एकटेपणा आणि एकान्त यात निश्चित फरक आहे. एकटेपणा ही एक मानसिक अवस्था आहे पण एकांत ही परिस्थितीतून निर्माण झालेली वास्तविकता आहे. पण या दोन गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा लक्षात येतं की लिहिणारे ही आपणंच बोलणारे ही आपणंच करणारे ही आपणंच .. स्वतःला सावरणारे ही आपणंच कारण या संगमावर मानसिक अवस्था आणि वास्तविकता या दोन प्रदेशांची संधी होते ..
Loneliness is what a human being fears the most.. Solitude is what an artist craves for!
~ Rohit Bapat
म्हणूनच
सगळंच अगदी सगळं पूर्ण झालं
की हक्काचा अपूर्णपणा अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं
अडगळीत नीटनेटकेपणा म्हणजे
गळलेली पानं पुन्हा फांदीवर चिकटवल्यासारखं वाटतं
मीही धुळीला दूर लोटलेलं नाही
जराशी आवरा आवर की चुकल्याचुकल्यासारखं वाटतं
अश्रू शब्द आठवणींचा ढिगारा
दिसला नाही की प्राचीन सवयी सुटल्यासारखं वाटतं
म्हणूनच ..
कोणीही नसण्याची सवय बरी
एकटेपणा नसला की फार एकटं पडल्यासारखं वाटतं
— 04/01/2014
इथेही तिथेही
मी असतो
इथे तिथेही
तरी नसतो
कधी कुठेही
तेच मेघ
तीच सांजवेळ
इथेही तिथेही
रात्र येते
रात्र जाते
पानही
हलत नाही
इथेही तिथेही
असणे काय
नसणे काय
तोच मी
माझ्यासाठी
इथेही तिथेही !
— 08/02/2014