जपानमध्ये पूर्वी एक मोठे धर्मगुरू होते. त्यांचा एक शिष्य देखील होता. त्याला गुरूंबद्दल भरपूर आदर होता. त्याला झेन तत्त्वज्ञान शिकण्याची आणि त्या मार्गावर चालण्याची खूप इच्छा होती. तो सगळ्या गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी गुरूंच्या वागण्या बोलण्याकडे बघत असे आणि त्यातून शिकायचं प्रयत्न करत असे.
एकदा पावसाळ्याच्या दिवसात गुरू आणि हा शिष्य एका चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून चालत होते. दूर रस्त्याच्या कडेला एक १४-१५ वर्षांची मुलगी आपला किमोनो पोशाख हाताने घोट्यांच्या वर धरून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती.
जसे गुरू आणि शिष्य त्या मुलीच्या जवळ आले तसे, तिच्या चेहऱ्यावरचे भाव गुरूंनी ओळखले. ते काहीही न बोलता मुलीजवळ गेले. तिला अलगद उचललं आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ठेवलं. शिष्य हे सगळं बघून स्तंभित झाला कारण झेन पंथ पाळणाऱ्या भिख्खूंनी स्त्रीला स्पर्श करणं वर्ज्य असतं.
शिष्य तेव्हा काहीही बोलला नाही पण हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. पुढील महिना दोन महिने तो सतत याच विचारात होता की ‘गुरूंनी असं का केलं? धर्म का मोडला?’.
त्याला झोप लागत नव्हती, सतत याच प्रश्नाने तो वेढलेला असे. त्याचे ध्यानात लक्ष लागत नव्हते आणि त्याच्या मनाची चलबिचल गुरू बघत होते.
एके दिवशी गुरू त्याला विचारतात की ‘काय झालंय?’
‘एक प्रश्न पडलाय ज्याचं उत्तर मिळत नाहीये’, शिष्य जरा घाबरून म्हणतो
‘विचार’ गुरू शांत आणि गंभीर आवाजात
‘त्या दिवशी तुम्ही त्या मुलीला उचललं, स्त्रीला स्पर्श केला’ शिष्य थोडा अडखळतो आणि हात जोडून गप्प होतो. त्याची मान खाली असते
गुरू डोळे मिटतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटतं. शिष्य अजून हात जोडून मान खाली घालून बसलेला आहे. एक श्वास घेऊन त्याच स्मिताप्रमाणे आश्वासक आणि शांत आवाजात सांगतात
‘मी तिला उचललं खरं पण त्याचं ओझं तू अजूनही वाहत आहेस’ आणि गुरू शांत झाले.
तात्पर्य:
करणारा माणूस एखादी गोष्ट करून मोकळा होतो. पण आपण त्याचा विचार करत बसतो व आपला वेळ आणि शक्ती विनाकारण खर्च करत बसतो. त्यापेक्षा जे घडलं ते वास्तव समजून पुढे गेलं की भूतकाळ तुम्हाला चिकटून राहत नाही.
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..