आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस
आज १५ सप्टेंबर, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत, जगातील लोकशाही देशांनी एकत्र येऊन, लोकशाही देशांना प्रोत्साहन देण्यासाठी व लोकशाहीला बळ देण्यासाठी हा दिवस साजरा करावा या ठरावाला अनुमती दिली. लोकशाही बद्दल एक विचार प्रसिद्ध आहे, लोकशाही व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत तरीदेखील इतर पद्धतींचा विचार करता, लोकशाही हीच सर्वोत्तम शासनपद्धती आहे. “शब्दयात्री” या विचाराशी पूर्णपणे सहमत आहे. लोकशाही पद्धती सदोष असली तरीही स्वातंत्र्य आणि समता यांचा विचार करता सुयोग्य आहे.
नेते आणि लोक
भारत जगातील सगळ्यात मोठे लोकशाही पद्धतीने चालणारे राष्ट्र आहे, असं अनेकांना आपण विविध मंचांवरून बोलताना ऐकतो. पण, याहूनही अधिक लोकांना “लोक वाईट नाहीत नेते वाईट आहेत” असं बोलताना ऐकतो. बऱ्याचदा समाजातील समस्यांच्या चर्चांचे पालुपद हेच असते की “नेते वाईट आहेत. लोकांमध्ये वाद नसतो, ही नेतेमंडळी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काही गोष्टी करतात.”
पण माझ्या मनात हा विचार येतो की, नेते वाईट आहेत मग त्यांना निवडून कोण आणतो? ‘लोक’शाही मध्ये कोणी सत्तेत यायचं कोणी नाही हे ‘लोक’ ठरवतात. मग जर हे “वाईट” नेते पुनःपुन्हा सत्तेत येत असतील तर लोकांनी देखील हा विचार करण्याची गरज आहे की आपण कोणाला निवडून आणत आहोत? लोकशाहीमध्ये फक्त लोकच सत्तेत आणू शकतात आणि तेच सत्तेतून बाहेर काढू शकतात. एवढी शक्ती जर लोकांच्या हातात असेल तर जबाबदारी देखील तेवढ्याच प्रमाणात वाढते.
लोकशाही आणि आपली जबाबदारी
लोकशाहीत प्रथम जबाबदारी लोकांवर आहे. लोकशाहीचा मूलाधार “समाजाला स्वतःसाठी काय योग्य आहे – काय अयोग्य आहे याची जाणीव असते” हा सिद्धांत आहे. त्यामुळे आपण लोक या लोकशाहीमध्ये आपली जबाबदारी दार वेळेस नेत्यांवर ढकलू शकत नाही. कधीतरी आपण समाज म्हणून स्वतःच्या विचारांमध्ये, तत्त्वांमध्ये आणि योग्यायोग्यतेच्या व्याख्यांमध्ये कुठे उणीव आहे का? याचा देखील विचार करणं आवश्यक आहे.
समाजाला स्वतःसाठी काय योग्य आहे – काय अयोग्य आहे याची जाणीव असते!
लोकशाही एक दुधारी शस्त्र आहे जे सुदैवाने आपल्या हातात आहे. सुदैवाने आपण अशा देशाचे नागरिक आहोत जिथे अजून लोकशाही मृतप्राय अवस्थेत गेलेली नाही. पण आपण ‘लोक’ जर सतर्क आणि जबाबदार राहिलो नाही तर लोकशाही व्यवस्थेचा हा डोलारा स्वतःच्या वजनाखाली दबून उध्वस्त होईल! समाजाला आणि राष्ट्राला उत्तम नेते मिळवून देणं हे कर्तव्य लोकांचे आहे हे विसरून चालणार नाही. ज्या समाजाला योग्य आणि अयोग्य नेते किंवा आदर्श ओळखता येत नाहीत, त्यांची अवनती होते यात दुमत नाही. त्यामुळे भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी आणि उत्तम भविष्यासाठी हे मंथन, चिंतन आणि आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.
त्यामुळे लोकशाहीत जेवढी जबाबदारी नेत्यांची आणि प्रशासनाची आहे त्याच्याहून थोडी जास्त त्या व्यवस्थेला आपल्या हातांनी उचलून धरणाऱ्या लोकांची आहे.
टीप:
या ब्लॉगचा उद्देश राजकीय भाष्य करण्याचे नसून समाजाला स्वतःच्या हिताचा विचार करायला लावणे हा आहे. तसेच लोकनिर्वाचित नेत्यांची पाठराखण करणे देखील या ब्लॉगचा उद्देश नाही. या ब्लॉगचा उद्देश केवळ जनजागृती, मंथन आणि प्रबोधन आहे.
इतर ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.