प्रकाशाची भीती फक्त असुराला असते. कारण अंधार हे असुराचं साम्राज्य आहे. पण इतक्या मोठ्या साम्राज्याचं अधिपत्य असूनही असुराच्या मनात एक भीती असते, की त्याचे अंधाराचे साम्राज्य एखाद्या दिव्याने उजळण्यापर्यंतच आहे. एका किरणात देखील त्याचे अंधाराचे साम्राज्य नष्ट क्षमता असते. असुर या किरणांच्या भीतीने ग्रासलेला असतो. त्यामुळे हा असुर सतत या दिव्याशी युद्ध करत असतो, दिव्याला नष्ट करायचा प्रयत्न करत असतो. याचं कारण असं की असुर हे जाणून असतो की दिवा कितीही छोटा असला तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तो अंधाराला झुंज देणं थांबवणार नाही, उजळणं थांबवणार नाही.
इथेच खरी गोम आहे. म्हणूनच हा अंधाराचा सम्राट एखाद्या दरोडेखोरासारखा दिव्याच्या तळाशी दबा धरून बसतो. जोपर्यंत ज्योत श्वास घेत असते तोपर्यंत या अंधाराची हिम्मत होत नाही बाहेर यायची. अवघ्या जगाच्या मनात भीती उत्पन्न करणारा, वाम मार्ग दाखवणारा हा अंधार एका छोट्याशा दिव्यापुढे अगदी हतबल आणि लाचार दिसतो! या अस्तित्वाने छोट्या आणि तरीही सामर्थ्याने मोठ्या दिव्याची आराधना करायला उगाच सांगितलं नाहीये आपल्या पूर्वजांनी!
त्यांनी हे ओळखलं होतं की ज्या मनात भीती असते त्याच मनात हा असुर स्वतःची जागा बनवू शकतो. एकदा या असुराने मानवाच्या मनात जागा बनवली की तो माणूस देखील दिव्याचा व प्रकाशाचा विरोध करतो. एकदा या अंधःकाराची सवय झाली की माणसाचं मन देखील सत्यरूपी प्रकाश पसरवणाऱ्या ज्ञानरूपी दिव्याच्या तळाशी लपून बसतं. दबा धरून. एकदा ज्ञानरूपी दिव्याचा प्रकाश नाकारला की आयुष्यात उरतो तो फक्त अंधःकार.. अज्ञान आणि असत्याचा अंधःकार.
आजुबाजूला पसरलेल्या या मनातल्या अधःकाराचे बीभत्स रूप बघितल्यावर
“तमसो मां ज्योतिर्गमय”
या सुवचनामागच्या करुणेची जाणीव होते आणि गौतम जेव्हा
“आत्म: दीपो भव”
म्हणाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हास्याच्या रहस्याचा थोडासा उलगडा देखील होतो.