ज्ञानाची वाट निसरडी असते, प्रत्येक पाऊल जपून ठेवले पाहिजे.
साकीतो नावाचे एक झेन गुरू होते. लोक त्यांना Stonehead म्हणत. याला कारण त्यांचे केस नसलेले डोके आणि त्यांची खडकावर बसून एखाद्या स्थिर खडकाप्रमाणे ध्यानसाधनेची सवय.
एकदा एका झेन अनुयायाने, अजून एक गुरू मा त्सु यांच्याकडे, गुरू साकीतो यांना आव्हान द्यायची ईच्छा व्यक्त केली.
मा त्सु शांतपणे म्हणाले
“ही वाट खूप निसरडी आहे, सांभाळून चाल”
अनुयायी गर्वाने म्हणाला
“हरकत नाही. माझ्याकडे देखील अवघड वाटेल तोल सांभाळेल अशी काठी आहे जशी एखाद्या डोंबाऱ्याच्या हातात असते”
आणि साकीतो गुरू ज्या खडकावर ध्यान करत बसले होते तिथे जातो. वाट थोडी वेडीवाकडी असते. पण, शेवटी तो अनुयायी साकीतो बसले होते त्या खडकावर पोहोचतो. साकीतो अत्यंत स्थिर होते. अनुयायी अचानक काठी फिरवून आरडा ओरडा करू लागतो. काही वेळ आरडा ओरडा करून झाल्यावर, अनुयायी साकीतो गुरूंसमोर उभा राहतो आणि त्यांना विचारतो
“मी आत्ता जे काही केलं त्याचं मर्म सांगू शकता का?”
साकीतो गुरू हळुवारपणे डोळे उघडतात आणि कुठलीही हालचाल अथवा चेहऱ्यावरील हावभाव बदलता म्हणतात
“दुःखद, दुःखद”, आणि पुन्हा डोळे मिटून घेतात.
अनुयायी निरुत्तर होतो आणि गुरू मा त्सु यांच्याकडे जातो व जे काही घडलं ते सांगतो. मा त्सु गुरू, अनुयायाला म्हणतात
“तू पुन्हा साकीतो गुरूंच्या इथे जाऊन पुन्हा तेच सर्व कर. जसच्या तसं आणि जेव्हा साकीतो गुरू पुन्हा एकदा ‘दुःखद दुःखद’ म्हणतील तेव्हा तू रडायला सुरुवात कर”
अनुयायी पुन्हा एकदा साकीतो गुरूंकडे जातो आणि पुन्हा एकदा आधीप्रमाणे वागतो. पण , आरडाओरडा करून झाल्यावर अनुयायी जेव्हा पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो तेव्हा साकीतो गुरू आपल्या चेहऱ्यावर हात नेऊन रडू लागतात!
अनुयायी पुन्हा एकदा निरुत्तर होतो आणि मा त्सु यांच्याकडे जातो आणि घडलेलं सगळं सांगतो.
मा त्सु हसतात आणि अनुयायाला उद्देशून म्हणतात
“मी आधीच सांगितलं होतं, ही वाट निसरडी आहे!”
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..