चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते हे मी नवीन सांगण्याची गरज नाही. पण कधी कधी एखादा प्रसंग, मनाच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये असा काही बसतो की विचारांची ढवळाढवळ सुरु होते. काही दिवसांपूर्वी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. फिरत फिरत जंगली महाराज रस्त्यावर आलो. बालगंधर्व जवळील फुटपाथवर चालण्याची इच्छा झाली. त्यातल्या त्यात बरा भाग आहे चालण्यासाठी. आधीच काही फोटो, माझ्या मते काही अर्थपूर्ण फोटो मोबाईलमध्ये काढून झालेले होते. त्यामुळे, त्याच्याहून अर्थपूर्ण आणखी काही दिसेल याची अपेक्षा नव्हती. वेलींनी वेढलेली एक चौकात लांघून पुढे गेलो आणि..
एक कुत्रा मी जवळ येताच एकदम उठला आणि समोर बघू लागला. मी माझ्या पावलांकडे बघण्यात व्यस्त होतो (माझी ही एक सवय आहे). मला आधी वाटलं की माझ्यामुळे हा कुत्रा उठला. पण तसं नव्हतं हे तो कुत्रा कुठे बघत आहे? हे बघितल्यावर लक्षात आलं. मनात काहीतरी ढवळलं गेलं. फुटपाथच्या पलीकडच्या बाजूला एक मुलगी एका कुत्र्याचे लाड करत होती. आणि हा कुत्रा तिच्याकडे बघत होता. मोठे करुण चित्र वाटलं मला. आधी मी मोबाईल काढला आणि पटकन एक फोटो काढला.

काढलेला फोटो कसा आला आहे, हे बघितलं आणि त्या क्षणी असं वाटलं की रडावं.. खूप रडावं. अर्थात मी ते केलं नाही. तो उभा राहिलेला कुत्रा मला आधी नॉर्मल वाटला होता. पण फोटो बघितल्यावर लक्षात आलं की त्याला एक पाय नव्हता. माझ्या डोळ्यांना हे अधुपण आधी दिसलं नव्हतं. आणि त्याच्या त्या बघण्यातली एक घनगर्द, व्याकुळ पोकळी डोळ्यांसमोर दाटली.
एवढ्यात त्या मुलीचे या कुत्र्याकडे लक्ष गेलेले होते. तोपर्यंत तो कुत्रा स्तब्ध होता. काही लोक त्या सुखाच्या, नियतीच्या आणि आयुष्याच्या दोन किनाऱ्यांच्या मधून चालत गेले. त्यांच्या लेखी हे समांतर विश्व अस्तित्वहीन होते. मुलीने या अधु कुत्र्याला आवाज आणि हाताने जवळ बोलावले. हा कुत्रा काही वेळ तसाच उभा राहिला आणि नंतर मान खाली घालून माझ्या दिशेने येत मागे निघून गेला. त्याचे डोळे मला आर्त पण ज्ञानी दिसले. मी तसाच उभा होतो. गरज, लाचारी, प्रारब्ध आणि करुणा यांच्या चौकटीत घडलेला हा खेळ बघून स्तिमित झालेलो होतो.
आणखीन ब्लॉग इथे वाचा