December 9, 2024
वेडात मराठे वीर दौडले सात (संपूर्ण कविता) ~ कुसुमाग्रज

वेडात मराठे वीर दौडले सात (संपूर्ण कविता) ~ कुसुमाग्रज

Spread the love

टापांचा आवाज, पंडितजींचे संगीत, लता दिदींचे स्वर, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शब्द आणि शूरवीरांच्या आठवणीने चढलेले स्फुरण. “वेडात मराठे वीर दौडले सात” हे शब्द कानी पडताच अंगावर रोमांच उभे राहतात. मराठ्यांचे असीम शौर्य, हिंदवी स्वराज्यासाठी केलेले बलिदान, देव देश आणि धर्मासाठी उचलेले खड्ग सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहतं. मराठी साम्राज्याचा गौरवशाली धगधगता इतिहास.

आणखी एक माहिती जी फारशी परिचित नाही ती म्हणजे ‘हे सात वीर कोण होते?’ त्या सात वीरांची नावे खालीलप्रमाणे..

  1. प्रतापराव गुजर
  2. विसाजी बल्लाळ
  3. विठोजी शिंदे
  4. विठ्ठल पिळदेव
  5. दीपाजी राऊतराव
  6. सिद्दी हिलाल
  7. कृष्णाजी भास्कर

या काव्याचे गाणे झाले खरे. पण गाण्यात कवितेतील सगळी कडवी पंडितजींनी घेतलेली नाहीत. त्यामुळे बहुतांशी लोकांना या काव्याला पूर्वार्ध देखील आहे हे माहित नसतं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा एकेक शब्द पवित्र श्लोकासारखा आहे. त्यामुळे संपूर्ण काव्य एखाद्या स्तोत्राप्रमाणे पवित्र! या ब्लॉगद्वारे ते संपूर्ण काव्य तुमच्यासमोर मांडायचा यत्न केला आहे.

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

"श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"

वेडात मराठे वीर दौडले सात॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील"
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात

वेडात मराठे वीर दौडले सात॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात॥ ३ ॥

"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"

वेडात मराठे वीर दौडले सात॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात॥ ८ ॥

या शूरवीरांचे पुण्यस्मरण सदैव आपल्याला प्रेरणा देत राहो ही परमेश्वरचरणी प्रार्थना. जगदंब!

“शब्दयात्री” तील इतिहासाविषयी ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *