जपानच्या एका खेडेगावात इचिरो नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याला एक तरुण मुलगा होता जो शेताच्या कामात त्याला मदत करत असे आणि एक पाळीव घोडा. तो घोडा देखील शेतीच्या कामाला वापरला जात असे.
एके दिवशी सकाळी इचिरो घोड्याच्या तबेल्यात पाहतो तर तिथे घोडा नसतो! रात्रीच्या अंधारात घोडा पळून गेलेला असतो. ही बातमी गावात बऱ्याच जणांना समजते. त्या दिवशी संध्याकाळी इचिरोचा शेजारी शेतकरी त्याला भेटायला येतो.
“तुझा घोडा पळून गेल्याचं समजलं. वाईट झालं” शेजारी सांत्वनेच्या सूरात
“कदाचित!” इचिरो शांतपणे उत्तरतो
दुसऱ्या दिवशी अजब घडलं. पळून गेलेला घोडा परत आला आणि येताना स्वतःबरोबर आणखी तीन जंगली घोडे घेऊन आला! पुन्हा ही चमत्कारिक बातमी गावभर पसरते. पुन्हा एकदा शेजारी शेतकरी, या इचिरोला भेटायला येतो.
“वाह. कमाल आहे तुझा घोडा पळून गेला खरा पण येताना आणखीन तीन उमदे घोडे घेऊन आला. फारच चांगलं झालं नाही? वाह !” शेजारी शेतकरी उत्साहात
“कदाचित!” इचिरो शांतपणे उत्तरतो
दोन दिवसांनंतर इचिरोचा तरुण मुलगा तीन जंगली घोड्यांपैकी एकाला लगाम घालायचा आणि त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न करतो. घोडा उधळतो, मुलगा खाली पडतो आणि जखमी होतो. तरुण मुलाचा पाय मोडून तो जायबंदी होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शेजारी या इचिरोला भेटायला येतो.
“ऐकून फार वाईट वाटलं. बिचारा जायबंदी झालाय! वाईट झालं..” शेजारी काळजीने
“कदाचित!” इचिरो पुन्हा एकदा शांतपणे उत्तरतो
एक – दोन दिवसात गावात बातमी पोहोचते की राजाने शेजारी राज्याबरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि प्रत्येक तरुणाला सैन्यात भरती व्हावं लागणार आहे. सैन्याचे लोक एके दिवशी गावात येतात आणि बऱ्याच तरुणांना बळजबरीने सैन्यात सामील होण्यासाठी घेऊन जातात. पण पाय मोडला असल्या कारणाने इचिरोच्या मुलाला घेऊन जात नाहीत!
शेजारी शेतकरी काळजीने चौकशी करायला संध्याकाळी इचिरोकडे येतो. इचिरोच्या मुलाला घरीच पाहून त्याला बरं वाटतं.
“तू खूप नशीबवान आहेस..” इचिरोच्या खांद्यावर हात ठेवून शेजारी पटकन बोलला
आणि पुन्हा एकदा इचिरो शांतपणे उत्तरतो.. “कदाचित!”
तात्पर्य:
आयुष्यातली कुठलीही घटना पूर्णविराम नसतो. त्यामुळे चांगल्या घटनेमुळे अतिउत्साही होऊ नका आणि वाईट घटनेमुळे अतिदुःखी होऊ नका !
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..