शिवप्रताप दिन – कृष्णाजी भास्कर – इतिहास काय सांगतो?

शिवप्रताप दिन – कृष्णाजी भास्कर – इतिहास काय सांगतो?

Spread the love

१० नोव्हेंबर हा संबंध भारतात शिवप्रताप दिन म्हणून मानला जातो. या दिवशी १६५९ साली समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर साक्षात प्रभू श्री रामाचे अवतार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान नावाच्या राक्षसाचा वध केला. या घटनेचे वर्णन, जिवा महाला (महाले) यांचे शौर्य, अफझल खानाचे शीर धडावेगळे करणारे संभाजी कावजी, सय्यद बंडा (बंदा) चे वार इत्यादी इत्यादी. या सगळ्यांच्या जोडीला आणखीन एका व्यक्तीचा वारंवार उल्लेख केलेला दिसतो. टीव्ही असो, सोशल मीडिया असो व राजकीय मंच असो या घटनेचा उल्लेख आपापल्या स्वार्थासाठी केलाच जातो. ती व्यक्ती म्हणजे कृष्णाजी भास्कर! कोणाला महाराष्ट्राचा इतिहास माहित असो व नसो सगळ्या सोशल मीडिया वरील इतिहास वीरांना आपली कटुतेची दुकाने चालवण्यासाठी अनाजी पंत आणि कृष्णाजी भास्कर या दोन व्यक्तींची नावे तोंडपाठ असतातच.

जवळजवळ सर्व इतिहासाच्या, अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये, सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये शिवप्रताप दिनी कृष्णाजी भास्कर यांना शिवाजी महाराजांनी कसे मारले याचे रीतसर वर्णन केलेले दिसते. या सगळ्यांचा निष्कर्ष खालीलप्रमाणे

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफझल खानाचा वकील होता. त्याने शिवाजी महाराजांवर तलवार उचलली. महाराजांनी तो वर परतवून लावला आणि म्हणाले की “आम्ही स्त्रिया आणि ब्राह्मण यांच्यावर शस्त्र उचलत नाही.” आणि तरीही कृष्णाजी भास्कर वर करण्यासाठी चालून आले तेव्हा शिवाजी महाराजांनी नाईलाजाने त्यांचा वध केला.

कुठे कुठे या कथेत किंचित फरक आढळतो पण ढोबळमानाने हाच इतिहास जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध आहे की अफझल खानाचा वकील एक ब्राह्मण होता, त्याने शिवाजी महाराजांवर शस्त्र चालवले आणि त्याला ठार करण्यात आले.

मला देखील हाच इतिहास माहित होता.

पण..

ट्विटर वरील चर्चेत अन्नछत्रे आणि हिंदू इतिहास यांच्याविषयी चर्चा झाली त्यातवासुदेव कृष्ण भावे लिखित “शिवराज्य व शिवकाल” या पुस्तकातील एक दाखला दिला.

आणि याच पुस्तकात शिवकाळात धर्म आणि अन्नछत्रे यांच्यासंबंधी माहिती शोधत असताना निंब गावातील मठाला खर्च भागवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या तर्फे इनाम म्हणून काही जमीन दिल्याचा उल्लेख सापडला.

कृष्णाजी भास्कर
शिवराज्य व शिवकाल मध्ये कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख

या उल्लेखाची शहानिशा झालीच पाहिजे या उद्देशाने आणखीन संशोधन केले. अखेर तो “शिवकालीन पत्र सार संग्रह खंड – २” पृष्ठ क्रमांक ५२१ मध्ये सापडला.

कृष्णाजी भास्कर वाई

अर्थातच तुम्ही वरील पात्र शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या तर्फे, वाई व सातारा चे सुभेदार व कारकून कृष्णाजी भास्कर यांनी कुकाजी बयाजी हवालदार व कारकून सातारा यांना पाठवल्याचे वाचले असेलच.

सुरूवातीला मला फार काही विशेष वाटले नाही. कारण शिवाजी महाराज धर्मादाय कार्यांसाठी मदत करायचे याला तर इतिहास साक्षी आहे. पण पुन्हा एकदा हे पत्र वाचले तेव्हा एक अजब प्रकार दिसला. तुम्हाला दिसला का?

पत्र पुन्हा एकदा वाचा..

पत्राची तारीख काय दिसत आहे?

२३ एप्रिल १६७५ !!

पण लोकांना माहित असलेल्या इतिहासानुसार शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा शिवप्रताप दिनी म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी वध केलेला होता! मग त्याच वाई मध्ये, त्याच नावाचा हे कोण नवीन कृष्णाजी भास्कर आले?

आता हे खरे आहे की शिवप्रताप दिनाच्या वेळी कृष्णाजी सुभेदार नव्हते तर हवालदार होते. पण समजा हे कृष्णाजी भास्कर तेच कृष्णाजी भास्कर असतील तर इतकी वर्षे कोणी एकाच पदावर कसा काय राहू शकेल? कधी ना कधी बढती होणारच ना?

डोकं चक्रावून टाकणारी घटना होती माझ्यासाठी!

त्यामुळे मी आणखीन संशोधन करू लागलो तेव्हा “शिवकालीन पत्र सार संग्रह खंड – १” मध्ये आणखीन एक पत्र सुभेदार कृष्णाजी भास्कर यांच्या नावे सापडले.

कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराज

आता एक कृष्णाजी १६५९ साली मारले गेले होते तर १६६८ साली शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील गुंजण मावळातील देशमुख हैबतराव शिळीमकर यांना पत्र लिहिणारे हे कृष्णाजी भास्कर कोण होते!?

अर्थात इतिहासाचा अभ्यास न करता फक्त सोशल मीडियावर बडबड करणारे अनेक आहेत. पण मी वर दिलेल्या पुराव्यांसंबंधी काय विचार आहे? आणि जर हे कृष्णाजी भास्कर ते कृष्णाजी भास्कर आहेत तर त्यांच्याबद्दल ऐकलेल्या कथांना किती अर्थ राहतो?

आता यांच्याहून अधिक रोचक माहिती देतो. शिवकालीन पत्र सार संग्रह खंड – १ मधील खालील पत्र वाचा

या पत्रातील कृष्णाजी भास्कर कोण आहेत? आणि जर कृष्णाजी भास्कर महाराजांचे शत्रू होते तर १६५८ साली म्हणजेच अफझलखानाला मारण्याच्या आधी शिवाजी महाराज यांना पत्र का लिहिलं असेल? असे अनेक प्रश्न इतिहास आपल्याला विचारतो. त्यांचं काय करायचं? की लोक म्हणतात म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा? इतिहास फार विचित्र आहे आणि राजकारण तर त्याहून अनाकलनीय. त्याकाळच्या राजकारणाचा माग काढण्यासाठी पुराव्यांचाच आधार घेतला जाऊ शकतो. नाहीतर फसगत होणं क्रमप्राप्त आहे.

त्याहून पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की शिवाजी महाराजांनी शत्रूंकडून लढणाऱ्या कित्येक शूरवीर योद्धयांना आपल्याकडे वळवले होते. यादी मोठी आहे पण एक-दोन उदाहरणे देतो त्यावरून लक्षात येईल, बाजी प्रभू देशपांडे आणि मुरारबाजी इत्यादी. मग असे असेल तर कृष्णाजी भास्कर यांना आपल्या पदरी का घेऊ नये? अर्थातच असे केल्याचा कुठे उल्लेख नाही. तरीही वर नमूद केलेल्या पत्रांचे काय? त्यांच्यावर नमूद केलेल्या तारखांचे काय आणि ही पत्रे लिहिणाऱ्या वाई-साताऱ्याच्या कृष्णाजी भास्करांचे काय? हे प्रश्न आहेतच. आता आणखीन एक गोष्ट सांगतो सभासद बखर, शेडगावकर भाकरीत कृष्णाजी भास्कर यांना ठार केल्याचा उल्लेख नाही. शिवभारत मध्ये देखील कृष्णाजी भास्कर यांना ठार केल्याचा उल्लेख नाही, उलट त्यांना जीवन दान दिल्याचा उल्लेख आहे.

आता काही जण म्हणतील की दिवस शिवप्रताप साजरा करण्याचा आहे मग या एका विवक्षित घटनेकडे आणि व्यक्तीकडे लक्ष देण्याची काय गरज आहे?

गरज आहे?

आपलाच इतिहास आपल्याला माहित नसणे हे समाजाच्या अधःपतनाचे एक मुख्य कारण असते. त्याच प्रमाणे कुलकर्णी हे आडनाव घेऊन अनेक लोक आपापली द्वेषाची दुकाने चालवतात आणि ज्यांना इतिहास माहित नाही ते त्यांच्या बनावाला बळी पडतात. द्वेषाने फक्त अजून द्वेष च जन्म घेऊन शकतो. आपण आपल्या समाजासाठी द्वेष, गैरसमज हेच देऊ शकतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. आधीच वेगवेगळ्या विचारसरणींनी विभागलेल्या समाजात आणखीन किती विषपेरणी करायची याचा विचार कधी होणार आहे की आपण सतत राजकारण आणि सत्तेच्या बीभत्स रक्तपिपासू खेळांचे बळी पडणार आहोत? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधली तर हा ब्लॉग लिहिण्यामागचा उद्देश लक्षात येईल. समर्थ म्हणाले होते “मराठा तितुका मेळवावा” मग मराठी समाजाला एक होऊ न देणाऱ्या या द्वेषाच्या वल्लीला जिवंत राहू देणे कितपत योग्य आहे? याच विचाराने हे सर्व लिहिण्याचे धाडस केले.

शब्दयात्री मध्ये इतिहासावर प्रकाश टाकणारे अनेक ब्लॉग लिहिलेले आहेत ते देखील नक्की वाचा. आपल्या समाजाला द्वेषापासून आणि गैरसमजांपासून वाचवा!

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

2 thoughts on “शिवप्रताप दिन – कृष्णाजी भास्कर – इतिहास काय सांगतो?

  1. कृष्णाजी भास्कर बाबत आपण लेख लिहिलात . अभ्यासपूर्ण लिहिलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन . फक्त एक करा अजून एक गोष्ट सांगतो तेव्हढी करा म्हंजे कृष्णाजी भास्कर बाबत अजून माहिती समजेल तुम्हाला.
    नेसरीच्या खिंडीत बहालोल खानाच्या विरुद्ध 1676 फेब्रू. जे 7 विर मारले गेले. त्यांचे नेतृत्व होते प्रतापराव गुजर यांच्या कडे बाकीचे 6 कोण होते यांची नावे तपासा म्हंजे लक्षात येईल 1659 मधील कृष्णाजी भास्कर वेगळा . आणि ठी जो संदर्भ देताय तो कृष्णाजी भास्कर वेगळा.
    बाकी सर्व सुज्ञ आहेत .
    जय शिवराय.

  2. ‘कृष्णाजी भास्कर’ कुलकर्णी (ज्याला शिवाजी महाराजांनी मारले ) व ‘कृष्णाजी भास्कर’ देशपांडे ( मुरारबाजी देशपांडे यांच्या कुळातील ) यांच्या नावात गफलत होत आहे . कारण दोघांची नावे हि आडनाव न लावता लिहिली गेली आहेत.
    तंजावर च्या बखरीत याचा उल्लेख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *