Olympe de Gouges पूर्वेतिहास
“क्रांती” शब्द ऐकलं की सगळ्यांना काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करणे हा एकच अर्थ माहित आहे. पण प्रत्येक वेळेस ही क्रांती चांगलंच करेल असे नाही. Olympe de Gouges (ओलांप द गुज) एक असे नाव, एक असा इतिहास, ज्याबद्दल फक्त इतिहासकारच नव्हे तर स्त्रीवादी कार्यकर्ते सुद्धा विसरून गेलेले आहेत. आधुनिक स्त्रीवादाचा पाया रचणारी क्रांतिकारी लेखिका, नाटककार Olympe de Gouges शेवटी तिने स्वतःच भाग घेतलेल्या सत्तांध क्रांतीचा बळी ठरली. लोकांच्या हक्कांसाठी उभी राहिलेली क्रांती भस्मासूर झाली ते समजलंच नाही. समाजस्वास्थ्याबद्दल चिंता असणाऱ्या सगळ्यांना तिची गोष्ट विचार करायला लावणारी आहे.
Olympe de Gouges च्या जन्माबद्दल काही आख्यायिका आहेत. जन्माचे नाव Marie. तिच्या आईचे नाव Anne Olympe Mouisset Gouze आणि वडिलांचे नाव Pierre Gouze. पण, तिचे जैविकदृष्ट्या वडील Jean-Jacques Le Franc आहेत असं संशोधक सांगतात. १६व्या वर्षी Louis-Yves Aubry यांच्याशी लग्न झाले आणि मुलगा झाला. पती निवर्तल्यावर त्यांनी आपले नाव Olympe de Gouges केले, पॅरिस येथे आल्या आणि यापुढे लग्न करणार नाही अशी मनोमन प्रतिज्ञा केली. सुरुवातीला Jacques Biétrix de Roziéres नावाच्या धनवान व्यापारीच्या मदतीने बौद्धिक आणि वैचारिक अभ्यास केला. पुढे जाऊन स्वतः लेखन करून लोकांपुढे आपली मते पुस्तक, कथा, कविता आणि नाटक यांच्याद्वारे मांडू लागल्या.
Olympe de Gouges यांचे लेखनकार्य आणि विचारप्रणाली
साल १७८९, फ्रेंच संविधानाच्या प्रस्तावनेत Declaration of the Rights of Man and of the Citizen (Déclaration des Droits de l’Homme et du Citoyen चा समावेश करण्यात आला. या उद्घोषात आधुनिक लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या संकल्पनांची बीजे रोवलेली आहेत.
याला प्रत्युत्तर म्हणून Olympe de Gouges यांनी Déclaration des droits de la femme et de la citoyenne (“Declaration of the Rights of Woman and of the Female Citizen”) नावाचे पत्रक छापले. या पत्रकात महिलांना देखील सामान हक्क आणि अधिकार असले पाहिजेत याचा आग्रह धरला होता. त्याचप्रमाणे वडिलोपार्जित संपत्तीत केवळ औरसच नव्हे तर अनौरस संततींना देखील सामान हक्क मिळावा असा प्रस्ताव मांडला. त्याकाळी हा विचार अत्यंत क्रांतिकारी होता. विशेष म्हणजे त्यांनी हा उद्घोष / पत्रक फ्रांस ची राणी Queen Marie Antoinette यांना समर्पित केला! त्याच Queen Marie Antoinette ज्यांच्यावर क्रांतिकारक आणि इतिहासकार देखील ठपका ठेवतात!
Olympe de Gouges यांनी स्वास्थ्य संस्था आणि प्रणाली, रस्ता सुधार, प्रसूती रुग्णालय, अविवाहित माता, अनाथ आणि अनौरस मुले, घटस्फोट, गुलामगिरी इत्यादी विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी L’Esclavage des noirs (“Slavery of Blacks”) हे नाटक लिहिले आहे ज्यात कृष्णवर्णियांची गुलामगिरी आणि अवस्था यावर भाष्य केले आहे.
प्रभावी लेखन आणि क्रांतिकारी विचार यांच्यामुळे आपसूकच त्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिशेने खेचल्या गेल्या. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सहभाग घेणाऱ्या Girondin गटात सामील झाल्या. अतिवादी क्रांतिकारकांच्या मते हा गट मवाळ होता. पण इतिहासाचा विचार केला तर Girondin मंडळी हिंसेसाठी हिंसेच्या विरोधात होती, कायदेशीर मार्गाचा अवलंब करणारी होती, अन्यायाविरुद्ध चळवळ उभी करणारी आणि आपल्या वक्तृत्वाने लोकांना एकत्र करणारी होती. त्यांनी क्रांती-पूर्व काळात फ्रेंच न्यायालयावर टीका केली होती. १७९२ दरम्यान त्यांना फ्रेंच सरकारमध्ये देखील सामील व्हायला मिळाले. थोडक्यात Girondin क्रांतिकारी विचारांचे पण संवैधानिक मार्गाने जाणारे क्रांतिकारक होते.
“फ्रेंच राज्यक्रांती” आणि हत्यासत्र
१७९३ मध्ये “राज्यक्रांती” घडवण्याच्या उद्देशाने अनेक राजकीय आणि वैचारिक गट एकत्र आले त्यात Girondin सुद्धा होते. पुढे क्रांती झाली. क्रांतिकारकांनी राजसत्तेला उधळून लावलं. क्रांतिकारकांच्या मते, ज्यांनी फ्रेंच राजघराणे, त्यांचे समर्थक, थोडक्यात लोकांचे दमन केले होते त्यांनी जिवंत राहणे योग्य नव्हते. त्यामुळे क्रांतिकारकांनी सरसकट सगळ्यांना फासावर चढवण्याचे सत्र सुरु केले. हजारो स्त्री पुरुषांचे कोणताही खटला न चालवता सार्वजनिकरित्या शिरच्छेद केले गेले. आज हे वाचताना विचित्र वाटेल पण लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी पूर्वीपासून ही पद्धत अवलंबली गेली आहे. तुर्क, मुघल, अफगाणी, मंगोल आक्रमणकर्त्यांनी हेच केलेलं आहे! असो..
पण या हत्यासत्राचा परिणाम असा झाला की लोकांच्या हक्कांसाठी सुरु झालेली ही क्रांती नरबळी मागणारा एक सत्तांध आणि उन्मत्त राक्षस बनला. असा राक्षस ज्याची भूक काही केल्या शमत नव्हती. ज्याच्याबद्दल किंचितशी देखील शंका येत होती त्यांना सरळ फाशी बखळीवर नेऊन शिरच्छेद केला जात होता. याचा परिणाम असा झाला की न्याय आणि सत्य यांच्याशी फारकत होऊन हा क्रांतीचा राक्षस आपल्याविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला आपला शत्रू मानून त्याचा बळी मागू लागला. लोक घाबरू लागले. क्रांतिकारकांच्या विचारांशी असहमती दर्शवणे म्हणजे मृत्यूशी गाठ! किती मोठा विरोधाभास आणि उपहास आहे हा!!
या दहशतीच्या वातावरणात सामान्य लोकांना श्वास घेणे देखील कठीण होऊ लागले. कुठलीही व्यवस्था किंवा चळवळ जेव्हा आततायी आणि अतिवादी बनते तेव्हा तिची दिशा चुकते. तिला प्रत्येक विरोधी आवाज थोपवण्याची गरज निर्माण होते. तेच फ्रेंच राज्यक्रांतीची झाले.
Olympe de Gouges यांचा विरोध
क्रांतीच्या नावाखाली दिले जाणारे बळी आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या मनातील दहशत बघून Olympe de Gouges यांनी १७९३ च्या सुरुवातीच्या काळात Les Trois urnes, ou le Salut de la Patrie, par un voyageur aérien (“The Three Urns, or the Salvation of the Fatherland, by an Aerial Traveller”) लिहिले जे अखेर त्यांच्या अटकेचे कारण बनले.
कारण या पत्रकात त्यांनी राज्यक्रांती दरम्यान सुरु असलेल्या अमानुष कत्तलीचा विरोध केला. या रक्तरंजित क्रांतीने लोक घाबरत आहेत, त्यांच्या विचारस्वातंत्र्याचे हनन होत आहे. त्यांच्यात दहशत पसरत आहे असे त्यांचे म्हणणे होते. केवळ वैचारिक विरोध केल्याने मृत्युदंडाची शिक्षा अमानुष आहे असे त्यांचे मत होते. त्यांच्या पत्रकातील काही मजकूर आणि त्याचा अनुवाद खालीलप्रमाणे..
अर्थातच राज्यक्रांतीच्या त्वेषाने पेटलेल्या आणि रक्ताला चटावलेल्या लोकांना हे पत्रक आवडले नाही, हे विचार आवडले नाहीत! लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सरसावलेल्या लोकांना विचारस्वातंत्र्य पटले नाही! आहे की नाही विरोधाभास!? असो क्रांतीकारकांना जी गोष्ट मुळीच आवडली नाही ती म्हणजे या पत्रकात Olympe de Gouges, लोकांना प्रजासत्ताक (Republic), संघराज्य (Fedaralist) किंवा घटनात्मक राजेशाही (Constitutional monarchy) यांच्यापैकी कुठलीही शासनव्यवस्था निवडण्याचे स्वातंत्र्य देण्याचा विचार मांडला होता. फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान क्रांतिकारकांनी लादलेल्या नियमानुसार “कोणत्याही प्रकारे राजेशाहीला पुनःप्रस्थापित करण्याच्या विचार” म्हणजे मृत्युदंडाचे कारण होते.
क्रांतीच्या वणव्याचा बळी
अर्थातच या पत्रकामुळे Olympe de Gouges यांना अटक झाली. क्रांतिकारांच्या पोलीस हस्तकांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना काहीच पुरावा मिळाला नाही. तेव्हा त्यांनी स्वतःहून या पोलिसांना (?) एका खोलीत नेले जिथे त्यांचे लिखाण ठेवलेले होते. ज्यात त्यांना एका नाटकाची (La France Sauvée ou le Tyran Détroné “France Preserved, or The Tyrant Dethroned”) संहिता मिळाली. ज्याच्या पहिल्या अंकात राणी Marie-Antoinette क्रांतिकारकणाच्या विरोधात जमावबंदी करत आहे, योजना आखत आहे असे दाखवले होते. अंकाच्या शेवटी Gouges राणीला आपल्या लोकांना कसे वागवावे आणि राजसत्ता कशी चालवावी याबद्दल सुचवते. या प्रसंगामुळे राणीबद्दल सहानुभूती निर्माण होईल असा पोलिसांचा निष्कर्ष होता. Gouges विरुद्ध चालेल्या खटल्यात या नाटकाचा आधार घेऊन राणीबद्दल सहानुभूती गोळा करण्याचा डाव मंडळाचा आरोप करण्यात आला. तिला वकील द्यायचे नाकारले. शेवटी तीन महिने कारावास झाल्यानंतर ३ नोव्हेंबर १७९३ साली तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. द्रोहाच्या आणि राजेशाही स्थापन करण्याचा डाव रचणे या आरोपांखाली शिरच्छेद करण्यात आला.
आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी तिने आपल्या मुलाला एक पात्र लिहिले त्यात लिहिले होते,
ज्या क्रांतीत आपण हिरीरीने सहभाग घेतला त्याच क्रांतीने आपला असा बळी घ्यावा, हा विचार मनाला चटका लावून जाणारा आहे! एक लेखिका, स्वतंत्र विचारांची भोक्ती आणि नाटककार Olympe de Gouges तिनेच झोकून दिलेल्या क्रांतीच्या वणव्याचा बळी झाली..
ही फ्रेंच राज्यक्रांती खरंच कुठली क्रांती होती की नुसताच सत्तांध लोकांनी केलेला मृत्यूचा तांडव होता?