मुंबईचा इतिहास अगदी मौर्यकाळापर्यंत जातो. पण अर्वाचीन इतिहासाचा विचार केल्यास मुंबईवर शेवटचे राज्य करणारे इंग्रज, हेच बऱ्याच जणांना माहित आहे. पण ही मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आली कशी? हे फार लोकांना माहित नाही. जवळजवळ संबंध भारतात इंग्रजांनी राज्य बळकावण्यासाठी बरीच युद्ध केली आणि बऱ्याचदा दोन राज्यांमध्ये युद्ध भडकवली देखील. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुंबई इंग्रजांना कुठलेही युद्ध न करता मिळाली.. हुंडा म्हणून!
तर झालं असं की साधारण १५३४ च्या दरम्यान पोर्तुगीजांनी मुंबईवर ताबा मिळवला आणि तेव्हापासून मुंबईवर पोर्तुगीजांचे राज्य होते. मुंबई पहिल्यापासून सागरी वाहतूक आणि व्यापार यांच्यासाठी प्रसिद्ध. मुंबईतून मुख्यतः रेशीम, उंची कपडे, दागिने, हस्तिदंत, कापूस, तांदूळ आणि मौल्यवान खडे इत्यादींचा व्यापार होत असे. सुरुवातीला इथे मुख्यतः फक्त कोळ्यांच्या वस्त्या होत्या. पण जसजसा व्यापार वाढू लागला, सुबत्ता आली तसतसे परकीय लोक आपलं बस्तान मुंबईत बांधू लागले, मोठ्या गढ्या, किल्ले आणि इमारती उभ्या राहू लागल्या. माणसांची, व्यापाऱ्यांची आणि वस्तूंची रेलचेल सुरु झाली.
आता मुंबई ला मुंबई हे नाव मुंबादेवी मुले मिळाले हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण कैक वर्षे मुंबईला लोक बॉम्बे म्हणत असत. काही जुनी मंडळी आजही चटकन बॉम्बे म्हणतात. असो तो भाग निराळा! खरं तर बॉम्बे हा देखील बॉम-बैम (Bombaim) म्हणजे पोर्तुगीज भाषेत छानशी (सुंदर) छोटी खाडी.
पोर्तुगीज आज असते तर हेच नाव दिले असते का? हा प्रश्न इथे गौण आहे!


तर झालं असं की, १६६१ मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स द्वितीय आणि पोर्तुगल राजकन्या कॅथरीन यांचा विवाह करायचं ठरलं. राजकीय कारणांसाठी विवाह होत असल्याने अनेक राज्यांची या विवाहाला आपापल्या सामरिक कारणांसाठी नापसंती होती. पण अखेर विवाह करायचे ठरले. त्या विवाहाचा हुंडा म्हणून मुंबई ची सातही बेटे चार्ल्स द्वितीय म्हणजेच इंग्लंडला द्यायचं ठरलं. २३ जून १६६१ ला हुंड्याचा करार झाला आणि ३ जुलैला मुंबई चार्ल्स द्वितीयच्या ताब्यात आली आणि मुंबई इंग्रजांना हुंड्यात मिळाली!

मग जवळजवळ एक वर्षाने म्हणजे २१-२२ मे १६६२ साली त्यांचा विवाह संपन्न झाला. पुढे १६६८ मध्ये चार्ल्स द्वितीयने, मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक १० गिनीस ने भाड्याने दिली. तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी आपला कारभार सुरतेहून चालवत होते.

म्हणजे एक गोष्ट तर लक्षात येते की हुंडा देणे घेणे हे फक्त भारतातच होतं असे नाही! असो..
जाताजाता या हुंड्यात चार्ल्स द्वितीयला नक्की कायकाय मिळालं याची यादी देतो म्हणजे हा हुंडा नक्की किती होता याचा तुम्हाला अंदाज येईल.
- तंगीर, उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोजवळचे प्रमुख बंदर
- मुंबईची सात बेटे
- ब्राझील आणि ईस्ट इंडिया मधील व्यापारात भागीदारी
- पोर्तुगलमध्ये व्यापाराची सूट
- वीस लाख पोर्तुगीज क्राऊन्स (त्या काळचे ३ लाख पौंड)
यांच्या बदल्यात पोर्तुगलला
- स्पेनविरुद्ध इंग्लंडची सामरिक मदत आणि
- कॅथेरीनला पुजायची परवानगी (म्हणजे नक्की काय? याचा आणखीन शोध घेतोय. पण पूर्वी चर्चचे सामर्थ्य अधिक होते त्यामुळे, पोप आणि सेंट सोडून कुणाची पूजा किंवा अर्चना करणं वर्ज्य होतं, त्यांची देवीच्या वेशात प्रतिमा बनवणं धर्मबाह्य होतं)