सध्या नेते मंडळी आपापली कामं करण्यापेक्षा, लोकांच्या लग्नांबद्दल जास्त चिंतीत दिसतात. लग्न सजातीय१ (एकाच जातीत) आहे की अंतरजातीय (वेगवेगळ्या जातीत) याची काळजी त्यांना दिवसरात्र झोपू देत नाहीये. आपण कंटाळवाणे लोक, असल्या जुन्या जातींच्या फंदात न पडता पुढे (म्हणजे पुढच्याच्या पुढे नव्हे) तर भविष्याकडे पाहिलं पाहिजे.
आपल्या आजुबाजूला अशी अनंत उदाहरणे जिथे आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा आणि इतर इत्यादी मंडळी एकाच व्यवसायात आहेत. उदा. डॉक्टर, वकील, पोलीस, सी ए आणि सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे वगैरे. पूर्वीच्या काळी जाती वगैरे व्यवसायावरून ठरवली जात असा एक प्रमाद आहे. तो (फक्त) काही क्षणांसाठी खरा मानला तर वरील नमूद केलेल्या जाती ठरतील असा एक नवीन विचार माझ्या मनात आला.
पण यातही साला भेदभाव आहेच! डॉक्टराला वकील आपली मुलगी चटकन द्यायला तयार होत नाही, सॉफ्टवेअर इंजिनियर मुलीला पोलीस मुलगा चालत नाही. थोडक्यात काय तर भेदभाव. हा भेदभाव कुणीतरी किंवा कायद्याने धुवून काढला पाहिजे. त्यांचे प्रेमविवाह बिनदिक्कत पार पडावेत यासाठी एखादी (म्हणजे आर्थिक) तरतूद केली पाहिजे. त्यांच्या मुलांनाही.. नको. तूर्तास हा विषय नको.
तर मूळ मुद्दा असा की सॉफ्टवेअर इंजिनियर मुलाने वकील मुलीला नकार दिला तर हा आधुनिक काळातला जातीय भेदभाव मानण्यात यावा का? किंवा डॉक्टर लोक जे लग्न ठरवताना फक्त डॉक्टरच शोधतात याला सजातीय विवाह बंधन म्हणावे का?
टीप:
हा लेख पूर्वीपासून रूढ असलेल्या जातींबद्दल नाही त्यामुळे तशा विचारात पडू नका. फार लिहीत नाही नाहीतर तुम्हालाही कंटाळा येईल.
तळटीप:
- पोटजातींसंबंधी लेखकाला ही काही शंका आहेत. हाडांचा डॉक्टर आणि दंतवैद्य किंवा दिवाणी वकील आणि फौजदारी वकील यांच्यातील विवाह सजातीय समजावा की अंतरजातीय? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आशा आहे नेतेमंडळी याचा खुलासा करतील. अर्थात त्याने या पोस्ट मध्ये फरक पडणार नाही कारण पुन्हा मागे येऊन ‘अपडेट‘ कोण करील? कंटाळा येतो !
- या नवीन विचाराने समाज विचार करायला प्रवृत्त होईल अशी लेखकाची अपेक्षा नाहीये. पण, मुद्दा तर्कशुद्ध आहे हे मान्य कराल ही अपेक्षा नक्कीच आहे.
Featured ImageL: Photo by Foto Pettine on Unsplash