January 12, 2025
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली – सुरेश भट । एक नवे रसग्रहण Image by Basil Smith from Pixabay

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली – सुरेश भट । एक नवे रसग्रहण

Spread the love

गझल

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

(शेवटची २ कडवी गाण्यात घेतलेली नाहीत)

या कवितेचे रसग्रहण करण्याआधी मला “कविता आणि तिच्या गुणधर्माविषयी” सुचलेल्या काही ओळी.. 

कविता ही अनंत पैलू असलेल्या लोलकाप्रमाणे असते. प्रकाश कुठून येत आहे? आणि तुम्ही लोलकाकडे कुठल्या दिशेने बघत आहात? यावरून तुम्हाला किती व कोणते रंग दिसतील हे अवलंबून असतं. त्यामुळे लोलक जरी एकच असला तरिही, आपापल्या प्रकाशानुसार आणि स्थानानुसार प्रत्येकाला वेगवेगळे रंग दिसू शकतात!

केव्हा तरी पहाटे ही सुरेश भटांची एक अप्रतिम आणि अत्यंत नाजूक गझल. आयुष्यावर, वेदनांवर अत्यंत परखडपणे “मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते” लिहिणारे ते सुरेश भट हेच का? इथपर्यंत प्रश्न पडावा अशी ही गझल! आशा ताई यांचे लडिवाळ सूर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने ही गझल तमाम मराठी जीवनाचा एक भागच करून टाकलेली आहे. हे गाणे तर लहानपणापासून ऐकत आलेलो आहे पण जेव्हा ‘कळायला लागलं’ तेव्हापासून या गझलकडे मी ‘एकाच नजरेने’ बघत आलेलो आहे. साहजिकच आहे ते ही.. कारण

केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली..

या ओळीतच एक प्रकारचा प्रणय आहे! मराठी सिनेमांमुळे म्हणा किंवा सांप्रत काळातील काही अध्याहृत सोपस्कार म्हणा, पण काही गोष्टींचा संबंध त्या रात्री सुरू होऊन पहाटे संपतात एवढंच आपण शिकलेलो आहोत. चुकीचं काहीच नाही पण, मला गझलेचा एक निराळाच अर्थ दिसला तो तुमच्यापुढे मांडत आहे.

रसग्रहण

रसग्रहण आणि मीमांसा करायलाच बसलो आहे तर थोडी पार्श्वभूमी सांगणं आलंच. मला सुरेश भटांची ही गझल ऐकताना (जरीही अध्याहृत अर्थ माहित असला तरीही) एक प्रश्न कायम पडतो तो म्हणजे या गझलमधले शब्द. अत्यंत मऊ, नाजूक, मुलायम आणि तरल! एकही शब्द कानाला टणक लागत नाही. प्रेमभावना किंवा पुसटसं स्वप्नरंजन आहे ज्याला इंग्रजीत Romanticisim म्हणतात, तरल भावना दिसते पण कुठेही थेट प्रणय नाही (एका कडव्यातल्या सुटलेल्या मिठीबद्दल पुढे बोलेनच).. असं का?

दुसरी एक गोष्ट जी माझ्यामते विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे संपूर्ण गझल ही जणू काही एखाद्या प्रवासातील संपलेल्या टप्यांचा मागोवा आहे. एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे, कारण प्रत्येक कडव्यात सुरेश भट आपल्याला रात्रीच्या जाण्याची आठवण करून देतात. थोडक्यात तो टप्पा आता ओलांडलेला आहे आणि काळाने एका नव्या प्रदेशात प्रवेश केलेला आहे!

त्यातून,

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

या कडव्यातील, ‘ सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना माझी खात्री पटली की किमान माझ्यासाठी तरी ही गझल ‘नुकत्याच वयात आलेल्या एका मुलीची आहे’!

वयात येणं म्हणजे काय? हे माझ्या मते अजून तरी कोण्या मुलीला तितकंसं नीट सांगता आलेलं नाहीये. खरं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण ही प्रक्रिया होत असताना फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक बदल देखील घडतात. बहुतांशी तरुणी, ‘अगदी नकळत, अचानक काहीतरी जादुई घडतं आणि तुम्हाला अचानक जाणीव होते की आता आपण लहान राहिलेलो नाही. शब्दांत सांगणं कठीण आहे पण, संपूर्ण जग वेगळं दिसायला लागतं. जाणिवांमध्ये बदल घडतो. ऊगाच स्वतःकडे बघावंसं वाटतं, लाजल्यासारखं होतं. एक वेगळ्याच जगात आपण आलेलो आहोत असं वाटतं, जणू काही आयुष्याचं एक पान उलटलेलं आहे.. इत्यादी इत्यादी’

या सगळ्या विचारांचं प्रतिबिंब मला या कडव्यात आणि लाक्षणिक अर्थाने संबंध गझलेत दिसतात. की नायिकेने अगदी नकळत, बालपणाचा टप्पा ओलांडून आता तारुण्याच्या प्रदेशात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ती म्हणते की मी नुकतीच या प्रदेशात आलेली आहे, हा प्रदेश काय आहे कसा आहे हे आत्ताच कसं सांगता येईल? या कोवळ्या उन्हाचे वय आत्ताशी आलेले आहे, ते किती हे कसं सांगता येईल. इथे कुठेतरी मला ‘मुलींचे वय न सांगण्याची खोड (प्रथा!) देखील दिसते’!

त्यामुळे नायिका म्हणते की आत्ता तरी सांगणं कठीण आहे की नक्की काय घडलंय? कारण माझ्यासाठी देखील हे नवीन आहे आणि नकळत, कुठलीच कल्पना नसताना घडलेलं आहे. किंबहुना रात्रीने मला न सांगता या प्रदेशात आणून सोडलं आहे आणि स्वतः निघून गेली. रात्री मी वेगळ्या विश्वात होते आणि रात्र संपली आणि पाहत होत अली तेव्हा समजलं की रात्रीने फसवलं (वाईट अर्थाने नव्हे!). हा यौवनाचा प्रदेश नवीन असल्याने धडधड होतआहे इतकंच, त्यामुळे श्वास देखील उसवत आहेत!

आता प्रकाश, त्याची दिशा आणि माझा दृष्टिकोन एव्हाना तुमच्या लक्षात आला असेलंच तर या संधीच्या अंतरंगातून कोणकोणते रंग दिसतात ते पाहू! मी नेहमीप्रमाणे रसग्रहण करणाऱ्यांपैकी नाही त्यामुळे मी दरवेळेस कवितेच्या सुरुवातीपासून सुरुवात करेन याची खात्री नाही. याचं मुख्य कारण म्हणजे मी देखील कवी आहे आणि कवी लोक कुठल्या खाचेत काय लपवून ठेवतील याचा नेम नसतो हे मला पुरतं ठाऊक आहे!

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

आधी म्हटल्याप्रमाणे, नायिकेला पहाट केव्हा झाली हे समजलंच नाही! फक्त डोळे उघडले तेव्हा समजलं की काल ज्या रात्रीत आपण झोपलो होतो ती रात्र आता उलटून गेलेली आहे. कालपर्यंत मी जी होते ती मी आता राहिलेली नाही. दुसरी पंक्ती खूप छान आहे, ‘मिटले चुकून डोळे’ बालपण कुणाला आवडत नाही पण शेवटी त्यालाही सीमा आहे! खेळून खेळून मुलं देखील अगदी नकळत पापण्या मिटून झोपून जातात. तेच नायिकेचं झालं आणि तिला झोप लागली. मग ती लाडीकपणे म्हणते की माझ्या त्या बेसावध असण्याचा फायदा घेऊन रात्र निसटून गेली, मला सोडून गेली. एक अर्थ असाही होऊ शकतो की, तिच्या डोळ्यात कुठेतरी ती रात्र हरवली, थोडक्यात नायिका स्वप्नांत हरवली, एखाद्या झोपलेल्या परीप्रमाणे!

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

आधी नमूद केल्याप्रमाणे, मला या कडव्यात मिठी ही प्रणयाची मिठी वाटली नाही याचं मुख्य कारण म्हणजे आधीचे आणि नंतरचे कडवे. आधीच्या कडव्यात कुठेतरी एक बालपण आहे, अल्लडपणा आहे. नायिकेचे डोळे तिच्याही नकळत एखाद्या लहान मुलीसारखे मिटून गेले. लहान मुलगी (लहान मुलं सुद्धा) झोपताना काहींना काही मिठीत घेऊन झोपते ही कल्पना अगदीच स्वाभाविक वाटते. अशा वेळी ती कशाला मिठीत घेत असेल? एखादी अल्लड परी कुणाला मिठीत घेत असेल? ती मिठीत घेते तिच्या ‘स्वप्नांना’!

माझ्या मते ही मिठी म्हणजे नायिकेने, त्या अल्लड लहान मुलीने तिच्या अल्लड स्वप्नांना मारलेली मिठी आहे. वयात येत असताना ही अल्लड स्वप्नांची, बाल्यावस्थेतील कल्पनांना मारलेली मिठी नकळत सुटली आणि त्या सुटलेल्या मिठीबरोबर ती रात्र म्हणजे बाल्यावस्था देखील नकळत निसटून गेली. पण ही अल्लड बाल्यावस्था नव्हे, तर पोक्त आणि समजूतदार, एखाद्या वयाने व अनुभवाने मोठ्या असलेल्या मैत्रिणीसारखी. याबद्दल आपण पुढच्या एका कडव्यात बोलू. नंतरच्या कडव्यामध्ये हे आणखीनच स्पष्ट होते ‘आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..’ तेव्हा याबाबद्दल पुन्हा बोलूच!

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

आतापर्यंत या कडव्याबद्दल आपण बरेच बोललेलो आहोत. पण तरीही पुन्हा एकदा सांगणं आलंच की, या कडव्यात नायिकेची एक विचित्र अवस्था आपल्या समोर येते. बदल तर घडलेला आहे पण तो नक्की काय हे सांगता येत नाहीये! आणि लडिवाळपणे ती रात्रीला किंवा बाल्यावस्थेला जणू काही खोट्या खोट्या रागाने म्हणजे माझे श्वास उसवून, मला या अनोळखी प्रदेशात सोडून तू मला फसवून निघून गेलीस गं!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

पण हा बदल नुकताच घडलेला आहे त्यामुळे अजूनही रात्रीच्या काही आठवणी काही जाणीव ताज्या आहेत. प्रदेश बदलला म्हणून माणसात लगेच बदल होत नाही. तो हळूहळूच घडत जातो. कल्पना करा की आपण भलत्याच गावी राहायला आलेलो आहोत! सवय होईपर्यंत कुठे ना कुठे आधीच्या गावाच्या स्मृती मनावर उमटत राहतातच! तसे नायिकेला या चांदण्यांचे आवाज (याला दुर्बोध म्हणणाऱ्यांनी अजून शब्दांचे गंध आणि रंग अनुभवलेला नाही इतकंच म्हणेन) आठवत आहेत, पुसटसे. वयात येणं म्हणजे लहानपणीच्या सगळ्या आठवणी पुसून टाकणं नसतं . कुठे ना कुठे त्या आठवणी डोकावत राहतात आणि वयात आल्यावर काही दिवस कदाचित जास्तच. पण आता कितीही आठवण झाली तरीही पुन्हा मागे फिरणे नाही कारण चांदण्याची आठवण मनात असली तरीही ती प्रत्यक्षात अनुभवायची असेल तर चंद्र-चांदण्यांची गरज असते. पण रात्र या तारकांना घेऊन गेलेली आहे त्यामुळे, पुन्हा मागे फिरून ते चांदणे अंगावर घेता येणार नाही, फक्त काही स्मुती मनात राहतील.

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!

नायिका आठवण्याचा प्रयत्न करत आहे की हा बदल घडण्याचा आधी नक्की ती काय विचार करत होती? कदाचित ते विचार आठवून ‘आपण किती लहान होतो?’ म्हणत गाळलातल्या गल्त हसत देखील असेल. पण कितीही असले तरीही तीही एक गोड अवस्था होती. फक्त नकळत सगळं घडल्याने थोडं भांबावल्यासारखं होत आहे, आठवणी लवकर पुसत होत आहेत. या विचारांना, बाल्यावस्थेतील गाण्याला (बडबड गीताला?!) पूर्णविराम कसा द्यावा? हे नायिकेला सुचत नाहीये. इथे रात्र एखाद्या मैत्रिणीसारखी नायिकेच्या मदतीला धावून येते आणि पहाट व्हायच्या एक शेवटची ओळ सुचवून नायिकेचे गाणे पूर्ण करून जाते. तिच्या बाल्यावस्थेला एक नाजूक आणि समर्पक पूर्णविराम देऊन जाते.

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

हे कडवे गाण्यात नाही. का? ते माहित नाही असो.. पंडितजींच्या निर्णयाला आपण कोण विचारणार? पायीची वहाण..

हे कडवं वाचल्यावर माझी खात्री आहे की, तुम्हीही मान्य कराल की आधीच्या कडव्यात आलेली मिठी ही स्वप्नरंजन दाखवणारी असली तरिही तितकी प्रणयाने भरलेली नाही. नायिका चंद्रकोरीला कुशीत घेऊन झोपलेली होती. चंद्रकोर म्हणजे काय? एका लहान मुलीचे स्वप्न! चांदोबा म्हणतो म्हणजे तुम्हाला देखील समजायला सोपं जाईल! कुणाला वाटणार नाही चंद्रकोरीला कुशीत घेऊन झोपावं. लहान मुलांचा सगळ्यात लाडका असतो तो चंद्र. लहानपणापासून ज्या एका गोष्टीने जवळजवळ सगळं कल्पनाविश्व व्यापलेलं असतं ती म्हणजे चंद्र. मुलांना बाकी काही नाही दिसलं तरी चालतं पण चंद्र दिसला नाही की चैन पडत नाही!

त्या स्वप्नांबद्दल नायिका म्हणते की आता जाग आलेली आहे आणि हे कळून चुकलेलं आहे की ती चंद्रकोर आता माझ्या हातात उरलेली नाही. रात्रीने नकळत तारकांचे आकाश आधीच्याच कडव्यात पार्ट नेलेले आहे, कायमचे! पण कुशीतील चंद्रकोर नेणं तितकंसं सोपं नाही! जरा धक्का लागला असता तर नायिकेला जाग अली असती हे रात्रीपणाने नायिकेला देखील माहित आहे. त्यामुळे रात्रीने जाताजाता अगदी हलक्या हाताने, ती नायिकेच्या कुशीतली चंद्रकोर काढून घेतली आणि जाग येऊ नये म्हणून नायिकेची कूस बदलून पुन्हा तिला ग्लानीत नेलं.

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

आता नायिकेला जाग आलेली आहे. काहीतरी घडलेलं आहे हे कळलेलं तर होतंच आता वळलेलं देखील आहे. आपण या प्रदेशात आलेलो असलो तरीही आधीच्या प्रदेशाच्या खुणा संपलेल्या नाहीत. उलट तिथल्या घटनांचे अर्थ आता अधिक स्पष्ट होत आहेत, नायिकेला आता त्या पोक्त मैत्रिणीच्या मनःस्थितीची जाणीव सहज होत आहे. म्हणून म्हणते की दुलईला अजूनही मोगऱ्याचा सुगंध येत आहे. मोगऱ्याचा गाजर घालणारी ही मैत्रीण! ती आता निघून गेलेली आहे.

पण तिलाही जाताजाता नायिकेला काहीतरी आठवण म्हणून देऊन जायचा मोह आवरला नाही त्यामुळे तिच्या केसांत माळलेल्या मोगऱ्याच्या गजरा नायिकेपाशी ठेवून ती गेली. नायिकेला वाटत आहे की ही रात्र सगळं काही बदलून, मला न सांगता निघून गेली मग हे गजरा ठेवण्याचं प्रयोजन काय? प्रयोजन इतकंच की रात्रीची, आधीच्या आयुष्याची एक का होईना पण आठवण म्हणून तो गजरा ती नायिका जपून ठेवेल, त्या गजऱ्याचा सुगंध तिला काही क्षणांसाठी का होईना पण मनोमन नायिकेला पुन्हा त्या बालपणाच्या प्रदेशात घेऊन येईल. या दोन मैत्रिणी पुन्हा एकदा भेटतील, खेळतील. काही क्षणांपुरत्या का होईना एकमेकींशी खेळतील!

तर अशी ही मला भावलेली, उमगलेली सुरेश भटांची “केव्हा तरी पहाटे” ही गझल. तुमचा अभिप्राय वाचायला नक्की आवडेल!

वयात येण्याच्या प्रक्रियेचा इतका सुंदर शब्दाविष्कार माझ्या बघण्यात नाही! ती रात्र म्हणजे बाल्यावस्था जणू काही तिची पोक्त मैत्रीण बनून तिला, जाणून बुजून पण हलकेच तारुण्याच्या हवाली करत आहे. यात माया तर आहेच, प्रेम देखील आहे! निसर्गाचा नियम आहे पण काहीतरी आठवण मागे ठेवून जाण्याचा मानवी मोह देखील आहे!

इतर रसग्रहण वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

8 thoughts on “केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली – सुरेश भट । एक नवे रसग्रहण

  1. Enthralled by the Words ………! For the First time , read heart touching Marathi ghazal . Thanks for sharing.. Love literature irrespective of Language (although i am Gujrati born & bought up in Mumbai – grown up in Cosmopolition South Mumbai building & proud to score Highest (60%) in Marathi in S.S.C while studying in English medium School

  2. मोगर्याची फूले ओंजळीत घ्यावी नी जुईच्या फूलांचा मंद मोहक गंध यावा , असं रसग्रहण वाचताना वाटलं . कोणताही शब्द कोणतीही भावनिर्मिती करु शकतो हे कविमनाचे तरलपण आहे. फक्त एकदा स्त्रवलेला भावप्रवाह अखंडीत राहण्यासाठी पुढील शब्दांनी संगत केली की बस.
    असेच शब्द वरील रसग्रहणात हातात हात घालून कल्पनेच्या खांद्यावर हनुवटी टेकवून चाललेले दिसले.
    जरासं वेगळं ………

  3. मला या गझल चा अर्थ वेगळाच वाटलं कि एक नवीन लग्न झालेलं झोडपे एक दिवस एकमेकांसोबत राहून एकाला काही कामानिमित्त दूर जावे लागत असेल आणि काही दिवसानी त्याला स्वप्न पडले असेल आणि ते स्वप्न म्हणजे ही गजल होय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *