तोसुई नावाचे एक खूप प्रतिष्टीत आणि मोठे झेन धर्मगुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. तोसुई वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये जाऊन प्रवचन द्यायचे.
झेन ची प्रवचने देता देता त्यांची ख्याती इतकी वाढली की त्यांच्या अनुयायांची संख्या खूप जास्त वाढली. जिथे जिथे तोसुई जायचे तिथे तिथे त्यांचे अनुयायी जायचे. हळूहळू तोसुई गुरूंना याचा उबग आला आणि सगळं फोल वाटू लागलं.
एके दिवशी त्यांनी आपल्या सगळ्या अनुयायांना त्यांच्यापासून दूर जाण्यास सांगितले. तोसुई गुरूंनी सक्त ताकीद दिली की “कोणीही त्यांच्या मागे यायचं नाही, त्यांना शोधायचा प्रयत्न करायचा नाही आणि पुन्हा कधीही त्यांना भेटायचा प्रयत्न करायचा नाही”
अशी ताकीद देऊन तोसुई गुरू मठ सोडून गेले. त्यानंतर त्यांना कोणीही कुठेही बघितलं नाही. पण, एके दिवशी त्यांच्या एका जुन्या अनुयायाने त्यांना क्योटो शहरात एका पुलाच्या खाली भिकाऱ्यांच्या वस्तीत ओळखलं. तोसुई गुरू एका भिकाऱ्याबरोबर त्याच्या जागी राहत होते.
अनुयायी लगेच तोसुई गुरूंकडे गेला आणि म्हणाला
“मी इतकी वर्षे तुम्हाला शोधलं. कृपया पुन्हा एकदा मला तुमचा शिष्य बनवा. मला तुमचा अनुयायी होऊ दे”
सुरुवातीला तोसुई गुरूंनी विनंती धुडकावून लावली पण त्या जुन्या अनुयायाने खूप विनंती केल्यावर तोसुई गुरू म्हणाले
“तुला माझ्याबरोबर दोन दिवस इथे राहावं लागेल. जर तू दोन दिवस राहू शकलास तर मी तुला पुन्हा माझा शिष्य बनवेन”
अनुयायी मान्य करतो आणि दुसऱ्या दिवशी तोसुई गुरूंबरोबर राहायला येतो.
त्या रात्री एका भिकाऱ्याच्या मृत्यू होतो. सगळे भिकारी, तोसुई गुरू आणि अनुयायी मिळून त्या मृत भिकाऱ्याचे अंतिम विधी एका डोंगराच्या पायथ्याशी करतात. परत वस्तीत आल्यावर अनुयायी अन्न मागायला बाहेर जायच्या तयारीत असतो तेव्हा तोसुई गुरू म्हणतात
“आज अन्न मागायला जायची गरज नाहीये. त्या मेलेल्या भिकाऱ्याने त्याच्यासाठी जे अन्न गोळा केलेलं होतं ते आपण खाऊ शकतो”
खाऊन झाल्यावर तोसुई गुरू अगदी गाढ झोपी गेले पण त्या अनुयायाला अजिबात झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी अनुयायी गुरूंना म्हणतो की तो या वस्तीत राहू शकत नाही. तोसुई गुरू त्याला म्हणतात.
“मला माहिती होतं तू राहू शकणार नाहीस. आत्ताच्या आटा चालता हो आणि पुन्हा कधीही मला शोधायचा किंवा माझ्याकडे यायचा प्रयत्न करू नकोस!”
अनुयायी मान खाली घालून निघून जातो.
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..