ठाकूर कुशाल सिंह राठोड
१८५७ चा उठाव म्हटलं की आपल्याला काही ठराविक नावेच आठवतात. आजच्या दिवसाचा म्हणजेच २१ ऑगस्ट चा इतिहास शोधताना एक पोस्ट दिसली. आणि लक्षात आलं की या वीराचे नाव देखील आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा ठाकूर कुशाल सिंह राठोड यांच्याबद्दल थोडी माहिती मिळवली. अर्थातच इतिहास मोठा विस्तृत असणार आहे. आगामी काळात आणखीन भर देखील घालेन. पण या ब्लॉग मध्ये ठाकूरजींच्या शौर्याचे वर्णन आणि माहिती तर देऊच शकतो.
ठाकूर कुशाल सिंह राठोड हे अउवा किंवा अउआ चे पिढीजात ठाकूर होते. जोधपूर संस्थान ब्रिटिशांना खालसा झालेलं होतं. ब्रिटिश राज ठाकूरजींना मुळीच पसंत नव्हतं. त्याची थिनगो तेव्हा पडली जेव्हा ब्रिटिशांनी अउवा च्या व्यापाऱ्यांना आणि महाजनांना फितवायचा प्रयत्न केला. ठाकूर कुशाल सिंह यांना आपल्या कारभारातली ही ढवळाढवळ अजिबात मान्य नव्हती. याची तक्रार करावी तर जोधपूर चे राजे मांडलिक झालेले! अशा वेळेस काय करावं या विचारात ठाकूरजी होते. त्याच काळात मीरत येथे ब्रिटिश शिपायांनी उठाव केला, मग या सशस्त्र उठावाची मशाल नासिराबाद, नीमुच, अजमेर करता करता माउंट अबू जवळील एरिनपुरा पर्यंत येऊन पोहोचली. एरिनपुरा मधीं ब्रिटिश शिपायांनी देखील ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला. यात अनेक ब्रिटिश अधिकारी मारले गेले. येथील स्वातंत्र्यसेनानींना आजूबाजूच्या जहागीरदारांनी देखील साथ दिली. त्यांच्यापैकी एक ठाकूर कुशाल सिंह देखील होते.
जोधपूर राज्यातील जनता आकृष्ट होती आणि खाकी साधू दारोदारी जाऊन त्यांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढायला प्रेरित करत होते. या संधीचा फायदा ठाकूरजींनी घ्यायचा ठरवला आणि दिल्लीपर्यंत जाऊन ब्रिटिश सत्तेला उखडून टाकण्याचा प्रयत्न सुरु केला. या संग्रामात त्यांना असोप, अलनीयवास, गुलर, रुपनगर, सालूंबर, बजवा येथील जहागीरदारांनी साथ दिली. असे म्हणतात की आजच्या दिवशी म्हणजे २१ ऑगस्ट १८५७ त्यांनी दिल्लीकडे “चलो दिल्ली मारो फिरंगी” चा नारा देत कूच करायला सुरुवात केली.
बिथोडा चे युद्ध
ठाकूर कुशाल सिंह राठोड यांच्या या संग्रामाला पहिला अवरोध जोधपूर राज्याकडूनच झाला. ब्रिटिश गव्हर्नर जनरल चा राजपुतानाचा अधिकारी जनरल लॉरेंस याने जोधपूरच्या राजांना या स्वातंत्र्यसेनांनीना नमवायला सैन्य पाठवायचा हुकूम दिला. (हे लिहिताना सुद्धा वाईट वाटत आहे की परदेशी लोक आपल्या राजांना हुकूम सोडत होते! असो..) पण जोधपूर राज्यात ब्रिटिशांविरुद्ध असलेला राग राज्याच्या सेनेत सुद्धा होता. त्यामुळे जोधपूरचे सैन्याने प्रखरपणे युद्ध केले नाही. अर्थातच त्यांचा पाडाव झाला.
जनरल लॉरेंस ने पुन्हा एकदा ठाकूर कुशाल सिंह राठोड यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यासाठी सैन्य पाठवले. यावेळेस त्याने लेफ्टनंट हिथकोट याच्या नेतृत्वाखाली जवळपास ३०००० सैन्य पाठवले असे म्हणतात. दोन सैन्यांचे बिथोडा येथे आमने सामने झाले. भीषण युद्ध झाले ज्यात ब्रिटिश सैन्य सपशेल पराभूत झाले. लेफ्टनंट हिथकोट पळून गेला. हा पराभव जनरल लॉरेंस च्या जिव्हारी लागला.
चेलवा चे युद्ध
बिथोडा येथे पाडाव झाल्यावर अर्थातच ब्रिटिश स्वस्थ बसणार नव्हते. जनरल लॉरेंस याने हा पराभव मनाला लागून घेतला आणि ठाकूर कुशाल सिंह राठोड यांचा पाडाव करण्यासाठी नासिराबाद वरून आणखीन सैन्य बोलावून घेतले. आणि स्वतः सामील होऊन अउवा वर हल्ला केला. यात त्याच्याबरोबर जोधपूर येथील ब्रिटिशांचा राजकीय हस्तक कॅप्टन मॉंक मेसन सुद्धा होता. त्यांनी अउवा च्या किल्ल्याला वेढा दिला. ठाकूर कुशाल सिंह राठोड यांचे सैन्य अउवा च्या किल्ल्यातून निसटले आणि हे युद्ध अखेर चेलवा येथे झाले.
याही युद्धात ब्रिटिशांना पराभूत व्हावे लागले. चेलवाच्या युद्धात कॅप्टन मॉंक मेसन मारला गेला. त्याचे धडाहून वेगळे केलेले शीर अउवा च्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारात टांगले गेले. यामुळे जनरल लौरेन्स आणखीनच क्षुब्ध झाला.
पण अखेर ऑक्टोबर १८५७ ब्रिटिशांनी पुन्हा एकदा ३० हजाराचे सैन्य घेऊन अउवा वर हल्ला चढवला. सतत होणाऱ्या युद्धांमुळे आणि दिल्लीकडे कूच करताना येणाऱ्या अडचणींमुळे ठाकूर कुशाल सिंह राठोड यांचे सैन्यबळ क्षीण झालेले होते. याचा फायदा ब्रिटिशांनी उठवला. आणि अखेर ५ दिवस युद्ध केल्यानंतर त्यांचा पाडाव झाला व अउवा पूर्णपणे ब्रिटिशांच्या स्वाधीन झाले.
ठाकूरजींच्या शौर्याचे वर्णन “बनिये वाली गोचर” या राजस्थानी लोकगीतात (राजस्थानी पोवाडा) उत्तमरित्या केलेले आहे.
आपल्याला ठाकूरजींचे देखील स्मरण राहो म्हणून हा खटाटोप. आधी म्हटल्याप्रमाणे ठाकूरजींबद्दल अजून बरंच काही वाचायचं आहे. पण तूर्तास इथेच थांबतो. शब्दयात्रीवरील इतिहासविषयक ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
धन्यवाद!! सुंदर लेख