May 7, 2024
बिरुदावल्यांची जलपर्णी

बिरुदावल्यांची जलपर्णी

Spread the love

बिरुदावल्यांची जलपर्णी आणि वास्तव

भारतासारख्या देशात आणि मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात नद्या – नाले, तलावांवर माजणारी जलपर्णी नवीन नाही. तशी पाहायला गेलं तर एक वनस्पती, लांबून बघताना हिरवीगार दिसते अगदी एखादी एखाद्या दुलईसारखी. लहानपणी मला वाटायचं, आणि माझी खात्री आहे तुमच्यापैकी काही जणांना देखील कधी ना कधी, ‘जलपर्णी ही एक वनस्पती आहे, भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि त्यामुळे ती चांगली आहे’ असं वाटलं असणार. पण ही जलपर्णी खरं तर नद्या, नाले, तलाव आणि सर्व प्रकारच्या पाण्याच्या स्रोतांसाठी अत्यंत घातक आहे आणि पर्यायाने त्या पाण्यावर जगणाऱ्या सगळ्या सजीवांसाठी धोकादायक आहे हे नंतर समजलं. तशीच काही अवस्था बिरुदावल्यांची जलपर्णी आपल्या समाजाची करत आहे.

माणसांच्या, कधी कधी खरोखरच महान व योग्य माणसांच्या नावामागे लावल्या जाणाऱ्या बिरुदावल्या ही त्यांच्या आयुष्यावर माजलेली जलपर्णी असते. बिरुदावल्यांची जलपर्णी आपल्याला स्वच्छ पाण्यात पाहू देत नाही, कोणी पाहायचा प्रयत्न केला तर त्याला आपल्या विळख्यात घेऊन त्याला गुदमरून मारून टाकते.

जलपर्णीच्या त्या वरवर गालिच्यासारख्या दिसणाऱ्या आच्छादनाखाली अनेक विषारी रसायने जमा होतात, रोगराई पसरवणारे जीव जंतू तिच्या पानांवर जगतात इत्यादी गोष्टी तर आहेतच. पण याच्याहीपेक्षा अधिक घातक गोष्ट अशी की जलपर्णीमुळे स्वच्छ सूर्यप्रकाश पाण्यात शिरत नाही. सूर्यप्रकाश नसेल तर सगळे सजीव अस्तित्वच विषारी, रोगट आणि बीभत्स होऊन जाते. कदाचित म्हणूनच पाण्याच्या स्रोतांना भारतीय संस्कृतीत एक सजीव, सचेतन समजले गेले आहे. माणसांच्या, कधी कधी खरोखरच महान व योग्य माणसांच्या नावामागे लावल्या जाणाऱ्या बिरुदावल्या ही त्यांच्या आयुष्यावर माजलेली जलपर्णी असते हे माझं स्पष्ट मत आहे. बिरुदावल्यांची जलपर्णी आपल्याला स्वच्छ पाण्यात पाहू देत नाही, कोणी पाहायचा प्रयत्न केला तर त्याला आपल्या विळख्यात घेऊन त्याला गुदमरून मारून टाकते.

बिरुदावली आणि विशेषण

साधारणपणे १००% लोकांना बिरुदावली आणि विशेषण यातला फरक समजत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर गणवेषावर वेगवेगळ्या प्रकारची पदके असणे आणि वीरपुरुष असणे किंवा नावाच्या पुढे सतराशे साठ पदव्यांची अक्षरे असणे आणि बुद्धीमंत व गुणवंत असणे यांत जो फरक आहे तोच फरक बिरुदावली आणि विशेषण यांमध्ये आहे. आशा आहे एव्हाना फरक लक्षात आला असेल. पुढील गोष्टी सांगण्याच्या आधी हे स्पष्टीकरण गरजेचे आहे.

माणसाचे आणि पर्यायाने समाजाचे मानसशास्त्र, एखाद्या माणसाच्या पात्रतेचे, योग्यतेचे आणि महानतेचे प्रमाण कर्मांपेक्षा, कर्म-मिमांसेपेक्षा माणसाला लावलेल्या बिरुदावल्यांमधून जाणून घेते. बिरुदावल्यांनी वेढलेलं व्यक्तिमत्व बिरुदावली सांगते तशी”च” असली पाहिजे असा काहीसा समज होतो.

बिरुदावल्यांची ओझी एकदा माणसाच्या मेंदूवर टाकली की माणूस त्या ओझ्याखाली सत्य देखील नीट बघू शकत नाही. कारण त्याला भीती असते की हिरवीगार गालिचासारखी दिसणारी ही बिरुदावल्यांची जलपर्णी अनेक जण चांगली मानतात, पूज्य मानतात, इतकेच काय तर आवश्यक मानतात. या भीतीपोटी एक माणूस दुसऱ्या माणसाकडे माणसासारखा बघू शकत नाही. अदृष्य सत्यप्रमाणापेक्षा, दृष्य दाखल्यांना जास्त वजन मिळते. हे वजन समाज अगदी आनंदाने आपल्या पाठीवर मिरवतो. पण त्या समाजाला हे जाणवत नाही की या बिरुदावल्यांच्या भाराखाली आपला देखील एक कणा आहे! त्याला बाक आलेला आहे. त्या कण्याला वाकण्याची , झुकण्याची, कोणताही प्रश्न न विचारता लोटांगण घालण्याची आणि जो सत्य शोधायचा अथवा मांडायचा प्रयत्न करेल त्याच्या पाठीचा कणा मोडण्याची आता सवय झालेली आहे. इतकी की कधी स्वतः सरळ झाला, एखादी शंका आली तर हाच कणा, महत्पाप केल्यासारखं वाटून देहान्त प्रायश्चित्ताला देखील तयार होईल.

बिरुदावल्यांची जलपर्णी

माणूस आपल्या साधनेने देवत्त्व प्राप्त करू शकतो हे शास्त्र सांगते. भारतीय सनातन संस्कृतीत सगळ्या ज्ञानाचे, मिमांसेचे मूळ प्रश्नोत्तरांत आहे. उपनिषदांत अनेकांनी शंका, प्रश्न विचारून ज्ञानार्जन केलेलं आहे, कधी कधी तर थेट परमेश्वराच्या अस्तित्त्वावर देखील प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाने तरी दुसरं काय केलंय? प्रश्न विचारलेच नाहीत तर उत्तर कुठून मिळणार? ज्ञान कुठून मिळणार? आणि पर्यायाने सत्य कसे समजणार? कुणाला जर दुसऱ्या माणसाचा आदर्श घ्यायचा असेल, त्याचे जीवन अभ्यासायचे असेल तर मुळात त्याच्या कर्तृत्त्वाबद्दल, विचारांबद्दल अत्यंत नास्तिक भावाने प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे. या प्रश्नोत्तरांच्या खांद्यांवर सत्याची पताका आणि धर्माची पालखी वागवायची असते. तरच माणसाचे व समाजाचे मानसिक आणि वैचारिक संतुलन टिकून राहू शकते.

पण..

दुर्दैवाने आजकाल, म्हणजे अवघ्या ३०-४० वर्षांत प्रामुख्याने महाराष्ट्रात एक फार मोठा सामाजिक बदल झालेला आपल्याला दिसून येईल. सध्या जागोजागी माणसांच्या नावांच्या मागे बिरुदावल्यांची थप्पी दिसते, जलपर्णीसारखी! समाज या जलपर्णीच्या रंगाने, आकाराने आणि व्याप्तीने इतका भारावलेला असतो की त्या माणसांच्या आयुष्यात प्रश्नांची ज्योत घेऊन डोकावताच येत नाही. सूर्यप्रकाशाच्या अभावाने जसे पाणी निर्जीव, निकस आणि अयोग्य बनते त्याचप्रमाणे मिमांसाहीन चरित्रदर्शन उथळ, पोकळ आणि सत्त्वहीन बनते. बिरुदावल्यांची राजकीय व सामाजिक धास्ती इतकी जबरदस्त असते की त्यांच्या पलीकडे सुद्धा काही सत्य असू शकते यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. आणि चुकून एखादी बिरुदावली दोलायमान करणारा प्रश्न आलाच तर समाज प्रश्न विचारणाऱ्याला शिक्षा करतो. अजब न्याय आहे!

बिरुदावल्या आणि समाज

त्याहूनही दुर्दैवाची बाब अशी की सध्या जवळजवळ सगळ्या बिरुदावल्या जातीच्या किंवा समूहाच्या भ्रामक प्रतिष्ठेची, राजकीय – सामाजिक शक्तिप्रदर्शनाची आणि अंधाभिमानाची प्रतीके बनलेली आहेत. अभिमान, आदर आणि मान-सन्मान यांचे महत्त्व मी जाणतो. पण, कोणाबद्दल इतकाही अंधाभिमान असू नये की प्रश्न विचारणे द्रोह वाटू लागेल. सध्या हेच होत आहे. मी मागे एकदा म्हणालो होतो, की कुणाला जर प्रश्न आणि उत्तरदायित्त्वापासून मुक्त करायचं असेल तर त्या माणसाला देवाचा दर्जा द्यायचा! एकदा माणसाला देव केलं की त्याच्या कोणत्याही कार्यावर, विचारावर आणि मतावर प्रश्नचिन्ह लावायचे नाही हा कित्ता गिरवला जात आहे. प्रश्न विचारणारा कसा द्रोही आहे हे सिद्ध करायला सगळे सरसावतात. त्यातून जर द्रोह्याची जात राजकारणाला अनुकूल असेल तर विचारायलाच नको!

कुणाला जर प्रश्न आणि उत्तरदायित्त्वापासून मुक्त करायचं असेल तर त्या माणसाला देवाचा दर्जा द्यायचा! एकदा माणसाला देव केलं की त्याच्या कोणत्याही कार्यावर, विचारावर आणि मतावर प्रश्नचिन्ह लावायचे नाही हा कित्ता गिरवला जात आहे.

आणखीन एक आजार हल्ली चौकाचौकात, खांबांवर दिसू लागला आहे. अति आदराचे बीभत्स प्रदर्शन फ्लेक्स वर मांडलेले बघायला मिळत आहे. थोडक्यात चौकाचौकात, गल्लोगल्ली अंधाभिमानांचे अड्डे जमू लागलेले आहेत. मनाला येईल त्या बिरुदावल्या, आपापल्या लाडक्या माणसांना देऊन मोकळे होतात. हे करत असताना, तो माणूस खरंच योग्य आहे का? याबद्दल यत्किंचितही विचार त्यांच्या मनात येत नाही. याचे कारण असे की त्या बिरुदावल्यांच्या ओझ्याखाली सत्याच्या कण्याचा चुरा झालेला असतो. दुर्दैव असे की बहुदा अयोग्य व्यक्तींसाठीच बिरुदावल्या लावलेल्या दिसतात. हे म्हणजे परीक्षा उत्तीर्ण व्हायच्या आधीच पदवी देण्यासारखं आहे.

बिरुदावली न लावता नाव घेतले तर कोणाचे कर्तृत्त्व कमी होते का?

समाजाच्या भावना, या बिरुदावल्यांच्या बाबतीत एखाद्या गळूसारख्या नाजूक झालेल्या आहेत. नुसत्या स्पर्षाने देखील दुखावतात. प्रश्नांनी दुखावणारा समाज आतून भुसभुशीत झालेला असतो. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की कधी जर कुठल्या महापुरुषाचे नाव बिरुदावली न लावता घेतले तर चौफेर दुखावलेली मने जातीवादाचे भाले घेऊन अंगावर धावून येतात. विशेष म्हणजे या बिरुदावल्या कोणत्याही महापुरुषाने स्वतः लावून घेतलेल्या नाहीत. म्हणजे “चायपेक्षा किटली गरम” अशी गत झालेली आहे! बिरुदावली न लावता नाव घेतले तर कोणाचे कर्तृत्त्व कमी होते का? आदर कमी होतो का? या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर तुमची सत्यनिष्ठा भुसभुशीत आहे हे समजायला हरकत नाही. त्यातून बोलणाऱ्याची सामाजिक ओळख बघून कधीकधी या भुसभुशीत व तकलादू सत्यनिष्ठेची तीव्रता अधिक वाढलेली दिसते.

सांगायचा मुद्दा इतकाच की जोपर्यंत आपला समाज, ही बिरुदावल्यांची जलपर्णी मुळांसकट काढून टाकणार नाही तोपर्यंत त्या माणसांच्या विचारांचा, आदर्शांचा आणि मतांचा निर्लेप साठा कुणाच्याही उपयोगात येणार नाही. बिरुदावल्यांच्या जलपर्णीखाली या माणसांच्या चरित्रांची होणारी घुसमट थांबणार नाही! तसेच अयोग्य, अपात्र आणि सदोष माणसांच्या नावामागे बिरुदावल्यांचा दबदबा वाढणार नाही. योग्य माणसाकडे सामर्थ्य असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच अयोग्य माणसांकडे सामर्थ्य नसणे! बिरुदावली आदराचे प्रतीक असले पाहिजे, सत्यसाधनेला थोपण्याचे शस्त्र नव्हे..

शेवट ज्ञानदेवांच्या एका ओवीने करत आहे,

तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां ॥

(आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात.)
– अध्याय १५ ओवी २७६ –


इतर ब्लॉग्स इथे वाचा -> शब्दयात्री ब्लॉग्स

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *