May 19, 2024
घनाक्षरी वृत्त – नियम आणि उदाहरणे

घनाक्षरी वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – घनाक्षरी

वृत्त प्रकार – मात्रावृत्त (अर्ध समवृत्त)

वृत्त मात्रा संख्या – ३१ / ३२ / ३३

मात्रांची विभागणी – घनाक्षरी वृत्तात पहिल्या तीन चरणात ८ मात्रा आणि शेवटच्या चरणात ७/८/९ मात्रा असतात. मात्र जर शेवटच्या चरणात जेवढ्या मात्र असतील तितक्याच मात्रा काव्याच्या अखेरपर्यंत असल्या पाहिजेत हा नियम आहे.

यति – ८ – ८ मात्रांनंतर

नियम
पहिल्या तीन चरणात प्रत्येकी ८ मात्रा तर चौथ्या चरणात ७/८/९ मात्रा

घनाक्षरी बद्दल माहिती

घनाक्षरी एक प्राचीन वृत्त अथवा छंद आहे. या वृत्ताला असे नाव का पडले असावे याबद्दल फार मीमांसा वाचनात आली नाही. पण एकंदरीतच ३१/३२/३३ मात्रांचे दोन चरणांचे गट म्हणजे एकंदरीतच भरपूर अक्षरे असणार यात वाद नाही. त्यामुळे कदाचित घन म्हणजे दाटीवाटीने मांडलेली भरपूर अक्षरे म्हणून हे नाव पडले असावे! मराठी वाङ्मयात शक्यतो ३१ मात्रांची घनाक्षरी अधिक प्रसिद्ध आहे. खरे तर तिचे नाव “मनहरण” आहे पण यालाच अनेकजण घनाक्षरी म्हणून संबोधतात.

घनाक्षरी खरं सांगायचं तर वृत्तांचा एक समूह आहे ज्यात सम चरणांत किती मात्रा आहेत यांवरून त्यात आणखीन गट पडतात. त्याची उदाहरणे खाली देत आहोत.

३१ मात्रांच्या घनाक्षरीचे प्रकार
मनहरण (कवित्त)  : ८ + ८ + ८ + ७ मात्रा आणि कडव्याची शेवट गुरू ने
जनहरण : ८ + ८ + ८ + ७ मात्रा आणि पाडव्याचे शेवटचे अक्षर सोडून बाकी चरणातले प्रत्येक अक्षर लघु
कलाधर : प्रत्येक चरणात गुरू-लघु एका पाठोपाठ एक येतात आणि कडव्याची शेवट मात्र गुरू ने

३२ मात्रांच्या घनाक्षरीचे प्रकार
रूपघनाक्षरी : ८ + ८ + ८ + ८ मात्रा आणि कडव्याची शेवट लघु ने झाली पाहिजे
जलहरण : ८ + ८ + ८ + ८ मात्रा आणि कडव्यातील शेवटची दोन अक्षरे लघु असली पाहिजेत
डमरू : ८ + ८ + ८ + ८ मात्रा आणि चरणातील प्रत्येक अक्षर लघु असले पाहिजे
विजया : ८ + ८ + ८ + ८ मात्रा आणि प्रत्येक चरणात शेवटची दोन अक्षरे अनुक्रमे लघु – गुरू असली पाहिजेत

३३ मात्रांची घनाक्षरी
देवघनाक्षरी : ८ + ८ + ८ + ९ मात्रा

घनाक्षरी वृत्ताची उदाहरणे

या वृत्तात अनेक महान कवींनी रचना केलेल्या आहेत पण एक उदाहरण जे प्रत्येक मराठी मनावर अक्षरशः कोरलेलं आहे ते म्हणजे कवी भूषण यांनी शिवाजी महाराजांच्या गौरवार्थ रचलेले “इंद्र जिमि जम्भ पर“! तांत्रिकदृष्ट्या हे काव्य मनहरण किंवा कवित्त वृत्तात मोडते. प्रत्येक कडव्यात ३१ मात्रा आणि शेवटचे अक्षर गुरू!

इंद्र जिमि जंभ पर बाड़व ज्यौं अंभ पर रावन सदंभ पर रघुकुलराज है।
पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यौं सहस्रबाहु पर राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर चीता मृगझुँड पर भूषन बितुंड पर जैसे मृगराज है।
तेज तम-अंस पर कान्ह जिम कंस पर यौं मलेच्छ-बंस पर सेर सिवराज है॥

या वृत्तातील आणखीन उत्तम उदाहरणे कवी रघुनाथ पंडित यांच्या दमयंती स्वयंवर आख्यानात वाचायला मिळतात

नळावेगळा भ्रतार॥ नलगे स्वप्नी हे साचार ॥
ऐसा निश्चय विचार ॥ तंव राजेंद्र बोलतो ॥
टाकुनि इंद्राचा संभ्रम ॥ धरिशी कां तू नळ-भ्रम ॥
जाईल विश्राम-विभ्रम ॥ नसता श्रम होईल ॥
तुझे सौंदर्य पहावया ॥ धरी सहस्त्राक्ष-काया ॥
तया वरीं देवराया ॥ नळ-माया टाकुनी ॥
अथवा तुज तो मोहला ॥ होऊं नेदी नैषधाला ॥
यास्तव त्याच इंद्राला ॥ माळ गळां घालावी ॥

घनाक्षरी वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता.

घनाक्षरी वृत्तातील आणखीन उदाहरणे या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *