December 2, 2024
Pattie Boyd “Layla” – एक अपरिचित लैला

Pattie Boyd “Layla” – एक अपरिचित लैला

Spread the love

Pattie Boyd “Layla”

आज १७ मार्च म्हणजे Pattie Boyd “Layla” चा जन्मदिन! Pattie Boyd हे नाव ऐकल्यावर कदाचित तुम्हाला ही व्यक्ती नक्की कोण आहे हे समजणार नाही! संदर्भ देखील लागणार नाहीत. पण ज्यांना Rock संगीतात रस आहे त्यांच्या कानावरून Eric Clapton या कलाकाराचे Layla हे गाणे एकदा तरी जातेच. जिच्या प्रेमात पडून Eric Clapton ला हे अप्रतिम गाणे सुचले, ती Pattie Boyd! प्रेमकथा असो युद्धकथा दोन्ही रंजक असतात यात शंका नाही. पण ही कथा काही निराळी आहे. Pattie Boyd ही त्या काळची एक अत्यंत सुंदर स्त्री Eric Clapton ची लैला झाली कारण Eric तिच्यासाठी मजनू झालेला होता. ही प्रेमकथा, म्हणजे किमान पूर्वार्ध तरी नक्कीच रंजक आहे.

प्रेम आणि द्विधा

एखाद्या स्त्रीवर प्रेम असणे, जडणे यात काही विशेष नाही. पण जेव्हा अशा स्त्रीवर प्रेम जडते जी तुमची नाही, होण्याची शक्यता देखील नाही. इतकेच नव्हे, तर ती कोणा दुसऱ्याबरोबर नात्यात आहे. अशा वेळी हे प्रेम फार मोठी द्विधा बनते. एका बाजूने प्रेम आहे हे नाकारता येत नाही आणि दुसऱ्या बाजूने परस्त्रीवर प्रेम करणे, तिची कामना करणे हे देखील योग्य वाटत नाही. अशा वेळी काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न आहे जो ज्याला त्याला आपापल्या परीने सोडवावा लागतो. प्रश्न इतकाच आहे की, प्रेम जर जाणीवा आणि विचारांच्या पलीकडे गेलेले असेल तर त्या माणसाला आपले प्रेम व्यक्त करण्याखेरीज दुसरा मार्ग उरत नाही. आणि याची परिणीती बहुदा “मजनू होणे” असते. माहिती म्हणून सांगतो मजनू म्हणजे अरबी भाषेत वेडा. आख्यायिकेनुसार एक माणूस लैला नावाच्या स्त्रीवर इतका प्रेम करत होता की तो तिच्यासाठी अवहेलनेच्या, चेष्टेचा आणि प्रयत्नांच्या कोणत्याही थराला जायला तयार झालेला होता. त्यामुळे लोक त्याला मजनू म्हणजे वेडा म्हणू लागले.

Layla गाणे आणि विवेचन

अशीच काही अवस्था झालेली होती Eric Clapton ची जेव्हा तो Pattie Boyd च्या प्रेमात पडला. तेव्हा तिचे लग्न Beatles या अत्यंत प्रसिद्ध Rock Band च्या George Harrison बरोबर झालेले होते. त्यांचे संबंध तितकेसे चांगले नसले तरीही घटस्फोट झालेला नव्हता आणि ते एकत्र राहात होते. एका गाण्याच्या संयोगाने Eric आणि Pattie Boyd ची भेट झाली. तेव्हापासून Eric तिच्या प्रेमात पडला. इतका की त्याला काहीच सुचेना. तो सैरभैर होऊ लागला. जिच्यावर आपले प्रेम आहे ती आपल्याच एका मित्राची बायको आहे, हे त्याला सहन होत नव्हते, सांगता येत नव्हते आणि विसरता देखील येत नव्हते. त्या बेभान, बेधुंद काळात Eric Clapton ने आपल्या विचारांना प्रकट करण्यासाठी Pattie Boyd ला उद्देशून “Layla” नावाचे गाणे लिहिले! ज्यात तो मजनू सारखा आपल्या लैला ला त्याच्याबरोबर येण्यास सांगत आहे. खाली त्या गाण्याचे इंग्रजी बोल आणि थोडे विवेचन देत आहे.

What’ll you do when you get lonely
And nobody’s waiting by your side?
You’ve been running and hiding much too long.
You know it’s just your foolish pride.

तुझे आता दूर जाणे, लपणे आणि खेळ खूप झाले असं मजनू या गाण्यात म्हणतोय. प्रेमाची असहनीय वेदना आहे ही, जी शब्दांत मांडण्याजोगी नाही पण कधी ना कधी प्रत्येकाने अनुभवली असणार यात शंका नाही.

Layla, you’ve got me on my knees.
Layla, I’m begging, darling please.
Layla, darling won’t you ease my worried mind.

लैला तू मला गुडघ्यावर उभं केलंस, तुझ्या प्रेमाने मला आता पुरते व्याकुळ बनवले आहे. माझ्याकडे आता तुझ्याकडे प्रेम मागण्याखेरीज काहीच उरलेले नाही. हे बघ मी भीक मागतोय! प्रेमाची भीक मागतोय. प्रियकराची ही अवस्था तेव्हाच होते जेव्हा त्याला आपल्या प्रेयसीच्या होकारावर आपले आयुष्य टिकून आहे असे वाटते!

I tried to give you consolation
When your old man had let you down.
Like a fool, I fell in love with you,
Turned my whole world upside down.

Pattie Boyd आणि George Harrison तेव्हा आपल्या पारिवारिक नात्याच्या कठीण वाटेतून जात होते आणि तेव्हा Eric तिच्या आयुष्यात आला. त्याचे कुठेतरी वर्णन इथे दिसते. कदाचित Eric ने कधीतरी त्या नात्यात अडकलेल्या, नाखूष Pattie Boyd ला खांदा दिला असेल. सहानुभूती दाखवली असेल कदाचित रडण्यासाठी खांदा देखील दिला असेल. (प्रेमात काहीही करू शकतात लोक!) त्याचे वर्णन Eric करतो की तुला गरज होती तेव्हा मी तुझ्या आयुष्यात आलो, प्रेम जडले आणि माझे आयुष्यच पालटून गेले!

Layla, you’ve got me on my knees.
Layla, I’m begging, darling please.
Layla, darling won’t you ease my worried mind.

Let’s make the best of the situation
Before I finally go insane.
Please don’t say I’ll never find a way
And tell me all my love’s in vain.

लैला (Pattie Boyd) तू ही नाखूष आहेस, मी देखील तुझ्यावर वेड्यासारखे प्रेम करतोय मग असे अंतर का? आता मला या प्रेमात वेड लागायची पाळी आलेली आहे. तू नाही म्हणू नकोस.. फक्त तू नाही म्हणू नकोस! मला हे सांगू नकोस की माझे प्रेम वाया गेले, ते निष्फळ आहे. मी वेडा होईन!

Layla, you’ve got me on my knees.
Layla, I’m begging, darling please.
Layla, darling won’t you ease my worried mind.

मी भीक मागतोय, प्रेमाची भीक. हे बघ मी माझे सर्वस्व सोडून दिलेले आहे, मी संपूर्णपणे समर्पण करत आहे. माझ्या मनाला दिलासा वाटावा असं तुला खरंच वाटत नाही का?

पुढे Pattie Boyd आणि Eric Clapton यांचे लग्न झाले. अर्थात ते खूप काळ टिकू शकले नाही आणि त्यांनी १९८६ मध्ये घटस्फोट घेतला. Pattie Boyd वर लिहिलेल्या अनेक गाण्यांपैकी हे एक. Pattie Boyd होतीच इतकी सुंदर की कोणीही प्रेमात पडावं. Eric Clapton ने तिची तुलना लैला शी केली हे योग्यच होतं. George Harrison आणि Eric Clapton यांनी आपल्या लैलेसाठी Pattie Boyd साठी अनेक गाणी लिहिली आहेत. त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी लिहू. तूर्तास Layla वाचून प्रेमात वेडा झालेल्या मजनू ला आठवूया! मी सगळ्यांना विनंती कारेन की एकदा तरी Layla हे गाणं ऐका, Eric Clapton ला God म्हणजे देव असं का म्हणायचे ते समजेल आणि कदाचित काही जणांच्या “जुन्या” आणि “नाजूक” आठवणी ताज्या होतील 😊😉


आणखीन काही रोचक आख्यायिका इथे वाचा!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *