२२ जुलै १७६० .. श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे दिल्लीत दाखल झाले, तीन दिवसात दिल्ली काबीज झाली आणि काहीच दिवसांनी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भगवा फडकला!
पार्श्वभूमी
१७५९-६० चा काळ होता. रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा भगवा अटकेपार फडकला होता. मराठ्यांचे साम्राज्य आपल्या शिखरावर होते. दिल्ली, पंजाब, वायव्य सरहद्दचा मुलुख मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. अटक पासून बंगालपर्यंत मराठ्यांचे साम्राज्य पसरले होते. अर्थातच अफगाणी, अहमद शाह अब्दाली आणि उत्तर भारतातल्या काही सरदारांना-उमरावांना भगव्याचा विस्तार सलत होता. पण, कुणातही भगव्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत नव्हती. पेशव्यांची मुत्सद्देगिरीयुक्त वीरता आणि मराठा साम्राज्यातील सरदारांचे सामर्थ्य यांच्यापुढे त्यांचा टिकाव नव्हता.
अहमद शाह अब्दालीने स्थानिक सरदार आणि वतनदारांना, पेशव्यांना दिल्या जाणाऱ्या चौथाई आणि सरदेशमुखीवरून भडकवण्याचा प्रयत्न केला. त्याला साथ दिली सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या नजीब उद्दौला रोहिलाने. संपूर्ण वेळ नजीब उद्दौलाने मराठ्यांशी सलोखा असल्याचे भासवले पण नजरेआड तो मदत करत होता अहमद शाह अब्दालीला.
झालं असं की, १७५६ च्या काळात अफगाणी अहमद शाह अब्दालीने पंजाब आणि जाट प्रांतात मोठा धुमाकूळ घालून दिल्ली काबीज केली तेव्हा, त्याने इमाद उल मुल्क ला वजीर राहू दिले पण आपला दबदबा कायम राखण्यासाठी, नजीब उद्दौला ला दिल्लीत मीरबक्षी बनवले.
१९५७ च्या काळात अहमद शाह अब्दालीने उत्तर भारतावर पुन्हा एकदा आक्रमण केले. यावेळी त्याने वायव्य सरहद्द, पंजाब, काश्मीर, दिल्ली काबीज केलं. त्याचे हात वृंदावन आणि मथुरा पर्यंत जाऊन पोहोचले. मुघल राजाने मराठ्यांकडे मदत मागितली. पण ती अफगाणी सैन्यापुढे तोकडी होती. मराठा सरदार अंताजी माणकेश्वर आणि ३४०० मराठा सैन्य या युद्धात कामी आले. अहमद शाह अब्दालीने उत्तर भारतावर केलेला हा हल्ला इतका भीषण होता, की ज्यांचा प्राण वाचला त्यांच्या म्हणण्यानुसार कैक दिवस यमुनेचे पाणी रक्तामुळे लाल दिसत होते. वृंदावनाचा नरसंहार इतका भीषण होता की, यमुनेत वाहणाऱ्या मृत शरीरांमुळे कैक ठिकाणी पाणी अडकले होते आणि त्यामुळे खालच्या पट्ट्यात रोगराई पसरून, अफगाणी सैन्याचे १५० सैनिक रोज कॉलराने मरत होते.
मराठ्यांची अटकेपर्यंत धडक
नानासाहेब पेशव्यांनी अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी रघुनाथराव पेशव्यांना पाठवले पण तोपर्यंत अब्दाली निघून गेलेला होता. मराठ्यांनी पुन्हा एकदा दिल्ली, दोआब आणि मीरत काबीज केले. पेशव्यांनी नजीब उद्दौलाला बडतर्फ केले. १७५८ पर्यंत पेशव्यांच्या नेतृत्वाखाली अटकपर्यंत मराठ्यांचा भगवा फडकू लागला. उत्तर भारतातील व्यवस्था लावून रघुनाथराव पेशवे पुण्यात परतले.
नजीब उद्दौलाला हे सलत होतं पण त्याचा निरुपाय होता. त्याच्या मनात मराठ्यांना नामावण्याची ईर्षा तर होतीच. तो फक्त वाट बघत होता योग्य वेळेची. अर्थातच त्याचे अहमस शाह अब्दालीशी संबंध चांगले होते. पण वारंवार मराठ्यांशी सलोखा असल्याचे भासवण्याखेरीज त्याच्याकडे गत्यंतर देखील नव्हते. मराठ्यांनी आणि खासकरून पेशव्यांनी नजीब उद्दौलाला जिवंत का सोडले? असे अनेक इतिहासकार आणि जाणकार प्रश्न विचारतात. याचे उत्तर वाचकांनी शोधावे आणि आपापले मत बनवावे.
तर १७५९ च्या काळात पुन्हा एकदा एखाद्या संधीसाधू कोल्ह्याप्रमाणे नजीब उद्दौलाने अहमद शाह अब्दालीला पाचारण केले. त्याला ५०००० रुपये दिवसाचे आणि इतर लुटीचे आमिष दाखवून मराठयांविरुद्ध धर्मयुद्ध करायला बोलावले. अहमद शाह अब्दालीला देखील मराठ्यांचे वर्चस्व खपत नव्हते. अर्थात माझ्या मतानुसार धर्मयुद्ध हे नुसते छद्मावरण होते. खरं तर ही सत्तेची लढाई होती कारण मुसलमान सैन्य तर मराठ्यांच्या बाजूने देखील लढत होते.
डिसेंबर १९५९ ला अहमद शाह अब्दाली मराठ्यांनी काबीज केलेला प्रांत पुन्हा जिंकत, भयंकर नरससंहार करत पुन्हा एकदा दिल्लीच्या जवळ येऊन धडकला. २४ डिसेंबर १७५९ रोजी झालेल्या लढाईत मराठा साम्राज्याचे मातब्बर सरदार दत्ताजी शिंदे यांचा बरारी (बुराडी/बराडी) घाटावरील युद्धात मृत्यू झाला. जानेवारी १७६० पर्यंत अब्दालीने यमुनेला पार केलेले होते आणि त्याने दिल्लीत लुटीचे आणि हत्त्यांचे सत्र सुरू केले.
मराठ्यांची दिल्ली स्वारी आणि सदाशिवराव भाऊ
दत्ताजी शिंदेंसारख्या मातब्बर सरदारांच्या मृत्युने नानासाहेब पेशवे चिंताक्रांत झाले. त्या काळापर्यंत उत्तर भारतात मराठा साम्राज्याला इतका मोठा धक्का बसला नव्हता. शेवटी या अहमद शाह अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी आपले चुलत भाऊ, सदाशिवराव भाऊ आणि पुत्र विश्वासराव पेशवे यांना उत्तरेला धाडले.
सदाशिवराव भाऊंनी नुकतेच फेब्रुवारी १७६० मध्ये उदगीरच्या लढाईत बलाढ्य निजामाचा सपशेल पराभव केला होता आणि दौलताबादचा किल्ला पुन्हा एकदा मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणला. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांचा विश्वास अधिक बळावला. त्या काळात तरी पेशव्यांच्या सैन्याला तोंड देणं फारसं कुणाला शक्य नव्हतं. १४ मार्च १७६० ला सदाशिवराव भाऊंनी उत्तरेकडे कूच केली. त्यांच्याबरोबर नाना फडणीस, मेहेंदळे, पुरंदरे आणि दामाजी गायकवाड हे सरदार देखील होते.
उत्तर भारतातील सर्वात श्रीमंत राज्यकर्ता शुजा उद्दौलाचा अफगाणी अहमद शाह अब्दालीला सामरिक आणि आर्थिक पाठिंबा होता. त्या खालोखाल भारतपूरचा जाट राजा सुरजमल. मराठ्यांच्या विरोधात नसला तरीही मराठ्यांना मदत देखील करण्यास तयार नव्हता (चौथाई, सरदेशमुखी प्रकरण!), राजपूत राजांनी देखील मराठ्यांकडे पाठ फिरवली कारण ते अहमद शाह अब्दालीशी वैर करण्याला तयार नव्हते.
असं म्हणतात की सदाशिवराव भाऊंचं दिल्लीला येणं म्हणजे जाट राज्यकर्त्यांना त्यांच्या अधिपत्याचा अंत वाटत होता. त्यांनी काही मराठा सरदारांना लाच देऊ पहिली असं म्हणतात. पुन्हा एकदा, वाचकांनी अभ्यास करावा आणि आपले मत बनवावे. वर पेशवे कदाचित शुजा उद्दौलाला दिल्लीचा वजीर बनवतील या भीतीने सुरजमलने मराठ्यांना मदत केली नाही.
..आणि दिल्लीच्या लालकिल्यावर भगवा फडकला
२२ जुलै १७६० रोजी, सदाशिवराव भाऊ प्रचंड फौजेसह दिल्लीजवळ येऊन पोहोचले. तोपर्यंत अहमद शाह अब्दाली, दिल्लीत थोडे फार सैन्य ठेऊन पुन्हा एकदा निघून गेलेला होता. नजीब उद्दौला रोहिलाने देखील पळ काढला होता.
मराठ्यांनी याआधीही दिल्लीला नमवले होते पण यावेळी पहिल्यांदाच दिल्लीची संपूर्ण सत्ता काबीज केली. सदाशिवराव भाऊंना मुघलांच्या या बुरुजाला पाडणं अवघड गेलं नाही आणि तीन दिवसांतच पेशव्यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि दिल्लीच्या लालकिल्ल्यावर पहिल्यांदाच भगवा फडकला!
मनोगत:
मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासात पेशव्यांच्या शौर्याचा वाटा कोणीही नाकारू शकत नाही. कोणीही कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरीही पेशव्यांच्या स्वामीनिष्ठेवर बोट ठेवले जाऊ शकत नाही. अर्थात, सध्या पेशव्यांवर लांच्छन लावणे हा काही लोकांचा आवडता उद्योग बनलेला आहे. त्यामागची मानसिकता आणि राजकारण सगळ्यांना ठाऊक आहे. पण, जमेची बाजू अशी की कोणीही कितीही प्रयत्न केला तरीही इतिहास बदलू शकत नाही! असो..
माहिती स्रोत:
- https://www.historyfiles.co.uk/FeaturesFarEast/India_Modern_Peshwas04.htm
- https://www.theweek.in/news/india/2020/01/14/remembering-panipat-blackest-day-in-indian-history-and-what-we-can-learn-from-it.html
- The State at War in South Asia by Pradeep Barua
One thought on “.. आणि दिल्लीच्या लालकिल्यावर भगवा फडकला”