काल म्हणजे २४ नोव्हेंबर २०२२, मी नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी इतिहासात काय झालं याबद्दल जरा माहिती गोळा करत होतो. तेव्हा मला हे पान सापडले. या पानावर Jeremiah Horrox या खगोलशास्त्रीच्या मित्राला म्हणजे William Crabtree नावाच्या एका विणकाराला Transit of Venus किंवा शुक्राचे पारगमन बघताना दाखवले आहे. Jeremiah ने आपल्या मित्राला हे पाहायला सांगितले होते. त्याचे वर्णन Ford Maddox Brown या चित्रकाराने या पानावरील चित्रात केलेले आहे. थोडी गमतीदार माहिती अशी की या चित्रात William ला वृद्ध दाखवले आहे. पण प्रत्यक्षात ही घटना घडली तेव्हा तो फक्त २९ वर्षांचा होता.

ही घटना वाचली आणि विचारात पडलो की ही घटना ऐकल्यासारखी वाटत आहे. एक दोन क्षणांत ट्यूब पेटली! मी २०१२ मध्ये Farmington Hills, Michigan (अमेरिका) मध्ये होतो तेव्हा असेच शुक्राचे पारगमन म्हणजेच Transit of Venus झाले होते. विशेष म्हणजे मला ते पाहायला मिळाले आणि काही फोटो काढायला सुद्धा मिळाले!

Transit of Venus किंवा शुक्राचे पारगमन म्हणजे, सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये शुक्राचे येणे. एका अर्थी शुक्राने सूर्याला लावलेले ग्रहण! सूर्याच्या प्रचंड बिंबावर एखादा टिम्ब काढावा तसा शुक्र दिसतो. पण या घटनेला फार महत्व आहे. कारण, हे शुक्राचे पारगमन (Transit of Venus) एखाद्या शतकात एकदा किंवा दोनदाच होते. २१व्या शतकात २००४ साली एकदा झाले आणि २०१२ ला दुसऱ्यांदा. यापुढचे शुक्राचे पारगमन (Transit of Venus) २११७ साली होणार आहे. २०१२ लाच पाहून घेतलं यात मला आनंद आहे! 😉
खरं तर पृथ्वी, शुक्र आणि सूर्य दार ५८४ दिवसांनी जवळजवळ एका रेषेत येतात. पण एक पूर्णपणे एका रेषेत येत नाहीत. कधी शुक्र सूर्याच्या खाली राहातो, कधी वर! त्यामुळे शुक्राचे हे पारगमन सूर्याच्या समोरून जाताना बघणे हा दुर्मिळ योग्य आहे. शुक्राचा आकार किंवा व्यास सूर्याच्या व्यासाच्या १/३२ अंश दिसतो. मला तर त्या दृष्याकडे बघून वरच्या बाजूला भोक पाडून माळेत ओवलेले नाणे आठवले! बाकीची गणिते तुम्हाला गुगल वर सहज सापडतील.

४ जून २०१२ दिवशी मी ऑफिस संपवून माझ्या Farmington Hills मधील अपार्टमेंटमध्ये बसलो होतो. खरं सांगायचं तर टाईमपास करत. आणि अचानक फेसबुक वर एक दोन मित्रांच्या पोस्ट्स बघितल्या. “Transit of Venus” बद्दल काहीतरी लिहिलं होतं. मी विचार करत होतो की यांना ज्योतिषशास्त्रात कधीपासून एवढा इंटरेस्ट वाटायला लागला? पण नंतर शोधलं तर समजलं की दुसऱ्या दिवशी ५ जून ला, Transit of Venus म्हणजे शुक्र सूर्याच्या समोरून जाणार आहे. वेळ काढली तर दुपारची होती. मग काय, काही बाही कारण देऊन ५ तारखेला २, २:३० लाच बाहेर पडलो. कॅमेरा Canon sx 20 आणि Fossil चा गॉगल तयार होता.

लगेच खाली गेलो आणि वेडसरपणा केला. थेट सूर्याकडे पाहिलं. थोडा त्रास झाला पण नशीब ढग आलेले होते. मला आकाशात अशा घटना घडत असल्या की खूप उत्तेजित व्हायला होते! मग जरा जमेल तितकं कॅमेरा सेटिंग केलं आणि लेन्स समोर गॉगल धरला. सीन लक्षात घ्या. अमेरिकेतील एक अपार्टमेंट कॉम्प्लेक्स. बिल्डींग बाहेर गवताच्या लॉन वर मी एकटा उभा. एका हातात गॉगल आणि एका हातात कॅमेरा! (माझ्याकडे तेव्हा tripod नव्हता) किती विचित्र वाटलं असेल लोकांना. मग गॉगल, कॅमेरा, सूर्य आणि focus या सगळ्यांना सांभाळत माझी Transit of Venus चे फोटो काढायची सर्कस सुरु झाली. अधून मधून येणारे ढग कधी सूर्याला झाकून मूड ऑफ करत होते, कधी अर्धपारदर्शी बनून थेट बघायची सोय करत होते.
थोडे धूसर का होईना पण शेवटी भरपूर फोटो मिळवले आणि सूर्यास्त झाल्यावर आनंदाने घरी गेलो! घरी गेल्यावर पुन्हा भात, भाजी वगैरे सुरु झालं. काही फोटो फेसबुकवर टाकले. नेहमीप्रमाणे काहीच लोकांनी पाहिले. आणि तो दिवस स्मृतींच्या एका छोट्याशा कोपऱ्यात जावून बसला. काल इतिहास धुंडाळताना पुन्हा त्या कप्प्याची आठवण झाली. त्या कप्प्यासमोरची थोडी अडगळ, धूळ स्वच्छ केली आणि Transit of Venus चे ते खऱ्या अर्थाने ऐतिहासिक क्षण पुन्हा मनसोक्त पाहून घेतले. आता असे फोटो थेट २११७ सालीच काढता येणार आहेत. भविष्य कोणी बघितलंय पण २११७ जरा अतीच झालं! तेव्हा माझी नातवंडे – पतवंडे वगैरे फोटो काढतील आणि सांगतील माझ्या आजोबांनी – पणजोबांनी देखील याचे फोटो काढले होते.. त्या काळी!!
असे अनुभव आणि ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.