December 9, 2024
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पाटलीणबाईंनी केलेली टीका शांतपणे ऐकून घेतली!

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पाटलीणबाईंनी केलेली टीका शांतपणे ऐकून घेतली!

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराजांचा कोडोली गावी मुक्काम 

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून स्वराज्यात परत येत होते तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी विश्राम केला. अनेक लोकांनी, कुटुंबांनी आणि साधू-संतांनी त्यांची या प्रवासात मदत केली. वेषांतर केल्यामुळे त्यांना कोणीच ओळखू शकत नव्हते. त्याच प्रवासातील हा एक रोचक किस्सा जेव्हा एका गावच्या पाटलीणबाई छत्रपती शिवाजी महाराजांवर भयंकर चिडल्या, त्यांना वाईट साईट बोलल्या. पण, त्यांना हे माहीतच नव्हतं की हे सगळं त्या खुद्द छत्रपतींनाच ऐकवत आहेत. 

तर झालं असं.. 

पूर्वार्ध

हा संबंध भूभाग मुघलांच्या ताब्यात होता. महाराजांच्या आज्ञेनुसार मराठा सैन्य मुघलांच्या मुलुखात धुमाकूळ घालत होते, मुघली सैन्याची दाणादाण उडवत होते. त्याचाच एक भाग म्हणजे शत्रूच्या मुलुखावर आक्रमण करून लूट करणे (सुरतेची लूट एक सुपरिचीत उदाहरण). या स्वाऱ्यांचा मूळ उद्देश जीवितहानी कधीच नसे. शत्रूच्या आर्थिक आधारांना धक्का देणे, शत्रुसैन्यात आपला धाक निर्माण करणे या उद्देशाने अशा स्वाऱ्या केल्या जात. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या स्वाऱ्या आणि मुघल व निजामी सैन्यांनी केलेल्या स्वाऱ्या यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. त्यानुसार महाराजांचे मातब्बर सरदार आनंदराव आणि तेलंगराव यांनी कोडोली च्या भागात भयंकर धुमाकूळ घातला. त्याच्या कचाट्यात पाटलांचे घर देखील आले! 

उत्तरार्ध

महाराज नुकतेच आग्र्याहून सुटका करून घेण्यात यशस्वी झाले होते. मोठा अवघड आणि जोखमीचा प्रवास होता. महाराज आणि त्यांचे सहकारी गोसावींच्या वेषात प्रवास करत होते. चांदा, देवगड करत त्यांना इंदुरी या गावाला पोहोचायचं होतं. वाटेत गोदावरी नदीच्या खोऱ्यात कोडोली किंवा कोडवली या गावात महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी मुक्काम करायचं ठरवलं. संध्याकाळीते सगळे गावच्या पाटलांच्या घरी पोहोचले. आनंदराव आणि तेलंगराव यांची स्वारी नुकतीच येऊन गेलेली होती. पाटलांकडे आता फारसं काही उरलेलं नव्हतं. पण, गोसावी दारात आले आहेत नाही कसं म्हणावं? म्हणून पाटलीणबाईंनी जमवाजमव करून जेवणाची तयारी केली.

पण.. संबंध जेवण होईपर्यंत पाटलीणबाई धुसफुसत होत्या. विचारणा केल्यावर त्यांनी आपला संताप प्रकट केला. त्यांनी त्यांच्या समोर बसलेल्या गोसावींच्या समूहाला आपली हकीगत सांगितली. शिवाजी महाराजांच्या सरदारांनी गावाला कसे लुटले? ते सविस्तर सांगितलं. त्यांचा संताप अनावर होत होता. शिवाजी महाराजांना, खुद्द त्यांच्या समोरच नावे ठेवत होत्या. इतक्यावर देखील न थांबता त्या पुढे म्हणाल्या की दिल्लीलाच शिवाजी महाराज मेले तर बरे होईल!

हे ऐकून मात्र शिवाजी महाराजांच्या साथीदारांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले.. पण आश्चर्य म्हणजे महाराजांच्या चेहऱ्यावर स्मित होते. थोड्या वेळाने त्यांनी पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याकडे पाहिलं. पेशवे समजायचं ते समजले आणि त्या कुटुंबाची नोंद करून ठेवली. सगळ्यांनी जेवण आटोपलं आणि महाराजांसकट सगळे पुढच्या प्रवासाला निघून गेले.

राजगडावर सुखरूप पोहोचल्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोडोली गावचे पाटील आणि त्यांच्या पत्नी यांना यथोचित सन्मान केला व त्यांना द्रव्य देखील दिले!

आपल्यावर झालेली टीका देखील चेहऱ्यावर स्मित ठेवून शांतपणे ऐकणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज!

असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज!.. उदार, दयाळू आणि मायाळू देखील. वास्तविक पाहता महाराजांचा असा अपमान कोणी केला असता तर नक्कीच शिक्षा झाली असती. पण, इथेच शिवाजी महाराजांचे थोरपण दिसून येते, त्यांचा संयम दिसून येतो, स्त्रियांबद्दल त्यांचा आदरभाव दिसून येतो (नाहीतर स्त्रियांची प्रतारणा केल्याच्या अनेक घटना मुघल आणि निजामाच्या सरदारांनी घडवून आणल्या होत्या!). आपल्यावर झालेली टीका देखील चेहऱ्यावर स्मित ठेवून शांतपणे ऐकणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज!

रामदास स्वामी “शिवरायांचे आठवावे रूप..” उगाच म्हणत नाहीत. जगातल्या सगळ्या शासनकर्त्यांसाठी एक आदर्श आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज! 🙏🏻

संदर्भ:

  1. रायरी बखर 
  2. E. J. Frissel in G.W. Forrest’s selections from the letters, despatches and other state paper

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका व त्यानंतरच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

इतर ऐतिहासिक विषयांवरचे ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

One thought on “छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पाटलीणबाईंनी केलेली टीका शांतपणे ऐकून घेतली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *