सुशि म्हणजेच सुहास शिरवळकर यांचा “मूड्स” हा कथासंग्रह म्हणजे खोल आणि अव्यक्त मानवी भावनांचा प्रवास आहे. जेव्हा पुस्तकांच्या रकान्यातून “मूड्स” उचलले तेव्हा त्याच्या मुखपृष्ठावरील चित्र पाहून थोडा स्तंभित झालो. सुशिंच्या पुस्तकावर असे चित्र असण्याची मी अपेक्षा केली नव्हती. पण हे चित्र बघितल्यावर एक गोष्ट तर निश्चित झाली की या पुस्तकातील कथा माझ्याही कल्पनांना आणि विचारांना असे मेंदूतून हळूहळू झिरपू देणार आहे. मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे चित्र पाहून मी जो एक पूर्वग्रह मनाशी धरला होता, तो सुशिंनी अगदीच खोटा ठरवला. थँक यू सुशि!
कथासंग्रह वाचताना मला एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता असते. ती म्हणजे या संग्रहात मला कुठे या कथांना जोडणारा धागा आहे का? आणि त्या धाग्याचे कथासंग्रहाच्या शिर्षकाशी काही संबंध आहे का? या उत्सुकतेनेच मी कुठलाही कथासंग्रह वाचू लागतो. सुशिंचा “मूड्स” हा कथासंग्रह नक्कीच एक धागा घेऊन येतो. नुसता येतोच असे नाही, पण तुमच्या भोवती अनेक अव्यक्त आणि सूक्ष्म भावनांचे वेष्टन निर्माण करतो.
या उत्तम संग्रहाची सुरुवात होते “कातळ पॉईंट” ने. आपल्याला वास्तव आणि कल्पना यांच्यातल्या सीमारेषा पुसून टाकाव्याशा वाटतात. पण काही घडून गेलेल्या घटना ज्या कधीकाळी वास्तव असतात, त्या जर पुनः पुन्हा घडत आहेत असं भासू लागलं तर कल्पना होतात. एका आगगाडीत सुरु होणारा हा “मूड्स”चा प्रवास पहिल्याच कथेत वास्तव, कल्पना, अकल्पित आणि त्या घटनांमागील भावना व कार्यकारण भाव यांच्यातल्या सीमारेषा पुसट करत जातो. मग, हा प्रवास कथांमधील पात्रांचा न राहता आपल्या अनुभवांच्या वाटांवरील आपल्याच प्रतिबिंबांचा होऊन जातो.
अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती बोलू लागतात आणि आपणही त्यांच्याशी संपर्क साधू लागतो. आपले दुर्दैव भोगणारा “नाईट डॉक्टर” असो वा आपल्या अशर्फीत अडकलेली “हुमा” असो आपणही त्या अस्तित्वहीन अस्तित्वाचे भाग होऊन जातो. पूर्वीच्या काळी जत्रेत त्या डब्यातून फिल्म दाखवायचे तसे आपण त्यांच्या कथा पाहू लागतो. स्वतःला प्रश्न विचारू लागतो. आपले अनुभव आणि भावना ढवळू लागतो. हे सुरु असतानाच “मरण-खेळ” सुरु होतो जो एक उत्तम कल्पनाविलास आहे. प्रत्येकाला लहानपण आवडते. प्रत्येकाला मनाला वाटेल तसे वागायचे असते. पण, जिवंतपणी तसे वागायला मिळाले नाही तर? उत्तर ही कथा वाचूनच समजू शकेल.
मग “संदेह” मृत्यूबद्दल एक विचित्र आणि गूढ आकर्षण असेलेले एक पात्र समोर येते आणि इथे हा संग्रह एक सूक्ष्म पण जाणवणारे वळण घेतो. अत्यंत अनाकलनीय पण कुठल्याही हॉलिवूड चित्रपटाला शोभेल असा “दुसरा परिचय”, अविश्वसनीय “सर्प-योग” आणि “अखेरच्या क्षणी” या कथा आपल्याला या गूढ प्रवासातली स्थानके म्हणून समोर येतात. स्थानके अशी जिथे आपण उतरत नाही पण त्या स्थानकावर गाडी तितकाच वेळ थांबते जितक्या वेळेत थोडे श्वास घेता येतील. आत्तापर्यंतच्या प्रवासाचा आणि “मूड्स” वाचताना मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचा, व्याख्यांचा, संदेहाचा आणि भावनिक लहरक्रिडेचा मागोवा घेता येईल. कारण नंतर हळूहळू गाडी मरणपश्चात मग मरण मग जन्म मरणाची सीमा ओलांडून “थ्री डायमेन्शनल” वास्तवात प्रवेश करते. भौतिक उपभोगामागे पळणारे वास्तव! पण, मी मुखपृष्ठावरील चित्र आणि त्या धाग्याबद्दल काय लिहिलंय ते विसरू नका!
आणि येते माझी सगळ्यात आवडती कथा “शमन”! मी स्वतः कनिष्ठ मध्यमवर्गीय विचारसरणी असल्यामुळे या कथेत मनाची, अपेक्षांची आणि प्रश्नांची सतत कुचंबणा किंवा कत्तल करणाऱ्या त्या माणसाशी मी खूप जास्त ‘रिलेट’ करू शकतो. त्याची न दिसणारी, न दाखवता येणारी, चौकटीबद्दल आयुष्याने केलेली गळेदाबी आणि मानसिक गळचेपी मनाचा ठाव घेऊन गेली. ही कथा वाचून अनेक दिवस झाले तरीही अजूनही त्या मध्यमवर्गीय सांसारिक पुरुषात मी कुठे ना कुठे स्वतःला पाहतोय!
“कातळ पॉईंट” वरून निघालेली ही गाडी एकदा अनामिक आणि अव्यक्त भावनांच्या भौतिक विश्वात आली की “भूतकालाचिये ठायी” मधील विस्तृत पण ओझे घेऊन आलेला भूतकाळ असलेले आबा असो, “शृंगार-क्षण” मधील आयुष्याच्या वास्तवात अडकलेली माँ यांच्या आयुष्यात विसावते. मग याच विश्वाच्या वेगवेगळ्या गडद आणि अतिवास्तववादी “मूड्स”ना छेदत ही गाडी “मु. पो. पर्यटन-तीर्थ”, “अंधारभूल” व शेवटी “जस्ट … हॅपनिंग” वर येऊन थांबते. यांच्या पुढे एकच स्टेशन राहिलेले आढळते. तेव्हाच अचानक जाणीव होते की हा प्रवास संपत आलेला आहे. ही शक्ती आहे सुशिंच्या लेखनाची.
आणि मग शेवटचे स्टेशन येते “देवाघरची फुले”! अत्यंत निरागसता, आयुष्याचा वास्तवाबद्दल अनभिज्ञ असते. उघड्या डोळ्यांनी मृत्यूबद्दल देखील असलेली निरागसता मानवी मानसिकतेबद्दल फक्त आणि फक्त करुणा घेऊन येते. ही कथा वाचल्यावर मी निःशब्द झालो. याचे कारण असे की कुठल्याही अंताबद्दल लहान मुले जितक्या निरागसतेने बोलतात तेवढे आपण बोलू शकत नाही. याचे कारण म्हणजे जगण्याचा मोह आणि अमरत्वाची स्वप्ने!
आता त्या धाग्याबद्दल बोलू. अर्थातच हा कथासंग्रह वाचनीय आणि संग्रहणीय आहे. माझ्या मते काही काही कथा पुनः पुन्हा वाचल्या जातील हे निश्चित. मला सापडलेला अव्यक्त आणि अदृष्य धागा म्हणजे, खोल, लपवून किंवा नकोसे केलेले “मूड्स” पुन्हा अंगावर आणि मनावर कपड्यांसारखे घेणे. अडगळीत टाकलेल्या विचारांना, दुर्लक्ष केलेल्या भावनांना आपल्या धमन्यांत वाहू देणारे “मूड्स” आणि त्यांचे वास्तवसंकेत दोलायमान करणारे झुले म्हणजेच “मूड्स स्विंग्स”!
हे पुस्तक नक्की वाचा आणि माझे हे मुक्त समालोचन कसे वाटले ते ही कळवा!