आभार कुणी कुणाचे मागायचे?..
पूर्वी उमेझा नावाचा एक धनाढ्य व्यापारी होता. त्याला दानधर्म करायचा नाद होता. त्याच्या गावात एक शियेत्सु नावाच्या झेन गुरूंचा मठ होता. उमेझाच्या मनात आले की आपण या शियेत्सु गुरूंना काही पैसे दान करू, म्हणजे ते अजून मोठा मठ बंधू शकतील.
असा,विचार करून उमेझा, सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या मोठ्या थैल्या घेऊन शियेत्सु गुरूंच्या मठात जातो. शियेत्सु ध्यानसाधनेत गर्क असतात. उमेझा नाण्यांनी भरलेल्या थैल्या गुरूंसमोर ठेवतो आणि म्हणतो
“हे घ्या गुरूजी, तुम्हाला नवीन मठ बांधण्यासाठी”
उमेझाचे उद्गार ऐकून शियेत्सु गुरू एकदा डोळे उघडतात, थैल्यांकडे बघतात आणि “ठीक आहे” दाखवण्यासाठी मान हलवतात आणि पुन्हा आपल्या ध्यानसाधनेत गर्क होतात.
उमेझाला गुरूंचं वागणं थोडं विचित्र वाटतं आणि त्यांचं विशेष उत्तर न देणं त्याला आवडत नाही. जरा गर्विष्ठ स्वरात तो पुन्हा उद्गारतो
“या थैल्यांमध्ये, पुढचं वर्षभर ५० लोकांना पुरतील एवढे पैसे आहेत”
शियेत्सु गुरू, पुन्हा डोळे उघडतात आणि म्हणतात
“मग, मी तुझे आभार मानू म्हणतोस?!”
“अर्थात! एवढी मदत केल्यावर माझी आभाराची अपेक्षा रास्तच आहे”, उमेझा थोडा चिडून उत्तर देतो.
शियेत्सु गुरू उत्तरात
“आभार !? मी का आभार मानू? खरं तर देण्याऱ्याने घेणाऱ्याचे आभार मानले पाहिजेत”
आणि असं उत्तर देऊन शियेत्सु पुन्हा एकदा डोळे मिटून आपल्या ध्यानसाधनेत लीन होऊन जातात!
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..