झेन गुरू बांकेई पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्यांच्या व्याख्यानाला येत असत. फक्त झेन पंथीयच नव्हे तर इतर पंथांचे लोक देखील त्यांचे व्याख्यान ऐकायला यायचे. याचे मुख्य कारण असे होते की गुरू बांकेई आपल्या व्याख्यानात झेन पंथाचे काहीही सांगत नसत. ते फक्त मनापासून जगण्याबद्दल उपदेश करत असत.
त्यांची लोकप्रियता बघून निचिरेन पंथाचे एक गुरू खूप रागावले. याचं मुख्य कारण असं की त्यांचे शिष्य देखील गुरू बांकेईंच्या व्याख्यानाला जाऊ लागले. एकदा अशाच एका व्याख्यानाच्या वेळी निचिरेन पंथाचे गुरू, व्याख्यानाच्या ठिकाणी शिरले आणि जागेवरून चिडून ओरडले
“अहो झेन गुरू! जरा थांबा”
जमलेले सगळे लोक आश्चर्याने आवाजाकडे बघू लागले. निचिरेन गुरू पुढे बोलू लागले
“तुमचे जे अनुयायी आहेत फक्त तेच तुमचं आज्ञापालन करतात. पण माझ्यासारखे जे तुमचे अनुयायी नाहीयेत, तुमचे आज्ञापालन करणार नाहीत. तुम्ही मला तुमच्या आज्ञेचे पालन करायला लावू शकता?”
“इकडे माझ्या इथे या म्हणजे मी सिद्ध करू शकेन” गुरू बांकेई म्हणाले
ईर्षेने निचिरेन गुरू रागारागाने लोकांना बाजूला करत पुढे येतात.
“इकडे माझ्या डाव्या बाजूला या” गुरू बांकेई शांतपणे
दुसरे गुरू डाव्या बाजूलाजाऊन उभे राहतात.
“नको” गुरू बांकेई जरा विचार करून पुन्हा म्हणतात “तुम्ही जर उजव्या बाजूला आलेत तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे संवाद साधता येईल. कृपया इकडे येता का?”
निचिरेन गुरू रागारागाने, गुरू बांकेईंच्या उजव्या बाजूला जातात.
“तुम्हाला लक्षात आलं की नाही माहित नाही” गुरू बांकेई शांतपणे म्हणाले
“तुम्ही माझं आज्ञापालन करत आहात आणि तुम्ही सभ्य देखील आहात. आता शांतपणे बसा आणि व्याख्यान ऐका”
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..