वाचकहो! जगात काही गोष्टी, काही घटना इतक्या रोचक असतात की त्या सांगितल्यावाचून चैन पडत नाही. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहम लिंकन आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. प्रत्येकाने किमान एकदा तरी त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेलच. त्यांचे फोटो, पुतळे आणि विशिष्ट शरीरयष्टी देखील सुपरिचित आहे. पण.. एक गोष्ट जी या सगळ्यात सर्रास दिसते ती आधीपासून तशी नव्हती. ती म्हणजे अब्राहम लिंकन यांची “दाढी”. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून जेव्हा १८६० मध्ये अब्राहम लिंकन निवडणुकीसाठी उतरले तेव्हा ते अजिबात दाढी ठेवत नसत. सध्याच्या भाषेत अगदी “तुळतुळीत”. मिशी सुद्धा नाही! पण १८६० मध्ये त्यांना ग्रेस बेडेल या ११ वर्षांच्या मुलीने एक पत्र लिहिले आणि सारं काही बदलून गेलं. या ब्लॉगमध्ये ते पत्र आणि त्याकाळच्या घटनांवर थोडक्यात प्रकाश टाकणार आहे. त्या आधी त्याकाळचे त्यांचे campaign poster पाहा, दाढी मिशी काहीच नाही!

मानसशास्त्राचा विचार केला तर, ते पत्र वाचताना हे देखील निश्चित लक्षात येईल की स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात याबद्दल त्यांची काही ठाम मते असतात आणि ही मते एका विशिष्ट वयात तयार होत जातात. तसेच स्त्रीच्या निसर्गदत्त निर्भिडतेचे दर्शन घडते.

ग्रेस बेडेल वेस्टफील्ड न्यू यॉर्क राज्यात राहणारी एक ११ वर्षांची मुलगी. काळ १८६० चा. अब्राहम लिंकन राष्ट्रपतीपदासाठी उभे राहिलेले होते. देशभर त्यांच्या प्रचारसभा घडत होत्या. अर्थात ते लोकप्रिय नेते असल्यामुळे जिथे जातील तिथे त्यांच्याबद्दल उत्सुकता होतीच. याच काळात ग्रेसच्या वडिलांनी अब्राहम लिंकन आणि आणखीन एका नेत्याचा फोटो घरी आणला. तो फोटो पाहून ती आपल्या आईला म्हणाली की अब्राहम लिंकन यांनी दाढी वाढवली तर ते आणखीन चांगले दिसतील. तिच्या आईने तिला अब्राहम लिंकन यांना पत्र लिहायची कल्पना दिली.
१६ ऑक्टोबर १८६० रोजी, या ११ वर्षांच्या निरागस, धीट व प्रामाणिक मुलीने अगदी सरळ, स्पष्ट पण नम्र शब्दात, एखाद्या वयात येणाऱ्या मुलीला शोभेल असे पत्र अब्राहम लिंकन यांना पाठवले. ग्रेस आणि तिच्या घरची काही मंडळी अब्राहम लिंकन यांचे चाहते होते.
हे पत्र वाचून पूर्वीच्या काळी व्यवहारात असणारा सरळपणा, आणि निरागसता आज कुठेतरी हरवली आहे की काय असा प्रश्न पडतो! तिने लहिलेल्या त्या ऐतिहासिक पत्राचा मजकूर खालीलप्रमाणे. (संदर्भ)
आदरणीय ए बी लिंकन,
माझे वडील नुकतेच एका सभेतून आले आहेत आणि त्यांनी येताना तुमचा व श्री हॅम्लिन यांचा फोटो आणलेला आहे. मी ११ वर्षांची एक लहान मुलगी आहे पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपण अमेरिकेचे राष्ट्रपती व्हावे, आशा आहे की आपल्यासारख्या महान व्यक्तीला मी पत्र लिहिणं तुम्हाला उद्दामपणा वाटणार नाही.
आपल्याला माझ्या एवढी मुलगी आहे का? असेल तर त्यांना खूप प्रेम आणि तुम्हाला या पत्राचे उत्तर द्यायला नाही जमले तर तिला पत्राद्वारे उत्तर द्यायला सांगा. मला चार मोठे भाऊ आहेत आणि त्यातले काही तर तुम्हाला मत देणार आहेतच. पण, तुम्ही जर दाढी वाढवली तर उरलेल्यांना देखील तुम्हाला मत देण्यासाठी मी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करेन, कारण तुमचा चेहरा निमुळता असल्यामुळे तुम्हाला दाढी शोभून दिसेल. सगळ्या स्त्रियांना दाढी आवडते आणि तुम्ही दाढी वाढवली तर त्या स्त्रिया आपल्या नवऱ्यांना तुम्हाला मत देण्यास नक्कीच सुचवतील. मी पुरुष असते तर नक्कीच तुम्हालाच मत दिलं असतं पण, मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनी तुम्हाला मत द्यावं यासाठी संपूर्ण प्रयत्न करेन. माझ्या मते तुमच्या फोटोमधील रेल्वेच्या कुंपणामुळे तो फोटो अधिकच छान दिसत आहे. मला एक नऊ आठवड्यांची एक छोटी बहीण आहे आणि आपल्या वयानुरूप खोडकर आहे. तुम्ही जेव्हा उत्तरादाखल पत्र पाठवाल तेव्हा ग्रेस बेडेल, वेस्टफील्ड, चॅटऑक्वा काऊंटी, न्यू यॉर्क या पत्त्यावर पाठवा. अजून काय लिहून. तुम्हाला पत्र मिळाले की वेळ मिळेल तेव्हा लगेच उत्तर पाठवा. गुड बाय.
ग्रेस बेडेल
असे हे पत्र अब्राहम लिंकन यांना मिळाले असेल आणि आपल्या दाढीबद्दल ग्रेस ने मांडलेले मत वाचले असेल, तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल?!
याबद्दल सुद्धा माहिती उपलब्ध आहे. अब्राहम लिंकन यांनी ग्रेस ला १९ ऑक्टोबर १८६० साली उत्तरादाखल पत्र लिहिले, ते खालीलप्रमाणे
कुमारी ग्रेस बेडेल
प्रिय कुमारी ग्रेस बेडेल तुझे १६ तारखेला पाठवलेले, अगदीच पटण्यायोग्य पत्र मला मिळाले. मला सांगताना वाईट वाटत आहे की मला मुलगी नाही. मला तीन मुले आहेत. एक मुलगा सतरा वर्षांचा, एक नऊ आणि सगळ्यात धाकटा ७ वर्षांचा आहे. ते आणि माझी पत्नी इतकाच माझा परिवार आहे. आता राहिला प्रश्न दाढीचा. मी आजतागायत कधीही दाढी वाढवली नाही. आता मी जर अचानक दाढी वाढवू लागलो तर लोकांना हा वेड्यासारखा नादिष्टपणा नाही का वाटणार?
ए लिंकन
अब्राहम लिंकन यांनी आपल्या दाढीबद्दल असा अभिप्राय दिला तरीही शेवटी त्यांनी दाढी वाढवायला सुरुवात केलीच! आणि मार्च १८६१ मध्ये अब्राहम लिंकन राष्ट्रपतिपदी निवडून आले. त्या आधी त्यांनी शपथविधी साठी रेल्वे ने जाताना १६ फेब्रुवारी १८६१ रोजी न्यू यॉर्क मधील वेस्टफील्ड येथे रेल्वे थांबवायला सांगितली कारण याच गावी त्यांची एक निस्सीम चाहती ग्रेस राहात होती. रेल्वे थांबल्यावर त्यांनी विचारलं
“माझ्याशी पत्रव्यवहार करणारी एक चिमुरडी याच गावी राहाते का?
“कोण आहे ती मुलगी एबी?” लोकांनी विचारलं
“ग्रेस बेडेल”, अब्राहम लिंकन यांनी उत्तर दिलं
आणि काही वेळातच ग्रेस त्यांच्या समोर होती! अब्राहम लिंकन यांनी ग्रेस शी अगदी आत्मीयतेने गप्पा मारल्या आणि तिला सांगितलं की “हे पाहा, तू सुचवलंस त्याप्रमाणे मी दाढी वाढवलेली आहे!” असं म्हणून त्यांनी ग्रेस चे चुम्बन घेतले.
खालील फोटो पाहा, ग्रेस बरोबर होती यात शंकाच नाही!

अब्राहम लिंकन आणि ग्रेस बेडेल यांच्या भेटीची आठवण म्हणून वेस्टफील्ड येथे एक पुतळा उभारण्यात आलेला आहे.
तर ही होती अब्राहम लिंकन यांच्या Iconic दाढीची रोचक आणि निरागस कहाणी.. आवडली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. एव्हाना ते देखील तेच तेच विषय वाचून कंटाळले असतील 🙂

अशाच आणखीन रोचक घटना आणि किस्से वाचण्यासाठी शब्दयात्री ला भेट द्या. तुम्हालाही लिहायचे असल्यास नक्की कळवा. अधिक माहिती या पानावर.