मला विचाराल तर नोकरदार मध्यमवर्ग स्वतःच्या घरात जन्माला आलेली कला आणि कलाकार यांच्यासाठी एक चिरंतन थडगे आहे. कलाकाराचा खून करून त्यावर आनंदाने भयाची चादर चढवली जाते आणि वर व्यावहारिक परिपक्वतेचे उपदेश एखाद्या नशेप्रमाणे एकदुसऱ्यांना दिले जातात. या थडग्यावर उभे राहून ही अहमामिका सुरू असते आणि कलाकार वास्तविकतेच्या ढिगाऱ्याखाली थडग्यात हुंदके देत असतो आणि विचारत असतो “मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबात कलाकार जन्माला घालण्याआधी देव त्या जीवावर थोडा उदार होवून त्याला जन्म घ्यायच्या आधीच मोक्ष का देत नाही?”
अगर जीनाही नागवार था तुझे ए जिंदगी
मौत का इंतजार क्यों करवाया मुझसे ?
कधीकधी प्रश्न पडतो, खरंच कलाकाराच्या मरणाने समाजाचं असं काय नुकसान होतं? माणसाचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण होतं, नोकरी मिळते, लग्न होतं आणि कुटुंबाला हवा तितका वेळ देता येतो. सगळं काही यथासांग पूर्ण होतं आणि पुढे पिंडालाही कावळा शिवतो. पण सामान्य लोकांना हे माहित नसतं की अनामिक मेलेल्या कलाकाराच्या पिंडाला कावळा शिवतो ते त्याला मोक्ष मिळावा म्हणून नव्हे तर त्याच्यातल्या मेलेल्या कलाकाराला हिणवायचं असतं “बघ तुला तसंच जावं लागलं!”. काहीही करून समाजाने मान्य केलेल्या मरणप्राय झालरी घेऊन जिवंत राहिलं पाहिजे, मग त्यासाठी जिवंत मनाची फाटकी चादर घेणाऱ्याचा बळी गेला तरी चालेल.. नव्हे हा बळी दिला गेलाच पाहिजे! एखाद्याने जगण्यासाठी तरी किती म्हणून प्रयत्न करावेत आणि आयुष्याने कितीदा मरणाचा रस्ता दाखवावा? हा छळ कशासाठी?
ज़िन्दगी तंग करनेपर आमादा है इतनी
जीनेकी हर दरख्वास्त खारिज होती है।
समर्थांनी “उपेक्षू नको गुणवंता अनंता” लिहिलं ते काय असंच? गुणवंताचीच समाजात उपेक्षा होते आणि जन्म देणारा परमेश्वरही त्याच्या मदतीला येत नाही, हे सत्य समर्थांनी अनुभवलं असणार त्याशिवाय इतके करुण शब्द मांडणं कठीण आहे. विश्वाची चिंता करत असताना त्यांनाही बहुदा भीती वाटली असावी की या चिंतेची चेष्टा होणार नाही ना? प्रकाशासाठी जळणाऱ्या वातीला कधीतरी “तमसो मा ज्योतिर्गमय” ची किंमत विचारा. सामान्यांची परमेश्वर परीक्षा पाहतो ते उपाशी ठेवून आणि कलाकाराला त्याच्या कलेपासून दूर नेवून.याला मी दैवदत्त उपेक्षा समजतो. म्हणजे एका बाजूने जन्म द्यायचा आणि दुसऱ्या बाजूने जगण्याचे सगळे आधार हिरावून घ्यायचे, असा क्रूर खेळ सुरू असतो.
काही लक्ष योनींचा प्रवास करून माणसाचा जन्म देव देतो खरा पण कलाकाराच्या माथी अश्वत्थामासारखा सदैव भळभळणारा प्रश्न मांडून ठेवतो.. कुटुंब हवं की कला? पैसा हवा की रसिक? सुख हवं की नव्याचा शोध? सरते शेवटी बऱ्याच कलाकारांना यांपैकी काहीच मिळत नाही आणि ते अनामिक निघून जातात. भीती वाटते ती याचीच. रसिकांनी नाकारणे एक वेळ मान्य होऊ शकतं पण रसिकांपर्यंत पोहोचण्याचे सगळे मार्गच हा पांढरपेशी समाज बंद करून टाकतो. आयुष्य उध्वस्त होण्याची भीती दाखवतो.
हे ही अवघड वाटेल पण कधीकधी अशीही स्वप्न पडतात की कलाकार मरून गेल्यावर काही दशके-शतके त्याची कला-शब्द कोणीतरी काळाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढेल आणि कुठल्यातरी संग्राहालयात सजवून ठेवेल. तुम्ही म्हणाल मी हे सगळं का बोलत आहे? याची प्रेरणा देखील कुठेतरी ग्रेस कडूनच मिळाली आहे. Every artist is special kind of a man.. ग्रेस म्हणाले तेव्हा हुरूप वाटला होता आता हुरहूर.. याची नाही की रसिक साथ देतील का? तर याची की मी रसिकांपर्यंत पोहोचेन तेव्हा त्या पोहोचण्यात काही अर्थ उरलेला असेल का? अपयशाचं दुःख अनुभवणं एक वेळ सोपं आहे पण मनस्वितेला जाळून सुख अनुभवणं अवघड! कलाकाराला मारण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याच्यातल्या मनस्वितेचे आणि निरागसतेचे श्वास गुदमरून टाकायचे. कलाकार आपोआप घुसमटून प्राण सोडून देतो.
समाज आणि कलाकार यांच्यामध्ये एक अदृष्य पण न ओलांडता येणारी भिंत असते. पलीकडे उभे असणाऱ्या बऱ्याच जणांना प्रश्न पडतात “शांत बसण्यात, आराम करण्यात काय गैर आहे? सारखं कशाचा तरी विचार करणं गरजेचं आहे का? नोकरी सोडून सगळा वेळ आम्हाला दिला पाहिजे, का देत नाहीस? या सगळ्या प्रश्नांना मी एकच उत्तर देतो.. तुम्हाला एखाद्या वेडाने पछाडू दे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
माझी बडबड ऐकून मला कदाचित वेडा देखील म्हणाल.. जर म्हणालाच तर याचंही उत्तर गालिब ने देऊन ठेवलेलं आहे.
“हाय कम्बख़्त तूने पि ही नहीं !”