मला कायमच अंधार, दिवा आणि प्रकाश या त्रिवेणीने स्तंभित केलेले आहे. दीप अमावस्या किंवा दिव्याची अवस म्हणजे तर या त्रिवेणीच्या अस्तित्त्वाचा उत्सवच! मग माझ्यातला कवी कसा काय स्वस्थ बसू शकतो? देवाच्या कृपेने मी अजून तरी स्वतःला “अंधार वाईट” या भ्रमापासून दूर ठेवू शकलेलो आहे. याचे कारण असे आहे की, अंधार नसला तर प्रकाशाचे काय महत्त्व उरते. किंबहुना अंधार नसेल तर वास्तवाचे दर्शन घडणं अशक्य आहे. “तमसो मां ज्योतिर्गमय” या उक्तीचा आरंभच मुळी अंधारात होतो. अर्थातच ही प्रार्थना असत्य, अज्ञान, भय आणि नकारात्मकतेच्या अंधारातून सत्य, ज्ञान, मुक्ती आणि सकारात्मकतेच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी केलेली आहे.
या सगळ्या प्रवासात मात्र भाव खाऊन जातो म्हणजे “दिवा”. प्रकाश स्वतः कितीही सामर्थ्यवान असला तरीही त्यालाही कुठला ना कुठला स्रोत लागतोच. स्वतःचा देह जाळून प्रकाशाला जन्म देणारा हा दिवा. मनात डोकावणाऱ्या अंतःप्रकाशाला देखील कुठला ना कुठला स्रोत हवा असतोच. कधी तो स्वयंभू असतो तर कधी बहिस्थ विचार आणि कधी कधी आजुबाजूला घडणाऱ्या घटनांच्या त्रयस्थ पात्रात भावनांच्या व संवेदनांच्या रंगांचे मिश्रण या दिव्याला जन्म देते.
वृत्तीने, हाडाने आणि रक्ताने देखील कवी असल्याने मला या प्रक्रियेचा वेळोवेळी अनुभव येतो. मला तर माझी कविता अनुभवगर्द अथांग प्रश्न दर्याच्या काठावर एखाद्या दीपस्तंभासारखी उभी दिसते. मनात आलेले विचार एखाद्या नावेसारखे मी या दर्यात सोडतो आणि प्रार्थना करतो की या नावा या स्वयंभू कवितेच्या प्रकाशाचा माग घेत घेत तिच्या पायथ्याशी येऊन थबकतील आणि कविता त्यांना एखाद्या लहान मुलासारखी उचलून घेईल.
पण कधी कधी संवेदनांचा अनुभवगर्द काळोख इतका गभीर आणि गहिरा असतो की माझे विचार आणि शब्द चाचपडत बसतात. संकल्पनांचे आणि व्याख्यांचे ढग कवितेच्या दीपस्तंभाला वेढून उभे असतात. तेव्हा समोरच्या किनाऱ्यावर, माझ्या दिशाभ्रमीत नावांकडे बघणारा मी हात जोडतो आणि म्हणतो
एक दिवा उजळायचा आहे मला
मदत करशील?
फार काही नाही
थोडे शब्द हवे आहेत
भावनांचं इंधन मी आधीच गोळा केलेलं आहे.
अर्थ संवेदनांच्या अंधाऱ्या राहुटीत
मला थोडा उजेड करायचा आहे.
– २३ सप्टेंबर २०२० (पुणे)
मला हा काव्यहीनतेचा अंधार सहन होत नाही. शेवटी मी कवी आहे. कविता हाच माझा दिवा आणि कविता हाच माझा प्रकाश आहे!
या क्षणी २०१६ साली सुचलेले काही शब्द तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत.
रिकाम्या हाती आला
रिकाम्या हाती गेला
फुले दिली न कोणी
तरी बागा फुलवून गेला
वाट वेगळी म्हणून
पाहिले न वळून कोणी
एकट्याने जाता जाता
नवे विश्व देऊन गेला
होतेच काय जे त्याचे
जगला तरी असा की
काळोखात सावकाश
एक दीप ठेवून गेला!
– १६ मार्च २०१६ (पुणे)
इतर ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
Great
धन्यवाद 🙏🏻