झेन गुरू हाकुईन हे एक अत्यंत साधे, सरळ व स्वच्छ चारित्र्याचे म्हणून सर्वदूर प्रसिद्ध होते.
त्यांच्या घराच्या शेजारी एका भाजीवाल्याचे घर होते. भाजीवाल्याला एक सुंदर तरुण मुलगी होती. एके दिवशी अचानक भाजीवाला आणि त्याच्या बायकोला समजतं की त्यांची मुलगी गरोदर आहे! भाजीवाला आणि त्याची बायको अत्यंत रागावतात आणि तिला गर्भातील मुलाचा बाप कोण आहे विचारतात. मुलगी काही केल्या नाव सांगत नव्हती.
बरेच दिवस तसेच जातात. भाजीवाला आणि त्याची बायको रोज मुलीला त्या माणसाचं नाव विचारत होते. पण, मुलगी काही केल्या, मुलाच्या बापाचे नाव सांगत नव्हती. तेव्हा भाजीवाल्याने जबरदस्ती केल्यावर मुलगी हाकुईन यांचे नाव घेते. भाजीवाल्याला अत्यंत राग येतो.
भाजीवाला रागारागाने हाकुईन कडे जातो आणि सगळं सांगतो
“खरंच का!?” झेन गुरू हाकुईन एवढंच उत्तर देतात.
भाजीवाला आला तसा निघून जातो.
काही दिवसांनी भाजीवाल्याची मुलगी एका मुलाला जन्म देते. भाजीवाला त्या बाळाला घेऊन हाकुईन कडे जातो. या बातमीमुळे झेन गुरू हाकुईन यांना सगळ्यांनी वाळीत टाकलेलं होतं. भाजीवाला बाळाला देताना म्हणतो
“हे तुमचं मूल आहे”
“खरंच का !?” म्हणत हाकुईन त्या बाळाचा सांभाळ करायची जबाबदारी घेतात.
जवळजवळ एक वर्षानंतर भाजीवाल्याची मुलगी, मुलाच्या बापाबद्दल खोटं बोलल्याचं मान्य करते. ती सांगते की मच्छीमारांच्या वसाहतीमधील एक तरुण त्या मुलाचा बाप आहे. भाजीवाला आणि त्याची बायको फार खजील होतात. हात जोडून माफी मागण्यासाठी हाकुईन गुरूंकडे जातात.
गेलं एक वर्ष झेन गुरू हाकुईन त्या बाळाचा सांभाळ करत होते. लोकांची घृणा आणि लांच्छन, अत्यंत शांतपणे सहन करत होते. त्यांच्या मनात जराशीही कटुता नव्हती. भाजीवाला आणि आणि त्याची बायको झेन गुरु हाकुईन यांच्या पाय पडतात आणि सांगतात
“आम्हाला माफ करा. आमची मुलगी खोटं बोलली. या मुलाचा बाप दुसराच कोणीतरी आहे.”
“खरंच का !?” बाळाला सुपूर्त करताना झेन गुरू हाकुईन एवढंच म्हणाले!
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..