स्त्रियांना मताधिकार देणारा जगातील पहिला देश.. केट शेपर्ड यांच्या स्मरणार्थ दहा डॉलर ची नोट

स्त्रियांना मताधिकार देणारा जगातील पहिला देश..

Spread the love

स्त्रियांना मताधिकार

आजच्या जगात स्त्रियांना मताधिकार असणे, त्यांनी मतदानात सक्रिय सहभाग घेणे इतकंच काय तर उमेदवार म्हणून उभे राहणे हे देखील एकदम सामान्य आहे. कोणालाच यात काहीच विशेष वाटत नाही. पण १९ व्या शतकापर्यंत स्त्रियांना मताधिकार नव्हता हे किती जणांना माहित आहे? ज्या ज्या पाश्चात्य देशांना आपण “प्रगत” समजतो त्या देशांमध्येही स्त्रियांना मतदानाचा अधिकार अगदी आत्ता आत्ता मिळालेला आहे. पण या समानतेच्या लढाईत पाहिलं पाऊल उचललं ते न्यू झीलँड (New Zealand) या देशाने. त्या घटनेचा हा धावता इतिहास.

केट शेपर्ड

इंग्लंडमध्ये जन्माला आलेल्या केट शेपर्ड या लढ्याच्या अग्रणी होत्या. या लढ्याची सुरुवात १८८० मध्ये दारूबंदी चळवळीपासून झाली. केट शेपर्ड या सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रबोधनकर्त्या म्हणून या चळवळीत सामील झाल्या. या चळवळी दरम्यान स्त्रिया आणि त्यांच्या समस्या या विषयांवर मंथन झाले. Woman’s Christian Temperance Union (WCTU) ची स्थापना झाली. केट शेपर्ड या संस्थेच्या सह संस्थापक देखील होत्या. 

Kate Sheppard - Quotes, Suffragette & Life - Biography
केट शेपर्ड

Temperance म्हणजे सोप्या शब्दात दारूबंदी. या संस्थेने देशभर प्रचार करत समाजाला दारूबंदी करण्याचे आवाहन केले. १८८५ येता येता सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना लक्षात आले की, राजकीय अधिकार असल्याशिवाय स्त्रियांचे प्रश्न सोडवणे शक्य नाही. त्यामुळे या सामाजिक चळवळीने एका समानतेवर आधारित राजकीय चळवळीचे रूप घेतले. 

या चळवळीचे नेतृत्व केले केट शेपर्ड यांनी. त्यांनी देशभर दौरे केले. स्त्रियांच्या राजकीय अधिकारांबद्दल जनजागृती केली. निरनिराळ्या मार्गांनी “स्त्रियांना मताधिकार का?” या विषयावर प्रबोधन केलं. अनेक याचिका दाखल केल्या, अनेक चर्चा आणि सभा भरवल्या. शेवटी ८ सप्टेंबर १८९३ साली स्त्रियांच्या मताधिकारांच्या विधेयकावर (बिल) संसदेत मतदान झाले. 

Kate Sheppard, Suffragette — Change
केट शेपर्ड

पंतप्रधान सेडान यांनी विधेयकावरील मतदान थांबवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मतदान झालेच. स्त्रियांच्या मताधिकाराचे विधेयक २० विरुद्ध १८ मतांनी पास झाले. पुढे गव्हर्नर ग्लासगो यांनी १९ सप्टेंबर ला या विधेयकाला मंजुरी दिली आणि त्याचे रूपांतर कायद्यात झाले! १८९३ मध्ये जवळजवळ ८४% महिलांनी निवडणुकीसाठी नावनोंदणी केली. 

Kate Sheppard Women's Council
केट शेपर्ड यांच्या अध्यक्षतेत महिला आयोग

अशा तऱ्हेने जगात पहिल्यांदाच स्त्रियांना मताधिकार मिळाला. विशेष म्हणजे या कायद्यानुसार कोणत्याही रंगाच्या, वर्णाच्या स्त्री ला हा मताधिकार मिळाला. ही समानता ५०-६० च्या दशकापर्यंत अमेरिकेसारख्या देशात देखील नव्हती. न्यू झीलँड ने केट शेपर्ड यांच्या स्मरणार्थ त्यांचे चित्र दहा डॉलर च्या नोटेवर छापलेले आहे. 

मताधिकार Kate Sheppard केट शेपर्ड New Zeland
केट शेपर्ड यांच्या स्मरणार्थ दहा डॉलर ची नोट

यावरून प्रेरणा घेत कॅनडा ने १९१७ साली, इंग्लंड ने १९१८ साली आणि अमेरिकेने १९२० साली स्त्रियांना मताधिकार देणारे कायदे अमलात आणले! गमतीची गोष्ट अशी की स्वित्झर्लंड देशात १९७१ सालापर्यंत स्त्रियांना संपूर्ण मताधिकार नव्हता!

ही अपरिचित गोष्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचवा!


आणखीन ब्लॉग्स आणि इतिहासातील रोचक घटनांबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *