November 14, 2024
हेटकरी – महान मराठी योद्धे (Hetkari – Ferocious Maratha Warriors)

हेटकरी – महान मराठी योद्धे (Hetkari – Ferocious Maratha Warriors)

Spread the love

हेटकरी आणि मावळे

“शिवकाल” म्हटलं की एक शब्द आपोआप मनात उमटतो तो म्हणजे मावळे! मराठ्यांचे सैन्य म्हटले की मावळे असे जणू एक समीकरणच झालेले आहे. खरं तर मावळ प्रांतात जे राहतात ते मावळे या हिशोबाने शिवाजी महाराजांच्या सैन्यात बहुतेक सगळे सैनिक आणि योद्धे मावळातीलच होते असं म्हणावं लागेल. पण, वस्तुस्थिती तशी नाही. इतिहासाची पाने ओलांडताना, पुरंदरच्या लढाईबद्दल चिंतामण गंगाधर गोगटे यांच्या “राजपुत्र औरंगझेब” या पुस्तकात पुरंदरच्या युद्धातील एका घटनेचे वर्णन वाचताना, मराठ्यांच्या सैन्याबद्दल खालील मजकूर वाचनात आला. ज्याच्यात “हेटकरी” योद्धांबद्दल माहिती समोर आली. आणि तेव्हापासून या योद्धयांचा थोडा बहुत अभ्यास सुरु केला. आत्तापर्यंत मावळे ऐकले होते पण हे हेटकरी कोण आहेत!? त्यांचा आणि कोकणचा काय संबंध आहे?

हेटकरी पुरंदर मुरार बाजी
चिंतामण गंगाधर गोगटे यांच्या “राजपुत्र औरंगझेब” या पुस्तकामधून

त्याचा प्रथम तपशील “महाराष्ट्रीय ज्ञानकोश, भाग १८” मध्ये भंडारी समाजाबद्दल दिलेल्या माहितीत मिळतो. तो खालील प्रमाणे..

हेटकरी Hetkari
भंडारी समाज आणि “हेटकरी” – महाराष्ट्रीय ज्ञानकोश, खंड भाग १८

यावरून एक गोष्ट तर लक्षात आली, हेटकरी हा तळकोकणातील एक स्वतंत्र इतिहास असलेला समाज अथवा पोटजात आहे. आणि मग शोधकार्य सुरु झालं की “जर मावळ प्रांतात राहणारे मावळे असतील तर, हेटकरींना “हेटकरी” हे नाव कसे मिळाले असावे?” त्याची उकल काही अन्य ग्रंथातून झाली.. त्यातील एक म्हणजे गो अ मोडक यांचे “लहान मुलांचा महाराष्ट्र” हे पुस्तक. त्यात मावळे आणि हेटकरी यांच्यातील फरक बाळबोध पद्धतीने दिलेला आहे.

हेटकरी Hetkari
गो अ मोडक यांचे “लहान मुलांचा महाराष्ट्र”

हेटकरी आणि कोकण

हेटकरी हे तळकोकणातील होते आणि नेमबाजीत तरबेज होते. कोकणाचे सामान्यतः दोन भाग पडतात, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. सावित्री नदीच्या दक्षिणेकडील भाग दक्षिणकोकण आणि सावित्रीच्या उत्तरेकडील उत्तर कोकण. उत्तर कोकण हा मावळ प्रांताशी जवळ आहे आणि दक्षिण कोकण कुडाळ, राजापूर, रत्नागिरी इत्यादी भागाशी निगडित. (मावळ प्रांताला मावळ का म्हणतात याबद्दल पुढे कधीतरी लिहीन!)

प्राकृत भाषेत “हेट” म्हणजे दक्षिण. याच दक्षिण कोकणातील मराठी योद्धे म्हणजेच “हेट” दिशेला राहणारे म्हणून त्यांना “हेटकरी” असे संबोधले जाऊ लागले.

आणखीन माहिती मिळवल्यानंतर खुलासा झाला की, प्राकृत भाषेत “हेट” म्हणजे दक्षिण. याच दक्षिण कोकणातील मराठी योद्धे म्हणजेच “हेट” दिशेला राहणारे म्हणून त्यांना “हेटकरी” असे संबोधले जाऊ लागले.

टीप: काही लोकांच्या मते शेतकरी शब्दावरून हेटकरी शब्द आलेला आहे. पण, हे चूक आहे. कारण शेत आणि हेट यांचा परस्पर काहीच संबंध नाही आणि या अपभ्रंशाचा कुठेही उल्लेख नाही.

या मराठी योद्धयांनी हिंदवी स्वराज्याच्या बांधणीत आणि त्याचे हात मजबूत करण्यात प्रचंड हातभार लावला. आधी आपण पुरंदरच्या युद्धाबद्दल पाहिलेले आहेच. आणखीन एक दाखला, महाराष्ट्रीय ज्ञानकोश भाग १८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिवकालीन तहाच्या पत्रात मिळतो.

Hetkari हेटकरी
शिवाजी महाराजांनी केलेला तह

चिंतामण गंगाधर आपटे यांच्या “राजपुत्र औरंगझेब” या पुस्तकातही त्यांनी हेटकरी योद्धयांचे महत्व नमूद केलेले आहे.

हेटकरी Hetkari
राजपुत्र औरंगझेब मधून

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या रोजनिशीत देखील हेटकरींचा उल्लेख बघायला मिळतो.

माधवराव पेशवे मावळे
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या रोजनिशीतून

याखेरीज या समाजातील योद्ध्यांनी वसईच्या लढाईत देखील भाग घेतल्याचे उल्लेख आहेत. एकंदरीतच भंडारी समाजातील, हेटकरी हे महान योद्धे होते यात काही शंका नाही. हे शिवाजी महाराजांच्याही आधी लढवय्ये होतेच. मात्र, हिंदवी स्वराज्यात त्यांनी आपल्या महाराष्ट्राची शोभा वाढवली, अनेक किल्ले जिंकले, राखले आणि सांभाळले. अगदी इंग्रजांनी भारतावर आपले साम्राज्य प्रस्थापित करेपर्यंत या समाजाने शौर्य गाजवले.

हेटकरी योद्धे मुख्यतः पायदळात होते. तीर कामठ्यात प्रवीण. हेटकऱ्यांचा उल्लेख इसवीसन पूर्व ५०० पासून होत आहे. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हेटकरी म्हणजेच हेटप्रांतात राहणारे, कदाचित भंडारी समाजापेक्षाही जुने असू शकतात. पण याबद्दल फारसा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे याला थेट इतिहास म्हणता येणार नाही.

इतिहास आणि समाज माध्यमे

कागदपत्रांच्या आणि ग्रंथांच्या आधारे जर इतिहास अभ्यासला नसता तर इतका महान इतिहास असलेल्या या लढवय्या समाजाबद्दल ऐकायला व वाचायला मिळालं नसतं! इतिहास केवळ सोशल मिडिया, Whatsapp मध्ये न वाचता, काही ठराविक नेत्यांच्या तोंडून न ऐकता, स्वतः कागदपत्रे, पुस्तके, इतिहासकारांनी लिहिलेले ग्रंथ यांतून शिकला पाहिजे. नाहीतर इतिहास केवळ पूर्वग्रहदूषित आणि काल्पनिक दंतकथांची थप्पी होऊन जाईल.

इतिहास केवळ सोशल मिडिया, Whatsapp मध्ये न वाचता, काही ठराविक नेत्यांच्या तोंडून न ऐकता, स्वतः कागदपत्रे, पुस्तके, इतिहासकारांनी लिहिलेले ग्रंथ यांतून शिकला पाहिजे. नाहीतर इतिहास केवळ पूर्वग्रहदूषित आणि काल्पनिक दंतकथांची थप्पी होऊन जाईल!

माझी खात्री आहे, तुम्हाला महान मराठी योद्धे “हेटकरी” यांच्याबद्दल आज अधिक माहिती मिळाली असेल. आवडल्यास नक्की ही माहिती आणि हा इतिहास इतरांपर्यंत पोहोचवा!

बाकीचे ऐतिहासिक विषयांवरचे ब्लॉग इथे वाचा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *