मित्रांनो आपण सर्वानीच “अरे कृष्णा अरे कान्हा” के काव्य कधी ना कधी ऐकले असेलच. शाहीर साबळे यांच्या भावस्पर्शी स्वरांतून आजही आपण या गीताचे स्मरण करतो. संत एकनाथ महाराजांची ही रचना. संत एकनाथ महाराज म्हणजे समाजातील आणि मुख्यतः माणसातील कुप्रवृत्तींवर परखड टीका करणारे संत कवि. सरळ साध्या सोप्या शब्दात त्यांनी अनेकदा आपली कानउघडणी केलेली आहे. हे काव्य अशीच कानउघडणी करणारे. गीतात या काव्यातील काही पंक्ती गाळल्या आहेत. का? याची माहिती माझ्याकडे नाही. या ब्लॉगमध्ये मी या काव्याची मूळ रचना तुमच्यापुढे मांडत आहे.
संत आले घरी तरी काय बोलुन शिणवावे?
उंस गोड झाला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! ।।१।।
देव आंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
वडील रागें भरला म्हणून काय जिवेंच मारावे?
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! ।।२।।
आग्या विंचु झाला म्हणून काय कंठीच कवळावा?
फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनी न्यावा?
फुकट हिरा झाला म्हणून काय कथिली जोडावा?
नित्य व्याज खातो म्हणून काय मुद्दल बुडवावा?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! ।।३।।
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेंच भोगावी?
सखा मित्र झाला म्हणून काय बाईल मागावी?
सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैंजने झाली म्हणून काय शिरीच वंदावी?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! ।।४।।
सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटे तरी काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आडनी बांधावा?
एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्तची ओळखावा?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! ।।५।।
पूर्वीच्या काळी संतमंडळींनी धर्माबद्दल द्वेष न पसरता त्याच्या भक्तिमार्गाची व्याप्ती सांगून सगळ्यांसाठी भक्तीचा मार्ग मोकळा केला. संत एकनाथ महाराज यांना खऱ्या अर्थाने समाज सुधारक म्हणणं अयोग्य होणार नाही. स्वधर्म जपून समाजासाठी जगणे संत एकनाथ महाराजांनी शिकवले. आपणही तोच आदर्श ठेवला पाहिजे! आपल्या व्यवस्थेत जर काही बदल घडवायचा असेल तर तो व्यवस्थेच्या बाहेर जाऊन, त्याची हेटाळणी करून करता येणार नाही हे त्या काळी संत मंडळींना समजलेले होते. दुर्दैवाने पुढच्या काळातील समाजसुधारकांना ते समजले नाही!
संत एकनाथ महाराजांचे भारूड “विंचू चावला” बद्दल माहिती इथे मिळेल