January 12, 2025
हॉर्न ओके पैसे Noise Pollution Image by mohamed Hassan from Pixabay

हॉर्न ओके पैसे

Spread the love

उत्क्रांतीच्या शर्यतीत माणूस बराच पुढे आला असला तरीही अजूनही काही माकडांच्या सवयी त्याने शाबूत ठेवल्या आहेत, असं आपल्याला सर्वसामान्यपणे रोज रस्त्यावर पदोपदी दिसत असतं. पण अशा या माकडपंथी लोकांना याचं अजिबात भान नसतं की आपल्या अशा वागण्याने माकडांची किती बदनामी होते. असो.. 

अशा या थोर विभुतींमध्ये माझ्या मते पहिला क्रमांक लागतो तो हॉर्न वाजवणाऱ्यांचा! त्यातून उगीचंच हॉर्न वाजवणारे तर साक्षात मर्कट-शिरोमणी वाटतात. जसा आपल्याला “माकड, सारखा उड्या का बरं मारत असेल?” हा प्रश्न पडतो तसा हल्ली मला कुठेही पॉं-पॉं, पीप-पीप आणि काही लिहिता येऊ न शकणारे हॉर्नचे आवाज कानावर पडले की प्रश्न पडतो “हा मनुष्यप्राणी आत्ता हॉर्न का बरे वाजवत असावा?”. बराच विचार करून मी एकाच उत्तरावर थांबतो ‘उगाच’.

पुण्यात (कदाचित उर्वरित भारतातही) सध्या उगाच हॉर्न वाजवणाऱ्यांची संख्या गाड्यांपेक्षा जास्त आहे असा कधी कधी भास होतो. काही लोकांना तर इतकी सवय झालेली आहे की त्यांचा डावा अंगठा हॉर्नच्या बटणावर ठेवलेलाच असतो (आणि कान आणि खांदा यांच्यामध्ये मोबाईल.. पण यावर नंतर कधीतरी बोलू). त्यांचंही बरोबर असतं म्हणा हॉर्न वाजवायची वेळ कुणावर कधी येईल सांगता येत नाही! 

हॉर्न वाजवणाऱ्या माकडासम मनुष्यांच्याही माकड प्रजातीसारख्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. काही जण एकदाच हॉर्न वाजवतात आणि पुढचं देवावर सोडतात. काही जण समोरचा थांबला नसला तरी हॉर्न वाजवतात. कोणी कोणी भित्रे, समोरच्याने नुसता हलका जरी ब्रेक दाबला तरी हॉर्न वाजवतात. काही हॉर्न इतके मोठे असतात की कानांचे पडदे आणि हृदयाचे ठोके एकाच वेळी निकामी होतात विशेषतः बुलेट चालवणाऱ्यांमध्ये ही प्रवृत्ती जास्त दिसून येते. काही हॉर्न इतके मरणप्राय आवाज काढतात की तो आवाज ऐकून केवळ भूतदयेने लोक त्यांना वाट करून देतात. 

सिग्नलला दिल्या जाणाऱ्या हॉर्नची किंमत मोदींनी मोडीत काढलेल्या ५०० रुपयांच्या नोटेएवढी राहिलेली आहे. काहींना गाण्याच्या तालावर हॉर्न वाजवायला आवडतो. तर काही आळशी लोक ऑटोमॅटिक ट्यून वाले हॉर्न बसवून घेतात. काहीकाही शिरोमणी गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हॉर्न दाबूनच ठेवतात आणि तेही मध्यरात्रीच्या दरम्यान. त्यांना तर भगवंताचा अवतार मानलं पाहिजे. कारण रात्री ऐहिक स्वार्थासाठी आराम करत झोपलेल्या सगळ्यांना जागं करण्याची त्यांची क्षमता काही औरच आहे. 

पण हल्ली हल्ली मला हेही जाणवतं की रहदारीच्या रस्त्यावरून आलेला/आलेली पुणेकर विरोधकांपेक्षा जास्त चिडलेला/चिडलेली (आमच्या शुद्ध पुणेरी भाषेत तापलेला/तापलेली) असते. या वाक्याचा आणि हॉर्नचा संबंध नाही हे अजाणकारांच्या लक्षात येईलच. मला तर अमेरिकेत चुकल्या चुकल्या सारखं व्हायचं. पण मीही एकदा हॉर्नमुळे चिडून बोललो होतो..

“चायला %#$#%%$% हॉर्न वर सुद्धा जी एस टी लागला पाहिजे !”

खरं सांगू तेव्हापासून हे चक्र डोक्यात सुरु आहे. समजा हॉर्नवर खरोखरच पैसे द्यावे लागले तर? शक्य आहे.. हॉर्न काही मूलभूत गरज किंवा संविधानाने दिलेला अधिकार अथवा हक्क नाही. त्यामुळे विरोधक आणि पत्रकार ओरडू शकणार नाहीत. त्याहूनही थोर आयडिया म्हणजे मोबाईलसारखे त्याचेही प्लॅन ठेवावेत प्रिपेड-पोस्टपेड वगैरे. रक्कमही भरभक्कम ठेवावी कारण हल्ली ट्रॅफिक पोलिसांनाही १०० रुपये देण्यात का-कू करणारी पिढी आता गेली आहे. आता थेट कार्ड काढतात, नाहीतर लायसन्स खालून नोट. असो, विषयांतर नको !


        प्रगतीपथावर अत्यंत वेगाने चालेलल्या या भारतात हॉर्नने तरी मागे का राहावे? प्रत्येक हॉर्न स्मार्ट झाला पाहिजे. त्याला इंटरनेट द्वारे प्लॅन देणाऱ्या सर्व्हरला जोडलं पाहिजे. हॉर्नच्या ऍप्प ला चालकाच्या आधार ने आणि त्याच्या बँक अकॉउंटने जोडलं पाहिजे. इंटनेरनेट बंद केलं की हॉर्न बंद. एकदा वाजवलं (१ सेकंदाच्या आत) की १०० रुपये, एकाच वेळी दोनदा (IT वाले याला Double-click म्हणतात) की १५० रुपये. पण मात्र सलग वाजवणाऱ्यांकडून (३ सेकंड आणि अधिक) थेट ५०० रुपये घेतले पाहिजेत. गल्लीभर वाजवणाऱ्यांकडून थेट १००० रुपये घेतले पाहिजेत (खरं तर त्यांच्या अकॉउंट मध्ये असतील नसतील तेवढे सगळे घेतले पाहिजेत पण मानवाधिकार वाले आरडा ओरडा करतील म्हणून हा प्रस्ताव नामंजूर केलाय) गर्दीच्या वेळी आणि रात्री सर्ज (जादा आकार) लागला पाहिजे. यात स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध आणि अजून काही भेदभाव केले जावू नयेत. समोर बसलेल्या लहान मुलाने हॉर्न वाजवला वगैरे कारणांनाही मुळीच थारा देवू नये. 

प्रत्येक वेळा हॉर्न वाजवल्यावर पैसे सरकारजमा होतील असं काहीतरी केलं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे. तसं झालं तरंच ही योजना सफल होऊ शकते. कारण भारतीयांचा हा मूलमंत्र आहे की काहीही झालं तरी सरकारला एक पै द्यायचा नाही. दिवसागणिक हजार हजार रुपये आणि तेही फक्त हॉर्नवर खर्च करणं मूर्खपणाचं आहे हे न समजण्याइतके लोक मूर्ख नाहीत. आणि हॉर्नचं बिल भरलं नाही की हॉर्न बंद!

हे जर असं झालं तरंच कदाचित रस्त्यांवर माकडं कमी आणि माणसं जास्त दिसू लागतील आणि ट्रकांच्या मागे लिहिलं जावू लागेल “हॉर्न ओक पैसे !”

कसा वाटला हा विचार? जरूर कळवा म्हणजे मुख्यमंत्र्यांना पाठवल्या जाणाऱ्या या प्रस्तावाला थोडं वजन मिळेल ! 
_________________________

टीप:

  • या नियमावलीतून ऍम्ब्युलन्स, अग्निशामक दल आणि पोलीस यांना वगळण्यात आलेले आहे. 
  • तसेच लेखक परदेशात राहून आल्याने हॉर्न न वाजवण्याचे फायदे माहित आहेत. कृपया हॉर्न वाजवणाऱ्यांची वकिली.. असो 
  • माणसांची तुलना माकडांशी केल्याबद्दल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर लेखक खंडाळा किंवा वरंधा घाटात जाऊन प्रायश्चित्त म्हणून माकडांना डझनभर केळी द्यायला तयार आहे 🙏

Featured Image: Image by mohamed Hassan from Pixabay

Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *