कोणत्याही साम्रज्याच्या गुप्तहेर खात्याबद्दल विशेष माहिती न मिळणे हे खरं तर त्या गुप्तहेर खात्याचे यशच आहे. आपल्या शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल देखील असंच आहे. शिवरायांच्या गुप्तहेरांबद्दल फारशी माहिती कुठे मिळत नाही. फक्त काहीच ठिकाणी त्यांचा थोडा फार उल्लेख केलेला आहे. त्यावरूनच समजतं की शिवरायांचे गुप्तहेर खाते किती कर्तव्यदक्ष होते. शिवकालीन गुप्तहेर म्हटलं की पहिलं नाव जे मनात येतं ते म्हणजे बहिर्जी नाईक. पण, बहिर्जी नाईक यांच्याही आधी हिंदवी स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे एक प्रमुख होते हे कुणाला माहित नसेल. त्यांचे नाव “विश्वासराव नानाजी प्रभु दिघे मुसेखोरेकर”! मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या बांधणीत विश्वरावांचे कार्य मोलाचे आहे.
विश्वासराव नानाजी प्रभु दिघे मुसेखोरेकर यांचे मूळ नाव नानाजी दिघे. विश्वासराव ही एक मानाची पदवी आहे, प्रभु ही जात (चांद्रसेनीय कायस्थ प्रभु) आणि मुसेखोरेकर कारण राहायला मुसे किंवा मोसे खोऱ्यात होते. विश्वासरावांचे पूर्वज कोकणातील पाली येथे देशमुख होते. त्यांच्यात वतनदारीवरून वाद झाला आणि विश्वासरावांचे ८ वे पूर्वज मिठप्रभु मोसे खोऱ्यात येऊन स्थायिक झाले. तिथे ते आदिलशाहीच्या अमलाखाली देशपांडे झाले. त्यामुळे नानाजी देखील वंशपरंपरेने देशपांडे वतनाचे धनी झाले. नानाजी प्रभुंनंतरही त्यांच्या वंशजांनी हिंदवी स्वराज्याला वाहून घेतले.
झालं असं की आदिलशाही अमलाखाली राहिल्याने त्यांना आदिलशाही राहणीमान, पेहराव आणि भाषा यांची चांगलीच ओळख होती. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली होती आणि त्यात मावळ प्रांतात हे स्वराज्य पसरवण्याच्या प्रयत्नात होते. मावळातील अनेक वतनदारांनी शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचाराचे स्वागत केले. आपली वतने सोडून हिंदवी स्वराज्यात सामील झाले. त्यांच्यापैकी नानाजी प्रभु देशपांडे हे एक होय. उपजत गुण, मावळ प्रांताची उत्तम जण आणि यवनांच्या राहणीमानाबद्दल अचूक माहिती यांमुळे नानाजी देशपांडे यांना शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याचे प्रमुख बनवले. विश्वासराव पंच हजारी सरदार होते (पाच हजार सैन्याचे नेतृत्त्व करणारे सरदार). म्हणजेच ते कोणी सामान्य सरदार नव्हते हे सांगणे न लगे!
त्यांची एक मोठी मोहीम म्हणजे फकिराचा वेष घेऊन अफझलखानाच्या हालचालींबद्दल अचूक माहिती शिवाजी महाराजांना पुरवणे. या मोहिमेबद्दल जवळपास कोणालाच माहित नाही. पण त्याचा उल्लेख “शिव-दिग्विजय” ग्रंथात आहे. त्याचप्रमाणे इतिहासकार राजवाडे यांनीही विश्वासराव नानाजी मुसेखोरेकर यांच्याबाबद्दल संशोधन केले आहे. फकिराच्या वेशात विश्वासराव अफझलखानाच्या गोटात जाऊन त्याच्या योजनेबद्दल सगळी माहिती गोळा करायचे आणि शिवरायांना सांगायचे. अर्थातच शिवाजी महाराजांना या माहितीची मदत झाली असणार यात शंका नाही. पण ही मोहीम इथेच थांबत नाही. अफझलखान पडल्यावर प्रतापगड आणि आजूबाजूच्या भागात भयंकर युद्ध झाले. त्यातही विश्वासराव नानाजी देशपांडेंनी हातात शास्त्र उचलले आणि यवनांवर तुटून पडले.
उंबरखेडच्या लढाईही विश्वासराव नानाजी प्रभु सामील होते अशी आख्यायिका आहे. पण अजून मला त्याबाबत कोणता पुरावा, पात्र किंवा कागद मिळालेला नाही.
पण यावरून एवढे तर नक्कीच सिद्ध होते की विश्वासराव नानाजी प्रभु दिघे देशपांडे मुसेखोरेकर हे अत्यंत चाणाक्ष गुप्तहेर आणि उत्तम लढवय्ये होते. तसेच हिंदवी स्वराज्याचा पाया मजबीची करण्यात त्यांचाही हातभार होता. दुर्दैवाने इतिहातील ही पाने कधी लोकांसमोर येत नाही (किंवा आणली जात नाहीत). त्यामुळे ही माहिती लिहिण्याचा खटाटोप. ही माहिती आपणही इतरांपर्यंत पोहोचवलं अशी आशा बाळगतो.
टीप: ऐतिहासिक मालिका आणि चित्रपट यांमध्ये काय दाखवतात आणि काय नाही याबद्दल इथे विचार केला जाणार नाही. कारण आम्ही मांडलेला इतिहास हा पुराव्यांनिशी मांडला जाईल, ऐकिवात कहाण्यांचा स्पष्टपणे आख्यायिका असा उल्लेख केला जाईल. तसेच शिव दिग्विजय ग्रंथ अगदीच समकालीन नसला तरीही त्याला दुजोरा मिळणारे साहित्य असल्यास माझ्या मते प्रमाण मानायला हरकत नाही.
इतिहासावरील पूर्वी प्रसिद्ध केलेले ब्लॉग इथे वाचायला मिळतील
मालिकांमध्ये दाखवला जाणारा इतिहास हा खूप एकांगी आहे. त्यापेक्षा सत्य संशोधनावर भर दिल्यास आणखी जास्त चांगले होईल.या उपयुक्त माहिती साठी विशेष धन्यवाद
खूप धन्यवाद 🙏🏻 मालिकांनी खूप जास्त नुकसान केलेलं आहे इतिहास आणि इतिहासाच्या अभ्यासाचे. आपल्याच नायकांना आपण विसरत गेलो!