प्रति
मृत्युंजयी तात्याराव सावरकर,
तुमचे चरणस्पर्श करून काही शब्द मांडायचा यत्न करतो आहे, जे काल २४ जुलै २०२२ सकाळपासून मनात एखाद्या वावटळासारखे घोंगावत आहेत. ज्या क्षणी मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाने “मृत्युंजयी सावरकर” हे शब्द मंचाच्या पार्श्वभूमीवर मांडलेले पहिले, तेव्हापासून हे मानसिक धैर्य आणि शब्दशक्ती गोळा करायचा प्रयत्न करत आहे. कारण, अथांग आणि अनंत आकाशाच्या व्याप्तीचे वर्णन, त्याचे विवेचन आणि समालोचन करण्याची योग्यता माझ्यात नाही हे जाणतो. आभाळाला चिमटीत पकडण्याची ही चेष्टा आहे. आणि तरीही, भक्ताला जशी देवाची प्रार्थना करण्यासाठी कुठला शास्त्राधार लागत नाही त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यपटाचे पारायण करण्यासाठी मला किंवा कुठल्याही सावरकरप्रेमीला कोणत्याही पात्रता-परीक्षेचा आधार घ्यावा लागेल असे मला वाटत नाही.
एका शाळेने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आयोजित केलेला एक कार्यक्रम, इतकंच मनात घेऊन मी गणेश कला क्रीडा मंचात प्रवेश केला होता. प्रमुख पाहुणे देखील नावाजलेले सावरकरप्रेमी होते. त्यामुळे बहुदा हा कार्यक्रम देखील इतर अनेक कार्यक्रमांप्रमाणे होणार याची जवळजवळ खात्री झालेली होती. त्यामुळे किमान तुमचे नाव, शब्द कानावर पडतील, तुमचे स्मरण होईल आणि ते करताना विद्यार्थ्यांना बघता येईल या विचाराने मी बसलो होतो. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक भाबडी आशा होतीच की तात्यारावांचा कार्यक्रम आहे तर आज काही ना काही वेगळं मनात घेऊन जाणारच. विद्यार्थी मंडळी गाणी, नृत्य आणि नाट्यप्रवेश सादर करणार हे माहित होतं त्यामुळे ती उत्सुकता देखील होतीच. दीपप्रज्वलनानंतर आणि ईशस्तवनानंतर सभागृहातले वातावरण हळुहळु भारावले जात होते याची पुसटशी कल्पना मनाला स्पर्श करून गेली.
आदर सत्कार झाले, सोपस्कार झाले. पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कुंटे सरांचं भाषण ऐकताना ज्या गोष्टीचं मला खरोखर कौतुक वाटलं, ते म्हणजे ‘एखादी संस्था इतक्या उघडपणे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्त्व यांबद्दल बोलत आहे’! कदाचित या आणि इतर अनेक राष्ट्रवादी, सावरकरप्रेमी आणि हिंदुत्त्ववादी संस्थांशी निगडित मंडळींसाठी हे नवल नसेल पण, या विचारांशी फारसा संबंध नसलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि वयाच्या नंतरच्या टप्प्यात सावरकर व हिंदुत्त्व या संकल्पनांबद्दल समजून घेतलेल्या मला हे फार विशेष वाटलं. आदर्श नेहमी जपूनच निवडले पाहिजेत. शाळकरी मुलांच्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श ठेवण्याचा हा ध्यास अत्यंत स्पृहणीय आहे. अशा शाळा गावोगावी असायला हव्या. उद्या लाखोंच्या संख्येने सावरकरप्रेमी, हिंदुत्त्वावर विश्वास असणारे अशा शाळांच्या शोधात फिरतील तेव्हा त्यांच्या पदरी निराशा पडता उपयोगी नाही. आता इथून पुढे येणाऱ्या पिढीला तुमच्या विचारांपासून वंचित ठेवणाऱ्या संस्था आम्हाला नकोत.
सभागृहाच्या अंधारात बसून मी सतत स्वतःला प्रश्न विचारत होतो “हे सगळं आम्हाला कधीच का सांगितलं गेलं नाही? आम्हाला तात्यारावांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल आणि हिंदुत्त्वाबद्दल कधीच का सांगितलं गेलं नाही? त्यांचे काव्य, नाटक, समाजसुधारणा वगैरे सगळं काही डावलून, स्वातंत्र्यवीर सावरकरांना एखाद्या परिच्छेदापुरता विषय का करून ठेवलेला आहे?” आपल्या शालेय अभ्यासक्रमात हिंदू, हिंदुत्त्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कधीही काहीही सांगितलं का गेलं नाही? किंबहुना सर्वधर्मसमभाव नावाची एक अगम्य खिचडी जी मूळ संविधानात देखील नव्हती ती गळी उतरवण्यात आली. त्यातून निर्माण झाला एक संभ्रमित समाज. देश, धर्म, समाज, सत्य आणि इतिहासाशी फारकत झालेला समाज. तात्याराव तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून भरकटवण्याचा अतोनात प्रयत्न झालेले आहेत. पण ते प्रयत्न अशा कार्यक्रमांच्या द्वारे पुसून टाकले जाऊ शकतात यात वाद नाही.
आधी मी समजायचो की देवाची कृपा म्हणून आम्हाला थापेबाजीच्या इतिहासात रुतून न बसता सत्य समजून घेण्याची बुद्धी झाली, नाहीतर आम्हाला “सावरकर” जरासुद्धा समजले नसते. पण मंचावर चिमुकल्यांनी “जयोस्तुते” चा सूर लावला तसे डोळ्यांतून टचकन् पाणी आले आणि विजेसारखा साक्षात्कार झाला की, ही देवाची कृपा जरी असली तरीही मूळतः स्वातंत्र्यवीर सावरकर, हे असे तेजोमय आकाश आहे की जे तुम्ही कुठेही गेलात तरीही दिसल्याशिवाय, स्वतःच्या अथांगतेची परिणीती दिल्याशिवाय राहणार नाही! त्यामुळे थोडा विचार करण्याची योग्यता असलेल्या प्रत्येकाला सावरकर दिसल्यावाचून राहणार नाही. आम्हाला या आकाशाचे, या तेजाचे दर्शन आधी का घडले नाही? या विचाराने बसल्याबसल्या रडू कोसळले. संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत एकही क्षण असा गेला नाही जेव्हा माझ्या पापण्या कोरड्या पडल्या. मी अविरत रडत होतो, इतका की कार्यक्रम संपला तरीही काही वेळ मी बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतो. आत्ताही भरल्या डोळ्यांनी मी हे सर्व काही लिहीत आहे.
कार्यक्रमाची मांडणी इतक्या उत्तम प्रकारे हाताळलेली फार क्वचित बघायला मिळते. मी स्वतः या क्षेत्राशी निगडित असल्याने मी हे अधिकारवाणीने सांगू शकतो. संहिता अत्यंत थेट होती, कोणतेही शब्द राखले नाही, कोणतेही विचार रोखले नाही. तात्यारावांसारख्या प्रखर व्यक्तिमत्त्वाचा ठाव घ्यायचा असेल तर शब्दफेक देखील तितकीच धारदार असणं गरजेचं आहे. माझं स्पष्ट मत आहे की निवेदन करणारी लहान मुलेच जणू मृत्युंजयी सावरकर या कार्यक्रमाचे आधारमंच झालेले होते. अत्यंत सुंदर शब्दफेक, तडफदार उच्चार आणि तरीही सहजभाव! त्या चिमुरड्यांनी सबंध कार्यक्रमाचे लगाम आपल्या हाती घट्ट धरून ठेवलेले होते. इतक्या लहान वयात ही समज!? हे फारसे पाहायला मिळत नाही हे निश्चित. कुठेही ताल मागे पुढे नाही, ठेका चुकला नाही आणि स्वर कमी पडला नाही. याचे श्रेय नक्कीच शाळेतील शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि मुलांच्या आई वडिलांना देखील द्यावे लागेल. तात्याराव, तुम्ही हे सगळं पाहिलं असेलंच, माझी खात्री आहे.
पुढे तुम्ही रचलेली शिवाजी महाराजांची आरती, बाजी प्रभु देशपांडेंचा पोवाडा इत्यादी. त्यांच्यामागची तुमची वैचारिक भूमिका यांचे उत्तम प्रतिपादन केले गेले. नृत्य आणि गायकांनी तर सबंध मंच भारावून टाकला होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हे सगळं प्रत्यक्ष वादकांसमवेत! छोट्या छोट्या मुलांच्या खांद्यावर हे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य निर्माण करणाऱ्या शिक्षकांचे देखील तितकेच कौतुक गरजेचे आहे. या कार्यक्रमातील आणखीन एक अत्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे फक्त तुमचा आयुष्यपट न उलगडता जे काव्य सादर होणार आहे त्याबद्दल सुयोग्य शब्दात पार्श्वभूमी देखील मांडली जात होती. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत कित्येक विद्यार्थी येत होते आपापले काम सादर करत होते आणि जात होते. नंतर नंतर मला त्यांचे वेगळे चेहरे न दिसता सगळे एकसमान दिसू लागले होते, प्रत्येकाच्या अंतर्मनात “स्वातंत्र्यवीर सावरकर” नावाच्या भारूडाने जागा व्यापलेली आहे हे स्पष्ट जाणवत होतं. सगळेच जणू सावरकर झालेले होते. तात्याराव तुम्हाला नक्कीच उचकी लागली असणार!
इतक्या वेळा “ने मजसि ने परत मातृभूमीला” वाचून देखील तुमच्या शब्दातील तळमळीने प्रत्येक वेळी रडू येतंच. कालही अश्रु आवरता आले नाही. काय काय पाहिलं, भोगलंत तुम्ही? देवाने तरी काय विचार करून तुम्हाला घडवले होते तात्याराव? इतक्या कठीण परिस्थितीत देखील मातृभूमीसाठी जगण्याची आणि “मारिता मारिता मरेतो झुंजेन” म्हणण्याची शक्ती तुम्हाला कशी मिळाली? याची थोडी कल्पना आम्हाला आहे तरीही, तुम्ही ती शक्ती फक्त आत्मसात केली नाहीत तर समाजासाठी, एखाद्या प्रचंड मशालीसारखी धगधगत पेटती ठेवलीत. तात्याराव त्याच मशालीच्या प्रकाशात आम्ही आमचे स्वत्व शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हा कार्यक्रम देखील त्याचाच एक भाग. तुम्ही फैलावलेला हा देशप्रेमाचा आणि हिंदुत्त्वाचा प्रकाश कित्येक लहान लहान ज्योतींना उजळत आहे हे पाहून तुम्हाला नक्की आनंद झाला असेल! कारण मुळात तुम्ही गेला यावरच माझा विश्वास नाही. क्षणभर डोळे मिटले म्हणून आकाशाचे अस्तित्त्व संपत नाही, आणि देहरूप झाकले गेले म्हणून दिव्यत्त्व नश्वर होत नाही!
कालच्या कार्यक्रमात आणखीन एक आवडलेली गोष्ट म्हणजे तुमच्या नाट्यपदांचे, प्रतिशब्दांचे आणि “सन्यस्त खड्ग” मधील एका प्रवेशाचे सादरीकरण. कदाचित आज त्या मुलांना हे केवळ नाटक वाटेल पण उद्या हेच शब्द त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरतील. त्या काळी ब्रिटिशांनी घातलेल्या ‘सक्रिय राजकारणात सहभाग घ्यायचा नाही’ या जाचक अटीला बगल देत नाट्याचा आधार घेऊन समाजप्रबोधन करण्याची तुमची क्लुप्ती भल्याभल्यांना सुचली नसती. देशावर आलेले सशस्त्र संकटावर जर मात करायची असेल तर दुबळ्या अहिंसेचा काहीही उपयोग नाही हे तुम्ही सांगितलं. पण स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म यांबद्दल जराही अभिमान बाळगू न देण्याच्या एककल्ली उद्देशाने निर्माण केलेल्या अभ्यासक्रमाच्या गर्द छायेखाली वाढलेले आम्ही अजूनही “अहिंसा परमो धर्मः” च्या पलीकडे “धर्म हिंसा तथैव च” पर्यंत पोहोचू शकलेलो नाही याचे मनाला दुःख आहे. पण मी खात्री देतो की परिस्थिती बदलत आहे. सत्य किती दिवस लपून राहणार?
जातींच्या नावाखाली समाजाचे तुकडे करण्याचे उद्योग अनेक वर्षांपासून सुरु आहेत, ज्याला उत्तर तुम्ही हिंदुत्त्वाने दिले. नुसते उत्तर दिले नाही तर त्यानुसार वागून देखील दाखवले. एखाद्या समाजाचा उद्धार करायचा असेल तर त्यासाठी त्या समाजातून पलायन हा मार्ग नसून, त्या समाजात राहून त्यातील अनिष्ट गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न करणे हा योग्य मार्ग आहे ही तुमची शिकवण. मंदिरांचे दरवाजे सर्वांना खुली असले पाहिजेत, हिंदू तो बंधू ही धारणा असली पाहिजे हा तुमचा संदेश आजही जिवंत आहे. निव्वळ काही निवडक राजकारणी, तथाकथित स्वातंत्र्यसेनानी आणि महान आत्म्यांचे महत्त्व वाढावे म्हणून तुमचे हे महान कार्य आमच्यापासून, भारताच्या अनेक पिढ्यांपासून लपवले गेले. गम्मत पाहा तात्याराव, तुम्हीच सांगितलेल्या शास्त्रीय दृष्टिकोनाच्या आधारावर आज आम्ही ही माहिती गोळा करत आहोत, अनेकांपर्यंत पोहोचवत आहोत ते ही पुराव्यांनिशी! हे सगळे विचार काल कार्यक्रम बघत असताना मनात लाटांसारखे उसळत होते. मनात सगळ्या विचारांचा आणि भावनांचा कल्लोळ सुरु होता. मनोमन देवाचे आभार मानत होतो. शेवटी मी डोळे पुसायचे देखील सोडून दिले. प्रत्येक अश्रु तुमच्या चरणी वाहिले जात आहेत याबद्दल मी निःशंक होतो.
“शतजन्म शोधिताना” सुरु झाले आणि मी त्या भारावलेल्या परिस्थितीत देखील जरा भानावर आलो. अनेक जणांना तुमच्याबद्दल जे काही थोडं फार माहित आहे ते म्हणजे स्वातंत्र्यसंग्राम, हिंदुत्त्व, समाजसुधारणा यांच्या अनुषंगानेच. फार थोड्या लोकांना तुमच्या कुटुंबाच्या सहभागाबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल माहिती आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा एक कवी म्हणून हे पद मी वाचतो किंवा ऐकतो तेव्हा स्मरण होते ते ‘येसू वहिनींचे’! ज्या वयात जोडपी रंगीबेरंगी स्वप्ने रंगवतात त्या वयात तुम्ही आणि वाहिनी, भारताला स्वातंत्र्य कसे मिळेल? याचा विचार करत हाल अपेष्टा सोसत होते. आपल्या जीवावर उदार होवून, भुकेचे व दारिद्र्याचे चटके सहन करत, वहिनींनी आणि तुमच्या बंधूंनी स्वातंत्र्यसंग्रामाचे कार्य सुरु ठेवले. ऐन उमेदीचा काळ तात्याराव, तुम्ही अंदमानात काळेपाणी सोसत घालवला आहे. काय झालं असेल तुमच्या कुटुंबाचे? येणारा प्रत्येक दिवस तुमचा अखेरचा दिवस असू शकतो या विचाराने प्रत्येक क्षण युगांचे वजन घेऊन आला असेल. तेव्हा देखील तुमचे कुटुंब देशकार्य पुढे नेण्याचा यज्ञ करत होते.
ज्यांची तुमच्या पायपुसाशी देखील उभे राहायची लायकी नाही ते तुमच्याबद्दल अद्वातद्वा बोलतात तेव्हा जाणीव होते की तुमचे कार्य किती मोठे आहे? आपले नगण्य अस्तित्त्व सिद्ध करायला देखील त्यांना तुमच्या नावाची मदत घ्यावी लागते. यात तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत असे त्यांना वाटत असते. पण, मातीच्या ढिगाऱ्याने कितीही मान उंचावली तरी तो हिमालयाची उंची गाठू शकत नाही याचे ज्ञान दुर्दैवाने त्यांना मिळालेले नसते. कोणताही अभ्यास न करता तुमच्याकडे बोट दाखवणाऱ्यांच्या आयुष्यात तुम्ही सोसलेल्या यातनांची यत्किंचितही कल्पना असेल असे वाटत नाही! केवळ उथळ विचारांनी प्रेरित तथाकथित इतिहासाची पुस्तके लिहिण्यासाठी किंवा निरनिराळे प्रयोग करण्याचे बेत रचण्यासाठी ज्यांना पंचतारांकित अटक होत असे, त्यांना अंदमानातील तुमच्या परिस्थितीची कल्पना येणं अशक्य आहे. असो, पण आता परिस्थिती बदलत आहे. सत्य सगळ्यांच्या समोर येत आहे आणि स्वार्थी लोकांचे मुखवटे एक एक करत उतरत आहेत!
एक बरे झाले की कागदावर लिहिण्याची प्रथा थोडी कमी झाली तात्याराव! नाहीतर, हे पत्र लिहिताना कित्येकदा कागद भिजून गेला असता आणि पत्र पूर्णच झाले नसते! बोलण्यासारखं, सांगण्यासारखं खूप काही आहे. पण काल तुमच्या विचारांच्या शेकडो ज्योती पेटताना पहिल्या आणि छाती गर्वाने फुलून आली की इतका अपमान करूनही, इतके खोटे बोलूनही आणि इतकी अवहेलना करूनही, ‘सावरकर’ हा शब्द उच्चारताच आमच्या शरीरात नवे स्फुरण चढते आणि तुमच्यावर चिखलफेक करणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आनंद हाच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर तुमच्या आयुष्यावर बेतलेला कार्यक्रम या संस्थेने केला! कुठेही हातचे न राखता थेट तुमचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. इतका मोठा कार्यक्रम की त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडत आहेत. पुण्यात जन्म झालेल्या माणसावर असे निःशब्द होण्याचे प्रसंग फार येत नाहीत! त्यामुळे कार्यक्रम मोठा झाला, भव्य झाला एवढंच मी म्हणू शकतो. हा कार्यक्रम प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावात झाला पाहिजे हीच इच्छा आता आहे.
मी आधी म्हणालो त्याप्रमाणे तुम्ही गेलात यावर माझा विश्वास नाहीच पण हा कार्यक्रम बघत असताना माझी खात्री पटली की खरं तर त्या मंचावर ना कोणी विद्यार्थी होते, ना वादक आणि ना कोणी यजमान होते.. सगळे फक्त “सावरकर होते”! तात्याराव तुम्हीच त्या मंचावर होते!
मला माहित आहे की माझे हे काही शब्द जरा जास्त झाले आहेत. पण, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर तुमच्यापुढे हे शब्द तोकडे आहेत, अगदीच तोकडे!
देहासारख्या क्षुल्लक गोष्टीवर मात करण्याचा अहं बाळगणाऱ्या मृत्यूपुढे, आपल्या विचारांनी, तत्त्वज्ञानाने, कर्तृत्त्वाने “अनादी, अनंत आणि अवध्य” झालेले, मृत्यूवर जय मिळवणारे तात्याराव तुम्ही खरोखरच “मृत्युंजयी सावरकर” आहात! तुम्हाला शतशः नमन.
तेवतो प्रत्येक स्वर शब्द तव, अस्तावल्या तारा
आतुरल्या होत्या कधीच्या, ज्या विशुद्ध झंकारा
देव्हाऱ्यातील फुले जाहली, मम अश्रुच्या धारा
नमन स्वातंत्र्यवीरा, तुजला नमन स्वातंत्र्यवीरा!
एक सावरकर प्रेमी
रोहित विजय बापट
“मृत्युंजयी सावरकर” या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे
मनातील भावना खूप सुंदर पद्धतीने मांडल्या आहेस रोहित…. 👌👌👌👌👌
अप्रतिम