अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर
दिवस फाल्गुन कृष्ण एकादशी, शके १६७५ होळकर घराण्याचे वारस, मल्हारराव होळकर यांचे पुत्र आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पती, खंडेराव होळकर यांचे कुंभेरीच्या किंवा कुम्हेरीच्या किल्ल्याजवळ निधन झाले. होळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठ्यांसाठी हा किल्ला ताब्यात घेणं अत्यंत गरजेचं होतं. किल्ला सुरज मल जात यांच्या ताब्यात होता. सुरज मल जाट ने, स्वकीयांच्या हातात मैत्रीचा हात देण्याऐवजी सिराज उद्दौला शी संगनमत केले. भारतात असे प्रसंग काही कमी नाहीत! श्रीमंत रघुनाथराव पेशवे, खंडेराव होळकरांच्या नेतृत्वाखाली लढत होते. कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा पडला होता. दुपारचे जेवण झाले आणि खंडेराव होळकर आपल्या मेण्यात बसून जात होते तोच शत्रूच्या बाजूने गोळीबार सुरू झाला आणि एक गोळी खंडेराव होळकरांना लागली. त्यातच त्यांचे देहावसान झाले.
अर्थातच होळकरांच्या घरात शोक पसरला. पण त्यात एक व्यक्ती जी अत्यंत दुःखी आणि तरीही मनाने स्थिर होती ती म्हणजे खंडेराव होळकरांची पत्नी अहिल्याबाई! मल्हारराव होळकरांनी आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे जिच्यावर प्रेम केले ती अहिल्या! सबंध होळकर कुटुंब जिच्या पुण्यप्रभावाने दीप्त झालेलं होतं ती अहिल्या! आज त्या अहिल्याबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण तरीही, अशा प्रसंगी अहिल्याबाईंनी आपले अवसान जाऊ दिले नव्हते, मानसिक तोल ढळू दिला नव्हता. त्यांना मोक्षाची फक्त एकच वाट दिसत होती. आपला पती निधन पावला म्हणून ही पुण्यात्मा, धर्मपरायण स्त्री सती जायला सज्ज झालेली होती. अहिल्याबाई होळकरांनी हे मनाशी निश्चित केलं होतं की त्या सती जाणार!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुनर्जन्म
मल्हारराव होळकर पुत्रनिधनाने व्यथित झालेले होते आणि तेवढ्यात त्यांना लक्षात आलं की त्यांची लेक, त्यांची सून अहिल्याबाई सती जायला निघालेली आहे. तेव्हा मल्हारराव आणखीनच दुःखी झाले! अशा दुःखी प्रसंगात जिथे पुत्रशोक आहे तिथे त्यांची लेक अहिल्याबाई सुद्धा त्यांना सोडून जाणार हे त्यांना सहन होईना. कोणीच नसेल तर या कुटुंबाचे काय? या घराण्याचे काय? या विचाराने मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंना सती जाण्यापासून थांबवले. अहिल्याबाई देखील आपल्या निश्चयावर ठाम होत्या. शेवटी मल्हारराव होळकरांना अहिल्याबाईंचे मन वळवण्यात यश आले. आणि त्याच क्षणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या देवीचा पुनर्जन्म झाला! आता त्या केवळ होळकरांची सून नव्हे तर संपूर्ण मसलतीच्या धर्मपरायण माता, मार्गदर्शक आणि आदर्श शासक बनल्या! अनेकानेक धर्मकार्ये त्यांच्या हातून घडली आणि त्यांचा लौकिक व नाव अमर झाले. सर्वार्थाने अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक आहेत!
मल्हारराव होळकरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची समजूत काढताना काढलेले उच्चार हे आख्यायिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. मल्हारराव होळकर अहिल्याबाईंना म्हणाले “बाई, मला उन्हाळ करित्येस कीं काय ? तूं माझे पाठीवर आहेस, तर अहल्या मेली व खंडू आहे मला भरंवसा.”
उत्तरार्ध
मल्हारराव होळकरांचा जटांवर रोष होताच. त्यात त्यांनी प्रतिज्ञा घेतली की, “सुरजमल जाटाचा शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेत टाकीन तर जन्मास आल्याचे सार्थक!” ही प्रतिज्ञा ऐकताच सुरजमल जाट घाबरला आणि जयाप्पा शिंदे यांना निरोप पाठवला “आजचे समयीं तुम्ही वडील बंधु व मी धाकटा बंधु आहें, कळेल त्या रीतीनें बचाव करावा.” तेव्हाच जाटाला अभयदान मिळाले!
हा ब्लॉग आवडल्यास नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तसेच इतर ऐतिहासिक विषयांवर ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा!