पाऊस आणि काही ‘ते’ मित्र यांच्यात मला फार साम्य वाटतं. आधीच सांगून टाकतो मला पाऊस आणि पावसाळा फार आवडत नाही. कवी किंवा लेखकाला पाऊस, ढग आणि पावसाळी वातावरण आवडू नये हा आपल्या (उरल्या सुरल्या) साहित्यिक समाजात फाऊल मानला जातो. काही काही लोक तर कुत्सित प्रश्न करतात “तू कवी आहेस आणि तुला पाऊस आवडत नाही!?” थोडक्यात त्यांना म्हणायचं असतं कसला डोंबलाचा कवी आहेस किंवा कसला भुक्कड लेखक आहेस. असो .. पाऊस आणि ढग यांच्याबद्दल नंतर कधीतरी.
तर पाऊस आणि ‘ते’ मित्र. आता पुन्हा तुम्ही ‘ते’ म्हणजे कोणते? असं विचाराल याची मला खात्री आहे. मी पुण्याचा असल्यामुळे मला असले प्रश्न म्हणजे बादशाहीतून डावीकडे खाली गेल्यावर वरच्या बाजूला तिसरी इमारत कुठली असे वाटतात. थोडक्यात तळहाताचा मळ! (हुशार लोकांच्या तळहाताला मळ का राहतो हे एक न सुटलेलं कोडं आहे. पण तूर्तास आपण तो प्रश्न बाजूला ठेवू. पुणेकर असलो म्हणून काय झालं अधून मधून आम्ही विषय कट देखील करतो) तर ‘ते’ म्हणजे जे खरोखरचे मित्र नसतात, किंबहुना त्यांनी स्वतःलाच तुमचा मित्र अथवा मैत्रीण मानलेलं असतं ते. कमी शब्दात सांगायचं झालं तर एकतर्फी मैत्री ! यातले बहुतांशी लोक आपल्या डोक्यात जात असतात आणि हेच कारण असतं ‘ते’ आपले मित्र नसतात. शक्यतो आपण यांना टाळतो. पण नेमकं जेव्हा आपण चांगल्या मूडमध्ये बाहेर पडतो तेव्हा वाटेत हे भेटतात आणि आपण कुठल्या मुहूर्तावर बाहेर पडलो असं म्हणून डोकं काल्पनिक दगडावर आपटून घेतो. तर थोडक्यात काय, हे मित्र डोक्यात जातात.
आत्तापर्यंत तुम्हाला हा प्रश्न पडायला हरकत नाही की हे सगळं ठीक आहे पण याचा आणि पावसाचा काय संबंध? .. प्रश्न रास्त आहे. माफ करा योग्य आहे ! पण माणूस चुकला. मी आधीच स्पष्ट केलेलं आहे की मी पुणेकर आहे आणि त्यातून बापट त्यामुळे मी चुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पाऊस.. पाऊस म्हटलं की लोकांना कुंद वातावरण, ढग, सरी आणि हिरवळ दिसते. दिसो बापडी पण मला पावसाने या मित्रांसारखं छळलेलं आहे. छत्री घेऊन बाहेर पडलो नाही की पाऊस पडलाच म्हणून समजायचं. त्या मित्रांसारखा पाऊस जणू काही माझ्या गळ्यात येऊन पडतो आणि घर येईपर्यंत पिच्छा पुरवतो. बर, त्या मित्रांप्रमाणे यालाही स्थळ, काळ, वेळ यातलं कळत नाही. रेनकोट, छत्री वगैरे आयुध घेऊन, कपडे भिजवत, चिखलाचे शिंतोडे चुकवत आणि मोबाईलला जपत मी ऑफिसमध्ये पोहोचतो. ऑफिस मध्ये आलो की बाहेर पाऊस पडायचा थांबतो. घरी जायची वेळ आली की त्याच्या अर्धा तास आधीच रिपरिप सुरु होते. थोडक्यात डोक्यात जाणं हा या दोघांचा स्थायी भाव. चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, बेसावध असताना तुम्हाला गाठणे आणि छळणे. कंटाळा येतो कधी कधी.
आता पुढचा प्रश्न असा की यांना टाळायचं कसं? उत्तर अगदी सोपं आहे छत्री उघडायची आणि आपलं तोंड लपवायचं.
तुम्हाला काय वाटलं बसल्या बसल्या मी आयुष्याची कोडी सोडवणार आहे? आपण सामान्य लोकांनी अशा मित्रांना आणि अशा पावसाला सामोरं गेलंच पाहिजे !