छत्रपती शिवाजी महाराज – काबुल आणि अफवांचे पीक Chhatrapati Shivaji Maharaj, Image by Datta Farande from Pixabay

छत्रपती शिवाजी महाराज – काबुल आणि अफवांचे पीक

Spread the love

काबुल ?

“छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” या विषयावर संशोधन करत असताना त्या काळातील पत्रव्यवहारांमध्ये एक फार विचित्र गोष्ट समोर आली. औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांना बळजबरीने किंवा एका षड्यंत्रात फसवून “काबुल” ला पाठवणार होता! होय! काबुल ला.. त्या काळच्या दोन पत्रकांमध्ये या गोष्टीचा (अफवेचा!) उल्लेख दिसतो. 

आम्ही याला “अफवा”च मानतो कारण वास्तव हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कधीही काबुल ला गेल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. 

आम्हालाही ही अफवा वाचून चक्रावल्यासारखे झाले. त्यामुळे वाचकांसमोर हा अफवांचा रोचक व भंडावून सोडणारा इतिहास मांडण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. दोन्ही पत्रकांचा खुलासा केल्यावर ब्लॉगच्या शेवटी “छत्रपतींबद्दल ही अफवा का पसरली?” याबद्दल आमचे मत मांडूच!

उल्लेख – १

या अफवेचा पहिला उल्लेख सापडला “ऐतिहासिक फारसी साहित्य, खंड ६ – औरंगजेबाच्या दरबारचे अखबार” मध्ये. या ग्रंथाचे संकलन व भाषांतर प्रा. गणेश हरी खरे (पुणे) यांनी केलेले आहे. 
खालील खबर इसवी सन १६ ऑगस्ट १६६६ (शके १५८८, श्रावण वद्य ११) रोजी नोंद केली गेलेली आहे. (म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आग्र्याहून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्याच्या एक दिवस आधी!)

छत्रपती शिवाजी महाराज - काबुल (औरंगजेबाच्या दरबारचे अखबार)
छत्रपती शिवाजी महाराज - काबुल (औरंगजेबाच्या दरबारचे अखबार)

“कुंवर रामसिंगास हुकूम झाला (औरंगजेबाने हुकूम दिला) की, ‘सीवा (छत्रपती शिवाजी महाराज) मनसूब कबूल करील अशा तऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यांस हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. त्याची येथून काबुल येथे नेमणूक करीन.’ 

टीप:
खबर इथे संपत नाही. ती इथे देत नाही आहोत याची कारणे खालीलप्रमाणे. 

पुढचा मजकूर विषयाशी संबंधित नाही. छत्रपती आपल्या गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे शत्रूचे लक्ष भलतीकडे वळवून कार्यभाग साधणे यात त्यांचा हात धरणं अशक्य होतं. त्यामुळे हा मजकूर जर संदर्भरहित वाचला तर गैरसमज होऊ शकतो. तेव्हा अनावश्यक वाद – विवाद टाळणे योग्य आहे.   

औरंगजेबाच्या मनात, छत्रपतींना काबूल ला पाठवायचा मनसुबा होता !?

ही खबर वाचून डोकं चक्रावून गेलं! कारण आजपर्यंत या घटनेबद्दल (अफवेबद्दल) फारसा कुठे उल्लेख आलेला नाही. 

उल्लेख – २

आधी वाटलं की हा एकंच उल्लेख आहे. पण आश्चर्य म्हणजे ही बातमी ईस्ट इंडिया कंपनीला आधीच मिळालेली होती. याचा पुरावा “शिवचरित्र कार्यालय पुणे” यांनी प्रसिद्ध केलेल्या “English Factory Records on Shivaji १६५९-१६८२” ग्रंथात सापडतो. 

सदर उतारा इसवी सन ८ जून १६६६ रोजी (औरंगजेबाच्या अखबारमध्ये उल्लेख यायच्या आधी!) ईस्ट इंडिया कंपनीच्या सूरत कचेरीतून कारवारच्या कचेरीत पाठवलेल्या पत्राचे भाषांतर आहे.

छत्रपती शिवाजी महाराज - काबुल (English Factory Records on Shivaji)

 “आत्ता तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे, राजाच्या (औरंगजेब) समोर सादर होणे याखेरीज, बातमी देण्यासारखे विशेष काहीही नाही, (कारण) छत्रपती शिवाजी महाराजांचे वागणे आणि इतर आचरण राजाच्या पसंतीस पडले नाही, ज्याच्यामुळे त्यांच्याशी कठोर व्यवहार करण्यात आला. त्यांच्या (छत्रपती शिवाजी महाराजांच्या) व्यक्तिमत्त्वाला इतर उमरावांप्रमाणे मूकपणे करबद्ध होऊन अपमानित होणं मुळीच खपले नाही. या विचारानेच ते (महाराज) संतप्त झाले, ज्याच्याबद्दल राजाला (औरंजेबाला) समजताच, त्यांची समजूत काढण्यासाठी राजा मोठ्या बढत्यांचा (हुद्द्यांचा) प्रस्ताव (लाच) घेऊन गेला. अशीही बातमी आहे की त्यांना (छत्रपती शिवाजी महाराजांना) त्याने (औरंगजेबाने) काबुल ला पाठवले आहे पण, आम्ही इथे दरबारापासून खूप दूर असल्याने या क्षणी त्यांना (छत्रपती शिवाजी महाराज) काबुल ला राज्यकर्त्याचे अधिकार देऊन उमराव म्हणून पाठवले आहे की (दरबारापासून, भारतापासून, दख्खनपासून) अंतरावर (दूर) ठेवण्यासाठी पाठवले आहे हे, सांगणे कठीण आहे.”

 डोकं भंडावून गेलं ना!? अर्थातच असं काही घडलं नव्हतं. महाराज कधीही काबुल ला गेले नव्हते. त्यामुळे निश्चितपणे असं म्हणता येईल एक रोचक अफवा आहे. 

आमचे मत 

तो काळ (१६६३-१६६६) जर लक्षात घेतला तर असे दिसून येते की, औरंगजेबाच्या राज्याला दोन दिशांहून प्रचंड विरोध होत होता. पश्चिमेकडून अफगाणी कबिले आणि दक्षिणेकडून मराठे. एकाच वेळी दोन ठिकाणी लढणे औरंगजेबाला जड जात होते. त्यातून पुरंदरचा तह झाला तरी देखील दक्षिणेतील मराठ्यांच्या साम्राज्याकडून असलेला धोका टळलेला नव्हता. तेव्हा धूर्त औरंगजेबाने निश्चितच असा विचार केला असण्याची शक्यता आहे की एका दगडात दोन पक्षी मारावे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बलाढ्य, शूर आणि बुद्धिवान नायक आपल्या बाजूने असावा असे कोणत्या राजाला वाटणार नाही? त्यामुळे हे हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने औरंगजेबाने हा विचार करण्याची शक्यता आहे.

म्हणूनच कदाचित फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाने मोठ्या पदाची लालुच महाराजांना दाखवली असणार. पण, तो विसरला की महाराज प्रखर राष्ट्रभक्त आणि मातृभूमीशी एकनिष्ठ आहेत! गमतीचा भाग असा की औरंगजेबाच्या अखबारमध्ये काबुल बद्दल उल्लेख १६ ऑगस्ट चा म्हणजे आग्र्याहून सुटकेच्या एक दिवस आधीचा आहे! हे पाहून देखील अनेक विचार मनात आले की उल्लेख नसलेल्या अशा किती गोष्टी, छत्रपतींनी गनिमी काव्याने समर्थपणे हाताळल्या असाव्या?

पण त्याबद्दल (पुरावे नसताना) प्रकटीकरण करणे हे देखील अफवा पसरवण्यासारखेच होईल. त्यामुळे या गोष्टींवर अधिक विचार करण्याची जबाबदारी आम्ही वाचकांवर सोडत आहो!

“छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” – ब्लॉग मालिका

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *