अनेक जणांनी (म्हणजे ज्यांनी सोशल मिडिया वर विहार केलेला आहे त्यांनी) एक विचित्र मुखवटा नक्की बघितला असेल. बारीक पण पल्लेदार मिश्या, या कानापासून त्या कानापर्यंत चेहरा व्यापलेलं हास्य आणि तरीही कोणत्याही अंगाने आनंदी न दिसणारा! किंबहुना मनात काहीतरी शिजत आहे, खदखदत आहे याची आशंका निर्माण करणारा हा मुखवटा. हा मुखवटा बंडाचे, अशांततेचे – अस्थिरतेचे एक प्रतीक बनलेला आहे. पण, या विचित्र मुखवट्यामागचा चेहरा कोणाचा आहे? हे फार कमी जणांना माहित असेल.
हा चेहरा आहे गाय फोक्स चा (Guy Fawkes किंवा Guido Fawkes). आज म्हणजे ३१ जानेवारी १६०६ साली याचा मृत्यू झाला. खरं तर त्याने भयंकर शिक्षेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुरुंगाच्या उंच इमारतीवरून उडी मारून जीव दिला. तो ही असा की आधी मान मोडेल आणि मग मृत्यू. गाय फोक्स ला राष्ट्रद्रोहच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली होती आणि त्याची शिक्षा अत्यंत भयंकर आणि बीभत्स होती. त्याच्यावर इंग्लंडच्या संसदेला दारुगोळा वापरून उडवण्याचा आरोप होता. आरोप सत्य होता आणि फक्त गाय फोक्स च नव्हे तर त्याचे अनेक साथीदार या कटात सामील होते.
त्या काळी इंग्लंडचा एकच अधिकृत पंथ होता “प्रोटेस्टंट” आणि जो कोणी याचे पालन करत नसेल, या पंथानुसार वागत नसेल तो गुन्हेगार ठरत असे. ही पद्धत निश्चितपणे चुकीचीच म्हणावी लागेल. अनेक दशके कॅथोलिक पंथीय लोकांचा इंग्लंडमध्ये छळ होत होता. राजा जेम्स ची आई देखील कॅथोलिक होती, त्यामुळे जेम्स राजा झाल्यावर हा अत्याचार कमी होईल असं कॅथोलिक पंथीय लोकांना वाटलं होतं. पण नेमकं उलटं झालं. अत्याचार आणखीन वाढले.
गाय फोक्स चा जन्म १३ एप्रिल १५७० साली उत्तर इंग्लंडमध्ये यॉर्क राज्यात, स्टोनगेट या गावी झाला. गाय फोक्स जरी प्रोटेस्टंट पद्धतीमध्ये मोठा झाला होता, शिकला होता तरी देखील वयाने मोठा झाल्यावर त्याने कॅथोलिक पंथ (ज्याचे पालन एक गुन्हा होता) स्वीकारला. अर्थात इंग्लंडमध्ये राहून या पंथाचे पालन शक्य नव्हतं. गाय फोक्स स्पेनमध्ये निघून गेला.
कॅथॉलिक स्पेनच्या बाजूने त्याने प्रोटेस्टंट डच लोकांशी झालेल्या युद्धात भाग घेतला. सैन्यात त्याची पत वाढत गेली आणि त्याने दारुगोळ्याची देखील उत्तम ज्ञान संपादित केले. युद्ध संपल्यावर त्याने आपला मोर्चा प्रोटेस्टंट इंग्लंडकडे वळवला. प्रोटेस्टंट पंथाची बळजबरी करणाऱ्या इंग्लंडच्या राजाला किंग जेम्स आणि त्याकाळच्या संसदेला त्याने आपले लक्ष्य बनवले. इंग्लिश कॅथोलिक चळवळीचे नेते रॉबर्ट कॅट्सबी (Robert Catesby) यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम आखली गेली. त्या गटातील सगळ्यांनी आपापली ओळख बदलून संसद आणि सांसद यांच्याकडे नोकऱ्या पत्करल्या. त्यातून त्यांनी माहिती गोळा केली आणि योजना आखली.
पण त्यांच्याच गटामधील एकाने फितुरी केली व ५ नोव्हेंबर १६०५ ला हा कट उघड झाला. त्यात गाय फोक्स पकडला गेला. सगळे कारस्थानी मारले गेले. गाय फोक्स ने ३१ जानेवारी १६०६ ला आत्महत्त्या केली. रॉबर्ट कॅट्सबी आणि इतरांना देखील मारण्यात आले. गाय फोक्सच्या देहाचे चार तुकडे करून इंग्लंडच्या चारही दिशांना पाठवण्यात आले, जेणेकरून लोकांना विद्रोहाच्या परिणामांबद्दल माहिती असावी.
इंग्लंडमध्ये या फसलेल्या कटाबद्दल उत्सव साजरा करण्यात आला. त्यात पहिल्यांदा गाय फोक्सचा पुतळा जाळला गेला, जी पद्धत आजपर्यंत सुरु आहे. इतिहासकार मानतात की आंदोलन किंवा एकत्र येऊन विरोध म्हणून प्रतिमा जाळण्याची सुरुवात इथून झाली, ज्या पद्धतीचा वापर आपल्याकडे कायम केला जातो. ५ नोव्हेंबर हा दिवस “गाय फोक्स डे” म्हणून साजरा केला जातो.
पण ही झाली ऐतिहासिक पार्श्वभूमी. पण जसजसे दिवस गेले तसतसे गाय फोक्सबद्दल किस्से वाढत गेले. हळूहळू गाय फोक्सने जे केलं ते योग्य होतं असं मानणारे लोक वैचारिक पटलांवर दिसू लागले. त्यांच्या विचारांमधून आणि लेखांमधून गाय फोक्सने जे केलं ते क्रूर सत्तेचा विरोध होता, हा विचार पुढे येऊ लागला. आणि हळूहळू गाय फोक्स विद्रोहाचे प्रतीक बनला.
पण या मुखवट्याचे काय? गाय फोक्सची चित्रे आधीपासूनच लोकांनी पाहिलेली होती. मग हा मुखवटा आला कुठून? तर झालं असं की सर्वप्रथम हा मुखवटा एक चित्रपट “व्ही फॉर व्हॅण्डेटा” या चित्रपटात दिसला. ज्यात नायक गाय फोक्सच्या चेहऱ्याशी साम्य असलेला मुखवटा घालून असतो आणि त्यातही एका काल्पनिक इंग्लंडमध्ये (dystopian England) जे क्रूर शासन आणि राज्यकर्ते आहेत त्यांना मारायची योजना आखतो. हा मुखवटा सगळ्यात आधी डेव्हिड लॉईड (David Lloyd) यांनी व्ही फॉर व्हॅण्डेटा, या पुस्तकासाठी १९८० साली बनवला होता. तो इतका लोकप्रिय झाला की चित्रपट बनवताना हा मुखवटा जशाच्या तशा वापरला गेला.
चित्रपट प्रसिद्ध झालाच पण त्याचबरोबर हा मुखवटा देखील प्रसिद्ध झाला. आणि तेव्हापासून हा मुखवटा सरकारविरोधी आंदोलनांमधून दिसू लागला. लोकांना त्या मुखवट्यावरील गूढगर्भी आणि कठोर हास्य खूप भावते. पुढे Anonymous या हॅकर्स च्या गृपने हा मुखवटा वापरायला सुरुवात केली. आणि अखेरीस हा मुखवटा एक विचार बनला, प्रतीक बनला बंडखोरीचा, अत्याचाराविरूद्ध उठलेल्या आवाजाचा आणि याहूनही जास्त अशांततेचा व अस्थिरतेचा. तसेही शांतता आणि स्थिरता येण्यासाठी अशांतता आणि अस्थिरता महत्त्वाची असते!
तर असा हा प्रवास या मुखवट्याचा आणि त्याच्या मागच्या चेहऱ्याचा!
इतर ब्लॉग्स इथे वाचा..