हिरू ओनोडा – पूर्वार्ध
हिरु ओनोडा.. आज पुन्हा या असामान्य सैनिकांची अविश्वसनीय गोष्ट वाचनात आली. कारण आजच्या दिवशी म्हणजे ९ मार्च १९७४ रोजी अखेर “आपल्या कमांडिंग ऑफिसरने अधिकृतरीत्या सांगितलेले नसल्याने, विश्वयुद्ध संपले हे जवळजवळ तीस वर्षे मान्य न करणाऱ्या” त्या सैनिकाने आपले शस्त्र खाली ठेवले! त्या जपानी सैनिकांची गोष्ट मी पूर्वी देखील कधीतरी वर्तमानपत्रात वाचली होती. तोच सेकंड लेफ्टनंट हिरू ओनोडा! त्या काळी म्हणजे २००५ च्या दरम्यान इंटरनेटचा उद्रेक झालेला नसल्याने वर्तमानपत्रे खरोखरच लोकांना काही वेगळं मिळावं यासाठी धडपडत होते. तेव्हा ती गोष्ट फार रोचक वाटली. त्यांचा अनुभव, जगण्यासाठी केलेली धडपड, आणि मनाचे सांत्वन करण्यासाठी केलेला खटाटोप, यांच्याबद्दल वाचून माझ्या एका एकांकिकेतील एकटे पडलेल्या एका सामान्य माणसाची व्यक्तिरेखा रंगवताना मदत झाली होती.

गुप्तहेरगिरी आणि गनिमीकाव्यात तरबेज अशा हिरू ओनोडा आणि त्यांच्या तुकडीला २६ डिसेंबर १९४४ रोजी, द्वितीय विश्वयुद्धात फिलीपिन्समधील “लुबांग” नावाच्या बेटावर शत्रूशी लढायला पाठवले होते. त्यांना अगदी सरळ साधे निर्देश होते. कोणत्याही प्रकारे शत्रूला संपवायचे, त्यांच्या कारवाया थोपवायच्या, त्यांची शस्त्रे-तळ-सामग्री उद्ध्वस्त करायची आणि काही झाले तरीही त्यांना पुढे येऊ द्यायचे नाही! त्याच प्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा निर्देश असा होता की “काहीही झाले तरी आम्ही तुमच्याशी संपर्क करू. तो पर्यंत काहीही झाले तरीही आत्मसमर्पण किंवा आत्महत्या करायची नाही!”
हिरू ओनोडा यांनी आपल्याला मिळालेल्या या निर्देशाचे एखाद्या कर्मठ सैनिकाप्रमाणे पालन केले.
लुबांग बेट आणि कर्तव्यनिष्ठा
लुबांग बेटावर पोहोचल्यानंतर हिरू ओनोडा त्यांच्या आधी तेथे तैनात केलेल्या सैनिकांच्या तुकडीला सामील झाले. या तुकडीचे उद्दिष्ट होते शत्रू सैन्याचे विमानतळ आणि बंदर उद्ध्वस्त करणे. त्या तुकडीत त्यांच्यापेक्षा वरच्या पदावरील अधिकारी होते. त्या मोठ्या अधिकाऱ्यांनी हिरू आणि त्यांच्या साथीदारांना त्यांचे कर्तव्य पाळायला मज्जाव केला. १९४५ मध्ये त्या वरच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकन आणि कॉमनवेल्थ अधिकाऱ्यांपुढे आत्मसमर्पण केले. त्यामुळे आत्मसमर्पण न केलेल्या सैनिकांमध्ये हिरू ओनोडा आपोआप उच्चपदस्थ अधिकारी झाले. त्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला कारण त्यांना मिळालेले निर्देश त्यांनी शिरोधार्य मानले.

पुढील काळात हिरू ओनोडा आणि त्यांचे तीन साथीदार युईची आकात्सु, शोईची शिमादा, किंशीची कोझुका यांनी लुबांग बेटावरील आपली लढत गनिमी काव्याने (Guerilla Warfare) सुरू ठेवली. तेव्हापासून त्यांची आणि स्थानिक पोलिसांची व लोकांची झटापट सुरू झाली.
गनिमी कावा आणि अखेरच्या क्षणापर्यंतची लढाई
जपानने द्वितीय महायुद्धात पराभव मान्य केल्याची पत्रके त्यांना ऑक्टोबर १९४५ मध्ये मिळाली पण त्यांनी या पत्रकाला साफ झुगारून लावले. मेलेल्या गाईच्या अंगावर ते पत्रक लावले होते ज्याचा मजकूर होता, “महायुद्ध १५ ऑगस्ट रोजी संपलेले आहे. तुम्ही डोंगरांतून बाहेर या”. अर्थातच हिरू आणि त्यांच्या साथीदारांना या पत्रकावर विश्वास बसला नाही. त्यांना हा मित्र-राष्ट्रांचा एक कुटील डाव वाटला आणि डोंगर दऱ्यात ते लढत राहिले! १९४५ च्या वर्षाअखेर, जपानच्या सेनापतींच्या नावाने आत्मसमर्पणासाठी छापलेली आणखीन काही पत्रके विमानातून डोंगरांत टाकण्यात आली, जेणेकरून हिरू आत्मसर्पण करतील! हिरू ओनोडांच्या तुकडीने या पत्रकांची देखील शहानिशा करून त्यांना अवैध मानलं आणि बाहेर येण्यास नकार दिला. १९५२ मध्ये त्या तुकडीतील सैनिकांच्या कुटुंबीयांची पत्रे, त्यांची छायाचित्रे विमानातून डोंगरांत टाकण्यात आली. तरीही हिरू आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्या मतानुसार या “चलाखीला” किंमत दिली नाही. या तुकडीच्या, पोलिस व स्थानिक लोकांशी झटापटी सुरूच राहिल्या. या “वेड्या” जपानी सैनिकांनी स्थानिक लोकांची शेते जाळणे, पोलिसांवर आक्रमण करून हत्यारे पळवणे वगैरे कारवाया सुरूच ठेवल्या. त्यांच्या मते युद्ध सुरूच होते आणि हे लोक त्यांचे शत्रू!

७ मे १९५४ साली त्यांच्या मागावर असलेल्या सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीत शिमादा मृत्युमुखी पडले आणि ऑक्टोबर १९७२ मध्ये पोलिसांबरोबर झालेल्या गोळीबारात कोझुका मृत्युमुखी पडले. आकात्सु यांनी सप्टेंबर १९४९ मध्येच आत्मसर्पण केले होते. नाकामुरा त्या बेटातून निघून गेले होते. आता हिरू ओनोडा एकटेच उरले होते. तरीही आपल्याला दिलेल्या निर्देशाचे पालन ते करतच राहिले. स्थानिक लोक, पोलीस आणि सैनिकांशी झुंजत राहिले. डोंगरात लपून छपून कारवाया करत राहिले कारण त्यांच्या Commanding Officer ने त्यांना पुढचा निर्देश दिलेला नव्हता! काय हा समर्पणभाव आणि काय ही कर्तव्यनिष्ठा!
नोरिओ सुझुकी आणि हिरू ओनोडा यांचे आत्मसमर्पण
अखेर १९७४ मध्ये एक जपानी प्रवासी नोरिओ सुझुकी यांनी एक प्रवास सुरू केला. त्या प्रवासाचे उद्दिष्ट होते, हिरू ओनोडा, पांडा आणि येती यांना पाहाणे! नोरिओ त्यांच्या शोधयात्रेत फिलिपीन्स मध्ये लिबांग बेटावर जाऊन पोहोचले. चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर त्यांना हिरू ओनोडा भेटले. तोपर्यंत हिरू ओनोडांनी आपली पन्नाशी ओलांडलेली होती. ओनोडा यांच्या म्हणण्यानुसार खरे तर ते नोरिओ यांना मारणार होते पण त्यांच्या पायातील मोजे आणि सॅंडल बघून त्यांची खात्री पातळी की ते स्थानिक नक्कीच नाहीत! इतकी वर्षे ते एकटे होते, तरीही त्यांचा सैनिकी खाक्या गेलेला नव्हता! त्यांना भेटल्यावर नोरिओ यांनी अत्यंत आदरयुक्त शैलीत संवाद सुरू केला
“तुम्ही हिरू ओनोडा आहात का?”
“होय” ओनोडा म्हणाले
“म्हणजे लेफ्टनंट हिरू ओनोडा?”
“होय”
“हिरू ओनोडा तुम्ही बाहेर येऊन आत्मसमर्पण करून माझ्याबरोबर जपानला का येत नाही?”
त्यावर हिरू ओनोडा यांचे उत्तर होते
“अजून युद्ध संपलेले नाही. मला अजून माझ्या Commanding Officer कडून तसे निर्देश मिळालेले नाहीत!”

नोरिओ हा संदेश आणि हिरू ओनोडांची छायाचित्रे पुरावा म्हणून घेऊन जपानला परतले. त्यांच्याकडेच मजकूर पाहून जपानी सैन्य अधिकारी देखील स्तंभित झाले. शेवटी त्यांनी हिरू ओनोडांच्या तत्कालीन Commanding Officer ना म्हणजेच निवृत्त मेजर योशिमी तानिगुची यांना पाचारण केले. ९ मार्च १९७४ रोजी मेजर तानिगुची स्वतः लिबांग बेटावर गेले आणि हिरू ओनोडा यांची भेट घेतली व आत्मसर्पण करण्याचे निर्देश असलेले पत्र, “काहीही झाले तरी आम्ही तुमच्याशी संपर्क करू” या शपथेचे पालन करताना, आपल्या हाताने दिले. हे पत्र हाती पडताच हिरू ओनोडा यांनी आपले शस्त्र खाली ठेवले आणि आत्मसमर्पण केले. त्यांच्याकडून त्यांची तलवार, रायफल, काडतुसे आणि ग्रेनेड हस्तगत केले गेले. त्यात आणखीन एक विशेष शस्त्र होते, १९४४ मध्ये त्यांच्या आईने त्यांना दिलेली कट्यार!


हिरू ओनोडा – उत्तरार्ध
जपानला परतल्यानंतर त्यांनी आपल्या अनुभवांचे वर्णन “No Surrender: My Thirty-Year War” या आत्मचरित्रात केले. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढलेली होती यात शंकाच नाही. अनेक नेते देखील त्यांना पाचारण करू लागले. पण इतकी वर्षे एकट्याने, लोकसंपर्कापासून दूर काढल्यानंतर अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि धुळीच्या लोटासारखी वाहून येणारी माणसे यांमुळे ते अस्वस्थ झाले. त्याही पेक्षा जपानी समाज आणि विशेषतः जपानी सैन्यातील कर्तव्यनिष्ठा, कर्तव्यबोध आणि नीतिमत्ता यांच्या अधःपतनाला वैतागून शेवटी ते १९७५ मध्ये आपल्या भावाप्रमाणे ब्राझील येथे जाऊन स्थायिक झाले. १९७६ साली त्यांचे लग्न झाले. पुढे त्यांनी ब्राझील येथेच आपले आयुष्य घालवायचे ठरवले.

पण १९८० मध्ये जपान मध्ये एका तरुणाने केलेल्या एका गुन्ह्यामुळे तरुणांसाठी कार्य करण्यासाठी १९८४ मध्ये ते पुन्हा जपानमध्ये आले आणि स्थायिक झाले. १९९६ साली हिरू आणि त्यांच्या पत्नी पुन्हा एकदा लुबांग बेटावर गेले. त्यांच्या पत्नीने तिथल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देखील सुरू केली! २०१४ त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या पत्नी राजकारणात देखील सक्रिय झाल्या. शेवटी १६ जानेवारी २०१४ साली हृदयविदाकाराने हिरू ओनोडा यांचे निधन झाले. त्यावेळेस जपानच्या पंतप्रधानांनी “हिरू ओनोडा जेव्हा जपानला परत आले तेव्हा मला युद्ध संपल्याची खात्री पटली” असे गौरवोद्गार काढले.
१९४७ ते १९७४ या काळात इंडोनेशिया, फिलिपीन्स आणि तेथील अनेक बेटांवरील असेल संपर्क तुटलेले १०० हुन अधिक सैनिक लोकांना सापडत राहिले!
“युद्धस्य कथा रम्या” म्हणतात ते उगाच नाही!
अशाच अनेक रोचक घटनांबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.