November 5, 2024
मोगरा फुलला – मूळ रचना आणि भावार्थ

मोगरा फुलला – मूळ रचना आणि भावार्थ

Spread the love

मोगरा फुलला..

“मोगरा फुलला.. मोगरा फुलला” संत ज्ञानेश्वर माऊलींनी आंतरिक सुखाच्या अनुभवाचे वर्णन या रचनेत केलेले आहे. कै. लतादीदींचे स्वर कानावर पडले की अध्यात्मिक अमृताचे तुषार अंगावर अलगद पडू लागल्यासारखे वाटते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि लतादीदींचे स्वर हा एक वेगळाच सात्विक योग आहे. कैक वर्षे ही रचना फक्त मराठीच नव्हे तर अमराठी लोक सुद्धा गुणगुणत आहेत. अर्थातच या ब्लॉगमध्ये आपण या रचनेचे काही अर्थ आणि गर्भितार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पण, त्याच्या आधी एक महत्त्वाची बाब जी सगळ्यांना माहित असणे गरजेची आहे ती नमूद केली पाहिजे. गाण्यातील दोन शब्द आणि मूळ शब्द वेगळे आहेत.

गाण्यातील शब्द खालीलप्रमाणे

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बापरखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥

आणि मूळ रचना खालीलप्रमाणे

इवलेसे रोप लावियलें द्वारी । 
त्याचा वेलु गेला गगनावरी ॥१॥

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुले वेचितां अति भारू कळियांसी आला ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बापरखुमादेवीवरू विठ्ठलीं अर्पिला ॥३॥

गाण्यातील रचना आणि मूळ रचना यात तीन मुख्य फरक दिसून येतात

१. ओव्यांचा क्रम
२. मूळ शब्दांत केलेले बदल

हे बदल करण्यामागील करणे नक्की काय आहेत हे अजून नीटसं माहित नसल्याने त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही. तसेच या वादात न पडता आपण मूळ रचनेला प्रमाण मानून पुढे जाऊ!

मोगराच का?

मोगरा फुल शुभ्र वर्णी आहे तसेच त्याचा सुगंध देखील मंद पण चिरंतन टिकणारे आहे. सात्विकतेचे भाव निर्माण करणारे आहे. आणखिन एक महत्त्वाची गोष्ट अशी की मोगऱ्याच्या झाडाला वर्षातून एकदाच फुले येतात. त्यामुळे जोपर्यंत त्याची वेळ येणार नाही तोपर्यंत फुले फुलत नाहीत. ज्याने कधी आत्मीयतेने एखादे फुलझाडाचे रोप लावले असेल, त्यालाच त्या रोपाची वाढ होऊन त्याला फुलांचा बहर येण्या मागचा आनंद समजू शकतो. तसाच काहीसा आत्मिक आनंद या रचनेत दिसून येतो. पण हा आनंद कोणताही बडेजाव आणणारा, तापदायक किंवा भडक नसून मोगऱ्यासारख्या सुकुमार, मंद पण परिणामकारक आणि शुभ्र (कलंक रहीत, अहंकारापासून दूर). अमूर्त गोष्टीच्या जाणिवेचे वर्णन करताना अशा प्रतिमांची रुपके संत साहित्यात खूपदा दिसून येतात.

मोगरा फुलला!

इवलेसे रोप लावियलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावरी ॥१॥
संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या वडील बंधुंना म्हणजेच निवृत्तीनाथ महाराजांना गुरू मानत. गुरूंच्या इच्छेचा मान ठेवून माऊलींनी भावार्थ दीपिका लोकांपुढे मांडली. पण आत्मबोधाचा, सत्याचा आणि धर्माचा अध्यात्मिक प्रवास अचानक सुरू झाला नाही आणि अचानक संपूर्ण झाला नाही. एखादे रोप अंगणात लावावे तसे गुरूंनी हे ज्ञानरूपी रोप माऊलींच्या हृदयात लाविले. माऊलींनी त्या रोपाला अगदी मनोभावे जपले आणि वाढवले. “विश्वाचे आर्त” मनी प्रकटण्याच्या अवस्थेला जेव्हा माऊली पोहोचले तेव्हा हे रोप हळूहळू मोठे होण्याची जाणीव होऊ लागली. हे ज्ञानरूपी रोप आपल्या डोळ्यांसमोर वाढताना महाराजांना अनुभवता आलं, त्याची अनुभूती घेता आली! आंतरिक सुखाची जाणीव.. जेव्हा या रोपाची पाने गगनाला म्हणजे अनंताला भिडू लागली. शून्य बीजातून अनंताच्या जाणि‍वेपर्यंत झालेला हा प्रवास.

मोगरा फुलला मोगरा फुलला । फुले वेचितां अति भारू कळियांसी आला ॥२॥
हे ज्ञानरूपी रोप मोठे झाले आणि योग्य वेळ येताच त्या रोपाला मोगऱ्याची फुले आली आणि ती फुलली. मोगरा म्हणजे मन. मन आत्मिक सुखाने फुलून आले! हा आनंद व्यक्त करण्यासाठी माऊलींनी मोगरा फुलण्याच्या रुपकाचा आधार घेतलेला आहे. एक गोष्ट जी लक्षात घेतली पाहिजे की “मोगरा फुलला” हे शब्द दोनदा आलेले आहेत. माझ्या मते याचे कारण असे की हा आनंद इतका मोठा आहे की मन एखाद्या अल्लड आणि निरागस मुलासारखं तो व्यक्त करत आहे. माऊलींनी जेव्हा साधना केली तेव्हा त्यांचे वय फार नव्हते त्यामुळे त्याचाही हा परिणाम असावा. ही फुले वेचताना आणखीन एक भावना दिसून येते की या मोगऱ्याच्या कळ्यांवर आलेला “अति भार”. गाण्यात बहरू शब्द आहे त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो आणि अति भार या शब्दाचा अर्थ वेगळा होईल. कळ्यांवर अति भार कशाचा आहे? हा नैसर्गिक प्रश्न आहे. माझ्या मते कळ्या म्हणजे भविष्यातील फुले! ज्ञानाच्या आणि सत्याच्या साधनेत, जाणीव झाली की आपोआपच जबाबदारी वाढते. ही जबाबदारी आपल्याला समजलेल्या सत्याच्या प्रसाराचे आहे. कारण मनाला पुन्हा फुले व्हायचे आहे, दरवळायचे आहे.

अति भारू या शब्दांचा आणखीन एक सूक्ष्म अर्थ असाही होऊ शकतो की, मोगरा फुलताना जे सत्य महाराजांना उमगले त्या सत्यामुळे नव्याने उमलणाऱ्या कळ्यांना देखील गुरुत्व प्राप्त झालेले आहे. मानवी शोधाचा प्रवास असाच असतो. आपण जे काही शिकतो, समजतो त्याच्याच आधारावर पुढील प्रवास सुरू ठेवतो. त्यामुळे प्रत्येक पुढच्या टप्प्यावर आधी उमगलेल्या ज्ञानाचा भार असतोच. त्यामुळे भार म्हणजे ज्ञानाचे गुरुत्व असाही अर्थ होऊ शकतो!

मनाचिये गुंती गुंफियेला शेला । बापरखुमादेवीवरू विठ्ठलीं अर्पिला ॥३॥
मनाचिये गुंती… मनाचा गुंता! माणसाचे मन फार विचित्र आहे. ज्याचा विचार करायचा नाही ठरवतो त्याचेच विचार वादळासारखे येतात, कित्येक व्याख्या, तर्क-वितर्क-कुतर्क, वाद-संवाद, प्रमाद आणि यांच्या पल्याड असलेले सत्याचे गाव! एकंदरीतच माणसाचे मन विचारांच्या गुंत्यापासून सूक्ष्म अंतरावर असते. पण ज्ञानेश्वर माऊलींनी या गुंत्यातून सत्याचा धागा शोधून काढला आणि त्याचा की शेला गुंफला. गुंफला हा शब्द देखील महत्त्वाचा आहे कारण, शेला म्हणजे वस्त्र आणि ते स्वतःच्या हाताने गुंफले आहे जणू मोगरा प्रेमाने आणि अलगदपणे एखाद्या माळेत गुंफावा. हा मोगऱ्याचा शेला विठ्ठलाला अर्पिला. आत्मबोधाची ही अवस्था असताना महाराजांनी आपल्या मनातील सत्याच्या जाणिवेला, सुकुमार – पवित्र मोगऱ्याच्या फुलांना विठ्ठलाला अर्पण केले. अखेर सत्य परमेश्वरप्राप्तीचा मार्ग आहे.

एखाद्या रोपाला प्रेमाने वाढवावे. त्या रोपाला सुंदर फुले यावीत आणि त्या फुलांना मनोभावे देवाला अर्पण करावे इतक्या सोप्या पण पवित्र मार्गाला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आत्मबोधाच्या प्रवासाचे रूप दिलेले आहे. इतकी निर्मलता, पवित्रता आणि निरागसता क्वचितच पाहायला मिळते.


अजून अध्यात्मिक भावार्थ वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Click to rate this post!
[Total: 6 Average: 4.3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *