पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांत पेशवे (ब्रिटिशांहून) क्रूर आणि भेदभाव करणारे म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. असो याबद्दल चर्चा नंतर. आजकाल पेशव्यांचा फक्त मोजकाच (स्वतःला पटतो तेवढाच) इतिहास वाचला, सांगितला आणि वापरला जातो, पण अटकेपार भगवा फडकवण्याबद्दल फारसं बोललं जात नाही!
पण या सगळ्या इतिहासात आजचा दिवस बरेच जण विसरून गेलेत. ८ मे ही तारीख खरं तर कुठेतरी, कुठल्यातरी स्मारकावर कोरली पाहिजे. पण ते करणार कोण? असो.. हा विचार तूर्तास बाजूला ठेवू. कारण इतिहासात राजकारण दडलंय.
तर ८ मे..
पेशव्यांच्या अनेक पिढ्यांत ज्याच्या एका कुकर्माने त्याचं नाव बदनाम झालं (जे योग्यही आहे) ते म्हणजे रघुनाथराव पेशवे अर्थात राघोबादादा पेशवे. इतिहास तर हेच सांगतो की राघोबादादा निष्णात लढवय्ये, कुशल सेनापती आणि वडीलांसारखेच शूर होते. मराठ्यांच्या उत्तरेकडील मोहिमांत आणि विजयात त्यांचाही मोलाचा वाटा होता. त्यातलीच एक महत्वाची मोहीम म्हणजे उत्तर-पश्चिम मोहीम जिथे दुर्रानींचे (अहमद शाह दुर्रानी – अफगाणी पठाण) राज्य होते.
एप्रिल १७५८ मध्ये राघोबादादांच्या नेतृत्वाखाली आणि महादजी शिंदेंसारख्या शूर मराठी सरदारांच्या बळावर, मराठ्यांनी उत्तर-पश्चिम काबीज करण्याची मोहीम हाती घेतली. मराठे१ भगवा फडकवण्याच्या तयारीने आले होते. पेशावरचा काही भाग काबीजही झाला. तरीही दुर्रानी पराभूत झाले नव्हते. अजूनही हे अफगाणी आक्रांत उत्तर-पश्चिम हिंदुस्तानात तळ ठोकून होते. पण..
८ मे १७५८ ला रघुनाथराव पेशवे ऊर्फ राघोबादादा पेशवे यांनी मोजकं सैन्य घेऊन अटक वर स्वारी केली. या लढाईत अहमद शाह दुर्रानीचा पराभव झाला आणि अहमद शाह दुर्रानी कंधार ला पळून गेला. अटक आणि जवळपासचा सगळं परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला, थोडक्यात बराचसा पंजाब, मुलतान आणि काश्मीरचा दक्षिणी भाग हिंदवी स्वराज्यात आला!
या दिवसापासून एक वाक्प्रचार मराठीमध्ये रूढ झाला “अटकेपार झेंडा फडकवणे” आणि मराठे मोठ्या गर्वाने सांगू लागले की मराठ्यांचा भगवा झेंडा अटकेपार फडकला! हे वाक्य आजही कानावर पडते पण पेशव्यांना वगळून (अर्थातच).
___________________
टीप:
- ही गोष्ट सांगण्याचा उद्देश राघोबादादांच्या चुकांवर पांघरूण घालणे नाही, तसा गैरसमज करून घेवू नये.
- लेखकाला कुणालाही कमी लेखण्याचा विचार मनात देखील आला नाही त्यामुळे वाचकांच्याही मनात येऊ नये ही माफक अपेक्षा. बाकी पेशव्यांच्या आडून ब्राम्हणांवर होणारी चिखलफेक सगळे सहन करतात तसा लेखकही करत आहे.
- तसेच लेखकाला इतिहासाची थोडीफार माहिती असल्याकारणाने कृपया फार बदल सुचवू नका.
तळटीप:
- मराठा किंवा मराठे संज्ञा ही त्याकाळी फक्त जातीपुरती मर्यादित नव्हती (आजच्यासारखी). पेशवे, मराठे इ. इ. सगळेच स्वतःला मराठा किंवा मराठे म्हणत.
Featured Image “Citadel of Attock and Bridge of Boats over the Indus,” from ‘The Earth and its Inhabitants’, by E. Reclus (D. Appleton and Company, 1884)
One thought on “अटकेपार भगवा झेंडा – पेशव्यांचा इतिहास”