श्री समर्थ रामदास स्वामींचा महाबळेश्वर आणि परिसरावर काही विशेष स्नेह होता हे ऐतिहासिक सत्य आहे. समर्थांनी अनेक वर्षे महाबळेश्वर आणि परिसरात कर्म धर्म आणि राष्ट्रभक्ती यांसाठी कार्य केले. खालील काव्यात समर्थांनी महाबळेश्वर, महाबळेश्वराचा इतिहास व या भागात उपलब्ध फळे, फुले, वनस्पती, कंदमुळे व भाज्या यांचे वर्णन केलेले आहे. समर्थांनी एका अत्यंत वेगळ्या विषयावर हे काव्य रचले. यावरून एक गोष्ट अशी देखील ध्यानात येते की, समर्थांच्या काळी देखील काही परदेशी भाज्या व फळे या भागात पिकवली जात होती! (source)
महाबळी अतिबळी । भीम भैरी पराक्रमी ।।
सुंदरा पंचगंगा त्या । कृष्णा वेण्या सरस्वती ।।१।।
गाईत्री सावित्री ब्रह्मा । विष्णु रुद्र गरुडध्वजु ।।
उमा महेश्वरा नंदी । सर्प मूषक पंचाननु ।।२।।
उगमे पूर्वभागीं तो । गायमुखें मनोहरें ।।
त्या तळी सुंदरा बागा । नाना तरु परोपरी ।।३।।
नारेळी पोफळी केळी । बाफळी बकुळी तुती ।।
केतकी मालती धात्री । काळोत्री तुळसी बहु ।।४।।
शतपत्री सेदरी नाना । आरंगुदी जास्विनी बहु ।।
पाडळी ढवळी दवनी । नीबाणी रायआंवळी ।।५।।
आनसी फणसी पेरी । खीरणी कविठी बहू ।।
नारंगी बदरी संबी । कर्वंदी तोरणी गुणी ।।६।।
खर्बुजी तर्बुजी सेदा । सेदण्या रायसेदण्या ।।
वाळकें कांकड्या तौन्सी । चीबडें तुरंजें बहु ।।७।।
खजुरी द्राक्ष आंजीरी । बादामे आक्रुटें झटे ।।
कलागडी तारवटी केळें । नारेळें बहुजीनसी ।।८।।
हुर्ड्या वोम्ब्या उळा ढाळे । वाटाणे फोलाणे चणे ।।
राताळे गाजरे वांगी । दही दूध तक्र नेटकें ।।९।।
मोहळ कांदे मुळें सेंगा ।मुग चौळे परोपरी ।।
उंस काळे काठे पुंडे । वेळा वाळाच शर्करा ।।१०।।
इतर अध्यात्मिक साहित्य