काही लोकांना सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, म्हणून ‘मी’ सूर्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, हा त्या सूर्याचा अपमान आहे. सूर्य स्वयंसिद्ध आहे!
नमन स्वातंत्र्यवीरा तुजला, नमन क्रांतिभास्करा ।।धृ।।
अगणित दुःख अन् त्याग, अमानुष अत्याचार,
हृदयात एक विचार,
भारतभूमी तोडून बंधन, लांघेल कशी ही कारा? ।।१।।
सोडिले आप्त सोयरे, ठेविला ना कुठला स्वार्थ,
मांडला सत्य पुरुषार्थ,
दिव्यत्वास गवसणी घालुनी, लाजविले सागरा ।।२।।
जाळून जातीच्या सीमा, स्पृश्यास्पुश्य विषमेख,
माणूस केला एक,
एक पताकेखाली आला, भारत समाज सारा ।।३।।
सारस्वत विज्ञाननिष्ठ, ओजस्वी वाक्प्रभुत्व,
शस्त्र शास्त्र हिंदुत्त्व,
कर जोडुनिया उभे राहू तव, तेजाच्या सत्कारा ।।४।।
झाकले डोळे तरीही, पूर्वेस उगवतो सूर्य,
साधूचे मरे न कार्य,
रक्तात चिरंतन वाहो, राष्ट्रभक्ती अमृतधारा ।।५।।
पुणे,
२८ मे २०२०, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
सूर्याला फक्त वंदन करू शकतो, त्याच्याकडून ऊर्जा आणि स्फूर्ती घेऊ शकतो. तात्यारावांना कोटी कोटी नमन.