February 17, 2025
सुंदरा मनामध्ये भरली – शाहीर रामजोशी – संपूर्ण लावणी

सुंदरा मनामध्ये भरली – शाहीर रामजोशी – संपूर्ण लावणी

Spread the love

“सुंदरा मनामध्ये भरली” या सुप्रसिद्ध लावणीचे रचनाकार शाहीर रामजोशी! महाकवी मोरोपंत यांनी ज्यांना कविप्रवर म्हणून संबोधले ते रामजोशी. ज्यांच्या काव्यावरून केशवकरणी हा छंद निर्माण झाला ते शाहीर रामजोशी. राम जगन्नाथ जोशी म्हणजेच शाहीर रामजोशी, पेशवेकाळातील एक उत्तुंग कवी, कीर्तनकार. “वेदशास्त्रसंपन्न शाहीर” म्हणवण्याचा मान बहुदा रामजोश्यांनाच मिळू शकेल. सोलापूर येथे एका वेदोक्त ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला पण ओढ कायम लावणीची! रोमजोशीं यांची लावणी जितकी अध्यात्मिक तितकीच शृंगारिक होती.

सुंदरा मनामध्ये भरली रामजोशी लावणी पूर्ण Complete
लोकशाहीर रामजोशी चित्रपट (१९४७)

त्यांच्यावर १९४७ साली एक चित्रपट देखील केला गेला जो त्या काळी अत्यंत लोकप्रिय ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शक बाबुराव पेंटर आणि निर्माते व्ही शांताराम होते. शाहीर रामजोशी यांची लावणी ओघवती आहे, शब्दांची रचना ठसठशीत आणि उत्तम गेयता असलेली. त्यांची एक अत्यंत प्रसिद्ध लावणी “सुंदरा मनामध्ये भरली”! सिनेमात शाहीर रामजोशी यांचे पात्र जयराम शिलेदार यांनी वठवले आणि ही लावणी देखील गायली. इतकी वर्षे झाली तरीही या गाण्याची लज्जत किंचितही कमी झालेली नाही. पण चित्रपटात या लावणीतील काहीच कडवी घेतलेली आहेत. या ब्लॉगमध्ये आम्ही “सुंदरा मनामध्ये भरली” ही संपूर्ण लावणी देत आहोत!

सुंदरा मनामध्ये भरली जरा नाहीं ठरली
हवेलित शिरली मोत्याचा भांग ।
अरे गड्या हौस नाहीं पुरली म्हणोनि विरली
पुन्हा नाहीं फ़िरलि कुणाची सांग ॥ध्रु०॥

जशि कळी सोनचाफ़्याची न पडूं पाप्याची
दृष्टी सोप्याची नसल ती नार ।
अति नाजुक तनु देखणी, गुणाची खाणी
उभी नवखणी चढुन सकुमार ।
जशि मन्मथरति धाकटी सिंहसम कटी
उभी एकटी गळ्यामध्यें हार ।
अंगि तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर
मारिते लहर मदन तलवार ।
पायी पैंजण झुमकेदार कोणाची दार
कोण सरदार हिचा भरतार ?
कुलविद्याजडाव टिकली मनामध्यें टिकली
नाहीं हटकिली तेज अनिवार ।
नाकामध्यें बुलाख सुरती चांदणीवरती
चाळते गड्या गजाची चाल लड सुरली कुरळे बाल
किनखाप अंगिचा लाल हिजपुढें नको घनमाल ।
शोभवी दिठोणा गाल हिला जरि शाल
विषय भोगाल फ़िटाल तरि पांग
ही शुध्द इंदुची कळा मतिस ना कळा
इतर वाकळा न हिजहुन चांग ।
सुंदरा मनामध्ये भरलि जरा नाहीं ठरली० ॥१।।

सुंदरी मूर्ति मदनाची अमृतवदनाची
मदन कदनाची विखारी धार ।
बाहुली कामसुत्रांत मदन नेत्रांत
कोकशास्त्रांत निपुण ही फ़ार ।
शुक पिक यांणि धरिली लाज जहालें बाज
कंठि आवाज विण्याची तार ।
ही मन्मथ नवरस हवा काय पहावा
बूट व्हावया सफ़ल संसार ।
कचबनांत सौदामिनी दिवस यामिनी
जपावी मनीं कीं नकळे सार ।
वेणींत मुद राखडी कोर चोखडी
माडीवर खडी विडा रंगदार ।
मणि कुसुम कर्ण शोभवी, मतिस लोभवी
मला तरी भवीं वाटली सार ।
नव्हे सुगंधा प्रौढा बाल दाविते तरु धोताल
जितकंबुक तिचें-नाल अप्सरा गुणी गुंजवाल।
वाटली मदन करवाल काय करवाल?
कसे ठरवाल ? हिचें कनक आंग ।
धाकुटि म्हणून कैंकांची तुम्ही ऐकाची
हिणे कैकांची उतरली भांग ।
सुंदरा मनामध्ये भरली जरा नाहीं ठरली० ॥२॥

भुजबंद छंद नग नवा, बसविला जवा
तंत ताजवा न नग बहु भार ।
त्रिवळी तळीं कांची दाम मौक्तिकोद्दाम
हिचा दरदाम जाणतो मार ।
नखिं नखिं मेंदि रंगलाल अंगठीवर लाल
बहुत गुलजार चमक हिल्लाल ।
सोन्याचे पाय जीवतळी मदनपूतळी
टाकि भूतळी मंजु झुंमकार ।
सुंदरि म्हणसि बाहेर चाल बाहेर
हिचें माहेर कुठे घरदार ।
ती उभी जवळि तिचि बटिक चढून जा हटिक
बोल चाल ठीक माडीवर वार ।
दैवाने घ्यावि लाधली नार बांधली
बहुत साधली विरळ कुणिवार ।
यापरिं होऊनि बेताल
तो तरुणही कुनका बाल ।
पुरविला मनाचा ख्याल
हा दर्द कठिण बेताल ।
म्हणुनि जर टाकाल नाहक बहकाल
सुरस चाखाल कुठून मग सांग ।
कविराय चमकला हीर लोकजाहीर
इतर शाहीर काजवे वांग ।
सुंदरा मनामध्ये भरली जरा नाहीं ठरली० ॥३॥

शब्दयात्री मार्फत आपल्या जुन्या आणि प्रतिभासंपन्न कवींच्या रचना समोर आणत राहूच. पण तूर्तास ज्यांना लावण्यांची आवड आहे तसेच आपल्या मराठी कवींच्या रचना वाचायला आवडतात त्यांच्यापर्यंत ही संपूर्ण लावणी नक्की पोहोचवा!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *