इतिहासाची पाने पालटताना “पाटील” शब्दाबद्दल एक वेगळा संदर्भ सापडला. याबद्दल आम्ही पूर्वी वाचले नव्हते. शिलाहार राजवंशातील हरिपालदेव राजाचा ठाण्यातील आगाशी नावाच्या गावी शक संवत १०७२ सालचा एक शिलालेख सापडला होता. त्याच्या मजकुराचा उद्देश खालीलप्रमाणे

या मजकुरात “पट्टकिल” म्हणजेच पाटील असा उल्लेख ठळकपणे दिसत आहे.
हा शिलालेख वाचल्यावर आम्ही संशोधन सुरु केले. तेव्हा लक्षात आले की पट्टकिल हा शब्द प्राचीन काळात कायम वापरात आलेला आहे.
माळव्यात धर राज्यातील परमारांनी दिलेल्या एका दानपत्रात “प्रतिवासिनः पट्ट किलजनपदादिश्च बोधयति” म्हणजे निवासी, पट्टकिल (पाटील) आणि गावातील इतर मनुष्यांना राजा सूचित करत आहे.
म्हणजे पट्टकिल हा शब्द फार आधीपासून उपयोगात येत आहे.
या शब्दाची फोड खालीलप्रमाणे
पट्टकिल = पट्ट + किल
पट्ट या शब्दाचे दोन अर्थ आहेत
१) राजसी
२) गाव
किल या शब्दाचे अर्थ खालीलप्रमाणे
१) आधारस्तंभ किंवा मुख्यस्तंभ
२) जोर देण्यासाठी वापरलेले अव्यय (indeed)
त्यामुळे पट्टकिल या शब्दाचा “गावाचा आधारस्तंभ” असा होणे अगदीच सहाजिक आहे.
याच पट्टकिल शब्दाचा अपभ्रंश होत होत पाटील हा शब्द निर्माण झाला.
आणखीन एक गमतीशीर माहिती अशी की गावाचा मुख्य पुरुष म्हणून “महत्तर” अशी उपाधी देखील वापरला जात असे.
चिंतामण विनायक वैद्य यांच्या मते पट्टकिल हा शब्द आक्षपटलिक या शब्दावरून आलेला आहे. आक्षपटलिक म्हणजे गणनाधिकारी.
आपणा सगळ्यांना “पाटील” म्हणजे काय किंवा त्यांचे अधिकार काय असतात हे माहित होते. पण, पाटील या शब्दाचा असा रोचक इतिहास आणि व्युत्पत्ति असेल असे तुम्हाला वाटले होते का?
आवडल्यास जरूर शेअर करा!
शब्दयात्रीवर अनेक शब्दांची व्युत्पत्ति दिलेली आहे. नक्की वाचा.