रेष मारण्याची खोड. शेवटी मी त्यांच्यासाठी अनुभवांचे टिंब काढून दिले आणि म्हणालो आता खेळा! असतात अशा काही प्रश्नकाहूर केविलवाण्या वेळा. त्याने पहिले पाऊल उचलले. पण पाऊल पडण्याआधी तिने सरळ काही टिंबांना छेद दिला. तो स्तिमित झाला पण खचून न जाता काही परीघ बनवू लागला. बघता बघता त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. ती मोठ्या त्वरेने प्रत्येक टिंबाला छेदायचा प्रयत्न करत राहिली आणि तो स्वतःच्या धुंदीत जास्तीत जास्त टिम्ब परिघात सामावून घेत होता. दोघांची ईर्षा टोकाला पोहोचली होती, ते द्वंद्व स्पर्धेच्या पुढे जाऊन पोहोचले होते. टिम्ब आपापले अस्तित्त्व सांभाळायचा करुण प्रयत्न करत होते. त्या दोघांच्या युद्धात माझ्या अनुभवांचे कण धुळीसारखे उडून जात होते. ते दोघे एकमेकांना रक्तबंबाळ करत होते. कोणीही मागे यायला तयार नव्हतं. क्षणाक्षणाला माझ्या संवेदना क्षीण होत होत्या. शेवटी ती सर्व शक्ती एकवटून त्याला छेदायला सरसावली, त्याने सगळ्यात मोठा परीघ जमवला. काही क्षण गर्भशान्तता पसरली. ती काळाच्या वेगाने जवळ येत होती, तो मृत्यूच्या रंगाने उग्र होत होता. ज्या क्षणी त्यांचा स्पर्ष झाला, सगळं काही स्तब्ध झालं, एका क्षणासाठी.. आणि मग विस्फोट. प्रचंड मोठा आणि सूक्ष्मदर्शी विस्फोट. जाणिवांचे अणुरेणू देखील उरले नाहीत, इतका तो आघात जबरदस्त होता! जाग आली तेव्हा नेणिवेच्या पोकळीत मी एकटाच उभा होतो, वर बघत. बघता बघता पायाखालचे अनुभवकण माझ्या आजूबाजूने वर जाऊ लागले, आणि त्या वरच्या छिद्रात जाऊन लुप्त होऊ लागले. मी हात पुढे केला तर ते कां हाताच्या कडेने निघून गेले, जणू ते मला टाळत होते. त्याचा किंवा तिचा कुठेही मागमूस नव्हता. सगळं काही संपलेलं होतं.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

2 thoughts on “संभ्रम आणि व्याख्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *