वि स खांडेकर यांची कादंबरी वाचणे म्हणजे शब्द – भावनांच्या शांत तळ्यात पाय ठेवून वाङ्मयीन आनंदाचे क्षितिज बघण्यासारखे आहे. जळलेला मोहर ही कादंबरी मांडणी आणि विषय यांच्या बाबतीत, वि स खांडेकर यांनी लिहिलेल्या कादंबरींपैकी अत्यंत वेगळी आहे. शरीर आणि शरीराची भूक हे प्राणिजगतातील अत्यंत नैसर्गिक आणि मूलभूत विषय आहेत. अर्थातच माणूस देखील यापासून स्वत:ला दूर ठेवू शकत नाही. “शरीरसंबंध” या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर खांडेकरांनी अत्यंत सुंदर मांडणीमध्ये भाष्य केलेले आहे. विशेषतः ज्या काळात खांडेकरांनी हा विषय हाताळला आहे, ही एका अर्थाने सोज्वळ आणि बोथट विषयांच्या स्थापित चौकटींशी स्पष्ट पण सभ्य भाषेत केलेली बंडखोरी आहे. त्या काळात शरीर सुखाबद्दल सर्व बाजूंनी भाष्य करणे म्हणजे मोठे दिव्यच.
माझी एक सवय आहे. मी कुठलेही पुस्तक अथ पासून इति पर्यंत वाचतो. त्याच नेमाने मी जळलेला मोहर ही कादंबरी देखील वाचली. प्रस्तावनेबरोबर या कादंबरीच्या सुरुवातीला एका डॉक्टर सद्गृहस्थांचे पत्र छापलेले आहे. गम्मत म्हणजे या कादंबरीत त्यांच्याच नावाचे एक पात्र देखील आहे, डॉ. साने. अगदी खरं सांगायचं तर भारतीय समाज, संस्कृती आणि शरीर संबंध इत्यादींची बांधू पाहीलेली मोट मला विशेष पटली नाही. न पटण्याचे मुख्य कारण असे की त्यांनी भारतीय समाजात शरीर संबंधांबद्दल असलेले गैरसमज आणि taboo यांना केवळ तत्कालीन चष्म्यातून पाहीले गेले आहे. माझा अभ्यास हे सांगतो की कोणत्याही काळातील परिस्थिती ही त्या समाजाच्या भूतकाळाचा परिणाम असतो. पण डॉ. साने यांच्या पत्रात भारतीय समाजाने सहन केलेले सगळे आघात बाजूला ठेवून विश्लेषण केलेले आहे. तरीही मी सगळ्यांना हे पत्र निश्चितपणे वाचण्याचे सुचवेन.
मांडणीचा विचार केला तर कल्पना करा की “शरीर संबंध” हा केंद्रबिंदू आहे जिथून कथेचा सूत्रधार (protagonist) उभा आहे आणि कथेतील पात्रे मणी आहेत आणि कथा या सगळ्या पात्रांना बांधणारा धागा. प्रत्येक पात्राचा आपापल्या अनुभवांनुसार शरीर संबंधांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. कथेचा सूत्रधार कोणत्या ना कोणत्या कारणाने या पात्रांच्या आयुष्यात येतो आणि घटना काही अशा घडतात की पुढचे पात्र आपसूक समोर येते. वि स खांडेकर यांनी स्वत:च प्रस्तावनेत सांगीतले आहे की या कादंबरीच्या मांडणीची प्रेरणा त्यांना पिरँडेलो च्या “Six Characters In Search Of An Author” या नाटकावरून मिळाली आहे.
जळलेला मोहर चा सूत्रधार प्रथमपुरूष कथा लेखक आहे. ज्याने लिहिलेल्या एका कथेवरून कादंबरीची सुरुवात होते. आणि नंतर कादंबरीतील प्रत्येक पात्र आपल्या अनुभवांशी त्या कथेतील शरीर संबंधांबद्दल मांडलेल्या विचारांशी सांगड घालू लागते. त्यातून निर्माण होते एक माळ. गंमतीचा भाग म्हणजे खांडेकरांनी या सूत्रधाराला एखाद्या त्रयस्थ माणसासारखे दाखवले आहे. जो प्रत्येक पात्राच्या शारीरिक संबंधाबद्दल अनुभव आणि विचार ऐकून घेतो. या प्रक्रियेतूनच कादंबरी पुढे जाते. आणि अखेर लेखक आणि नाट्यमय घटनेने पुन्हा माळेच्या सुरुवातीला पोहोचतो. विशेष म्हणजे प्रत्येकाचे विचार त्याच्या किंवा तिच्या अनुभवानुसार आपल्याला योग्य वाटते!
अर्थातच ही माळ आणि हा धागा एकसूत्र ठेवण्यासाठी खांडेकरांना कथालेखनाचा निसर्गदत्त मुक्त प्रवाह बाजूला ठेवायला लागला असावा असे वाटते. कारण वास्तववादी कथेत अशी सगळी पात्रे नैसर्गिकरित्या समोर येत नाहीत. त्यामुळे ही कादंबरी मुक्त प्रवाही न वाटता मुद्दामहून केलेली कृत्रिम मांडणी वाटते. ही मला खटकलेली एक गोष्ट. अर्थात त्याच्यामुळे रसग्रहणात काहीसा फरक जाणवतो. पण खांडेकरांनी याबद्दल प्रस्तावनेतच कल्पना देऊन ठेवल्यामुळे त्यात काही वेगळे किंवा विचित्र वाटत नाही.
ही कादंबरी वाचल्यावर वाचकांना शरीर संबंध, शारीरिक भूक यांच्याबद्दल असलेल्या विचारांचे पुनरावलोकन केल्यावाचून स्वस्थता मिळणार नाही हे मात्र नक्की!