शिवरायांचे गुप्तहेर खाते किती जबरदस्त होते हे त्यांनी केलेल्या यशस्वी मोहिमा, परिणामकारक हल्ले आणि रणनीतीमधील शिताफीवरुन उघड आहेच. पण त्यांच्या गुप्तहेरखात्याबद्दल फार कुणाला काही अवगत नाही हे ही त्या खात्याचे एक यशच आहे हे आपण विश्वासराव नानाजी प्रभु दिघे मुसेखोरेकर यांच्यावरील ब्लॉगवरून सिद्ध होतेच. पण तरीही जो काही ऐतिहासिक मजकूर, पत्रे इत्यादी साहित्य उपलब्ध आहे त्यावरून काही नवे समोर येतात ज्यांच्याबद्दल आपल्याला कधी ऐकायला देखील मिळत नाही. अशाच अपरिचित पण हिंदवी स्वराज्यासाठी मोलाची कामगिरी करणारे गुप्तहेर म्हणजे “सुंदरजी प्रभु”.
सुंदरजी प्रभु यांच्या जन्माबद्दल, लहानपणाबद्दल आणि शिवरायांच्या दरबारी रुजू होण्या आधीची फारशी माहिती उपलब्ध नाही. खरं सांगायचं तर, त्यांच्याबद्दल जास्त माहिती ईस्ट इंडिया कंपनीच्या (ब्रिटिशांच्या) फॅक्टरी रेकॉर्डस् मध्ये सापडते. सुंदरजी प्रभु यांना मुंबई प्रांताबद्दल उत्तम माहिती असावी हा अंदाज लावणं अयोग्य ठरणार नाही.
उपलब्ध माहिती अशी की सुंदरजी प्रभु मूळ उत्तरकोकणातील रहिवासी होते. जातीने चांद्रसेनीय कायस्थ प्रभु. सुंदरजी प्रभु यांचा उल्लेख फॅक्टरी रेकॉर्डस् मध्ये कधी Sunderjee Pervoe, कधी Sundergee Pervo, कधी Sundergee Pervoo आणि कधी Sundergee Pervoe असा केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या दरबारचा त्यांचा पहिला उल्लेख सापडला तो फॅक्टरी रेकॉर्डस् मध्ये.
उल्लेख १ ला : ६ ऑक्टोबर १६७३
सुंदरजी शिवाजी महाराजांच्या वतीने एका तहाच्या बोलणीसाठी मुंबई (Bombay) येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या दफ्तरात जातात. काही कारणांमुळे सुंदरजी प्रभुंनी सादर केलेले प्रस्ताव टोपीवाल्यांना (इंग्रजांना) पटले नाहीत. इंग्रजांनी आपल्या मागण्यांसह सुंदरजींना पुन्हा शिवाजी महाराजांकडे पाठवले.
उल्लेख २ रा : २६-२८ एप्रिल १६७६
इथून पुढे सुंदरजी प्रभु यांचा उल्लेख सापडतो तो, पोर्तुगीजांच्या राज्यात जाण्यासाठी त्यांनी इंग्रजांकडून मिळविलेला एक topass (टोपस) म्हणजेच दुभाषी. पण फक्त हा उल्लेख वाचून संपूर्ण गंमत कळणार नाही. कारण आधीच्या रेकॉर्ड मध्ये १०००० मराठा सैन्य सुरतेकडे चालले असल्याचा उल्लेख आहे. आणि पुढच्या रेकॉर्ड मध्ये उल्लेख येतो की हा लवाजमा सुंदरजी प्रभु नावाचा इसम घेऊन येत आहे.
पुढचा उल्लेख सांगतो की, “मोरो पंतांनी (मोरो पंत पिंगळे पेशवे) यांनी केशवराम यांच्या जागी सुंदरजी प्रभु यांना शिवाजी महाराज यांचा वकील म्हणून सुरतेला नेमले आहे. त्यांच्याकडे आपल्या अधिकाऱ्यांसाठी काही कागद आहेत. ज्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचा आदर ठेवला जाईल अशा अपेक्षेने काही गोष्टींची मागणी केलेली आहे.”
उल्लेख ३ रा : २७ मे १६७६
पुढचा उल्लेख सापडतो तो २७ मे १६७६ चा. पण त्या आधी २५ मे १६७६ साली, सुरत वरून सेंट जॉर्ज फोर्ट, दीव (गुजरात) येथे पाठवलेला छोटा मजकूर पाहू. त्यावरून सुरतच्या आजूबाजूला फिरणाऱ्या मराठ्यांच्या नदी लागू नये असा सल्ला आपल्या लोकांना दिलेला आहे. या मजकुरावरून असेही दिसते की इंग्रजांच्या मते शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या मनात असा काही दरारा निर्माण केलेला आहे की, शिवाजी महाराजांच्या सैन्याने पोर्तुगीजांच्या राज्याच्या मधून जरी जायचे म्हटले तरीही ते सैन्याला अडवत नाहीत! कमालीचा उल्लेख आहे ना?
२७ मे १६७६ च्या उल्लेखात इंग्रज म्हणतात की सुंदरजी प्रभु सुरतच्या आजूबाजूलाच वास्तव्यास आहेत. मात्र त्यांना परतावून लावावे किंवा समेट करावा अशी कोणतीही परिस्थिती अजून ओढवलेली नाही असे गावाचा अधिकारी म्हणतो. सांप्रत ते दुखावतील असं न वागणंच योग्य आहे. (माझ्या मते सुंदाजींचे तिथे असणे एक प्रकारचे मनोवैज्ञानिक दबावतंत्र होते)
उल्लेख ४ था : १ जून १६७६
पुढचा उल्लेख १ जून १६७६ सालचा आहे. ज्याच्यात, इंग्रजांनी सुंदरजी प्रभु यांच्याबरोबर जो peon (चाकर) पाठवला होता त्याने आणलेल्या खबरीचा दाखला आहे. तो असा की “काही वेळा आम्हाला शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या उपस्थितीमुळे धोका उत्पन्न होईल असं वाटलं होतं पण आता सगळे काही शांत आहे आणि कोणतीही भीती नाही. शिवाजी आपल्या देशी परतले आहेत आणि थंडीचा काळ येईपर्यंत तसे सगळे शांतच राहील.”
पुढचा उल्लेख ९ जून १६७६ चा सापडतो ज्यात सुंदरजी प्रभु, मोरोपंत पिंगळ्यांचे काही पत्र घेऊन सुरत येथील अधिकाऱ्याकडे येतात.
उल्लेख ५ वा : ४ जुलै १६७६
४ जुलै १६७६ मध्ये लिहिलेल्या रेकॉर्ड मधून असे समजते की, मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्या सैन्याने, रामनगरच्या राजाकडून, गुजरात मधील पिंडोळे (Pindolle) जिंकून घेतले. किल्ल्याच्या रक्षणासाठी ४००० सैन्य ठेवले. याच रेकॉर्डनुसार सुंदरजी प्रभु यांना हा भूभाग आवडलेला दिसत नाही. त्यांच्या मते हा भूभाग उजाड आहे.
उल्लेख ६ वा : १६ ऑक्टोबर १६७९
पुढचा उल्लेख मात्र दुःखदायी आहे. १६ ऑक्टोबर १६७९ सालच्या रेकॉर्डमध्ये, ११ ऑक्टोबर रोजी सुंदरजी प्रभु यांना गुप्तहेर असल्याच्या गुन्ह्यात पकडल्याचा उल्लेख आहे. रेकॉर्डनुसार, सुंदरजी प्रभुंना मुंबईत अटक करण्यात आली. “सुंदरजी प्रभु वेषांतर करून मुंबईत फिरत होते, पूर्वी आपण यांच्याशी वाटाघाटी केलेल्या आहेत त्यामुळे असे वेषांतर करून येण्याचा उद्देश गुप्तहेरगिरी सोडून दुसरा असूच शकत नाही. त्यामुळे यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून त्यांच्या येण्याचे नक्की निमित्त समजलेले नसून पुढच्या चौकशीसाठी त्यांना कारागृहात बंदिस्त करून ठेवण्यात आलेले आहे. त्यांना एकटे ठेवण्यात यावे, कुणालाही काहीही लिहिण्यास परवानगी देऊ नये, भेटायला देऊ नये आणि चोख देखरेखेखाली ठेवावे असे सांगण्यात आले.” असे या रेकॉर्डमध्ये वाचायला मिळते.
आख्यायिका अशी आहे की
“सुंदरजी प्रभु, मुंबईत भिकाऱ्याच्या वेशात फिरत होते. एका इंग्रज अधिकाऱ्याने या भिकाऱ्याकडे बघितल्यावर या भिकाऱ्याला आपण आधी पाहिलेले आहे असे वाटले. कारण यापूर्वी तो अधिकारी, सुंदरजी प्रभु जेव्हा वाटाघाटींसाठी जायचे तेव्हा तो अधिकारी तिथे असे. या भिकाऱ्याच्या आणि त्या सुंदरजींच्या चेहऱ्यात काहीतरी साधर्म्य आहे असे वाटून त्याने भिकाऱ्याला ताब्यात घेतले.. आणि सुंदरजी गनिमाच्या कैदेत अडकले.
याच्यापुढे मात्र सुंदरजी प्रभुंचा कुठेही उल्लेख मिळत नाही. त्यांचे पुढे काय झाले याबद्दल अजून तरी कुठे उल्लेख नाही. हीच एका गुप्तहेराची शोकांतिका आहे. सुंदरजी प्रभु गुप्तहेराचे आयुष्य तर जगलेच, आणि त्यांचा अंतही कदाचित गुप्तहेरासारखाच एकांतात, काळोखात झाला असावा असा माझा कयास आहे. अशाच थोर आणि निष्ठावान लोकांच्या खांद्यावर हिंदवी स्वराज्य उभे राहिले.
सुंदरजींना शब्दयात्री कडून लक्ष प्रणाम! 🙏