December 9, 2024
झेन कथा मराठीत – अतृप्त माणूस (More Is Not Enough) Rock and Man , Image by Free-Photos from Pixabay

झेन कथा मराठीत – अतृप्त माणूस (More Is Not Enough)

Spread the love

एक दगड फोडून आपले पोट भरणारा माणूस स्वतःच्या परिस्थितीवर अत्यंत दुःखी होता. त्याला सतत वाटत असे की आपण सामर्थ्यवान व्हावं.

एकदा बाजारातून जात असताना तो एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या दाराशी उभा राहतो. दारातून अनेक धनाढ्य आणि इतर मान मरातब असलेले लोक त्या व्यापाऱ्याला भेटायला येत जात होते. व्यापारी स्वतः सुंदर अशा बंगल्यात उंची कपडे घालून बसलेला होता. दगड फोडणाऱ्याला वाटलं, हा व्यापारी किती सामर्थ्यवान आहे! मी हा व्यापारी झालो तर!?

आणि आश्चर्य म्हणजे, एका क्षणात तो दगड फोडणारा एक धनाढ्य व्यापारी बनतो. पैसे अडका भरपूर येतो. पण त्याचबरोबर इतर व्यापाऱ्यांची ईर्षा आणि सामान्य लोकांची घृणा त्याला सहन करावी लागते. त्याला वाटतं याच्याही पेक्षा सामर्थ्य मिळालं पाहिजे.

या विचारात असतानाच त्याला आपल्या अवाढव्य वाड्याच्या दारातून एक राजदरबारातला अधिकारी खुर्चीच्या मेण्यातून जाताना दिसतो. सगळे लोक त्याला मान देत होते, मुजरा करत होते, माना झुकवत होते. व्यापारी मनातल्या मनात विचार करतो, असं सामर्थ्य हवं. मी जर असा राजदरबारातला अधिकारी झालो तर?

पुन्हा एकदा एका क्षणात हा व्यापारी, राजदरबारातला एक सामर्थ्यवान अधिकारी बनतो. मान मरातब, पैसे सगळं मिळतं. पण त्याच बरोबर लोक आता त्याला घाबरू लागतात, त्याला टाळू लागतात आणि त्याच्यापासून दूर जाऊ लागतात. अधिकारी होतो. उन्हाळ्याचे दिवस असतात. अधिकारी खुर्चीच्या मेण्यातून जात असतो. उन्हाने त्याला घाम फुटतो, कपडे भिजून अंगाला चिकटू लागतात. तो वर बघतो. त्या तेजस्वी सूर्याकडे बघत स्वतःला म्हणतो ‘मी इतका मोठा अधिकारी पण माझ्याहून जास्त सामर्थ्य तर सूर्याकडे आहे’

तो हा विचार करणार तेवढ्यात तो अधिकारी सूर्य बनतो. सूर्य बनून अगदी अभिमानाने स्वतःची किरणे सर्वदूर फेकतो. गाडगी तेजाने उजळून निघतो. सूर्याला स्वतःचं सामर्थ्य पाहून बरं वाटतं. पण दुष्काळामुळे आणि उकाड्यामुळे आता लोक त्याला नावे ठेवू लागतात. सूर्याला पुन्हा वाईट वाटतं. तेव्हढ्यात कुठूनसा एक भला मोठा काळा कुट्ट ढग येतो आणि सूर्याला झाकून टाकतो.
सूर्य मनात विचार करतो, मी इतका सामर्थ्यवान पण माझ्याहून जास्त सामर्थ्य तर या ढगाकडे आहे!

क्षणार्धात सूर्य मेघ बनतो. आता हा ढग सगळं आकाश व्यापून टाकतो आणि पृथीवर मनसोक्त पाऊस पाडतो. आपलं सामर्थ्य बघून मेघाला बरं वाटतं. पण पुरामुळे पुन्हा एकदा त्याला लोकांचे शिव्याशाप ऐकावे लागतात. मेघाला जरा वाईट वाटतं. इतक्यात सोसाट्याचा वारा सुटतो आणि त्या अजस्त्र ढगाला बाजूला सारतो. ढगाला वाटतं वाऱ्यासारखं सामर्थ्य पाहिजे.

गमितचा भाग म्हणजे आता तो ढग वारा बनतो आणि सगळीकडे प्रचंड वेगाने वाहू लागतो. पृथ्वीवर वादळ आणतो. घरांची कौले, छपरे, झाडे, वस्तू, पाने सगळं काही उडवून लावतो. सगळीकडे हाहाकार उडतो. लोक दुःखी होतात पण वारा थांबत नाही. वाऱ्याला वाटतं आपणच खरे सामर्थ्यवान!

पण तेवढ्यात वाऱ्याला एक प्रचंड मोठा दगड, एक खडक दिसतो. वारा त्या दगडावर वादळाचा काहीच परिणाम झाला नाही म्हणून खजील होतो. त्याला वाटतं खरं हा खडकच खरा सामर्थ्यवान. इतकं वादळ येऊन देखील त्याला काहीच झालं नाही. असं सामर्थ्य मिळायला हवं!

एका क्षणात तो वारा एक अजस्त्र दगड बनतो आणि एका ठिकाणी स्थिरावतो. आता त्याला खात्री पटू लागते की आपणच खरे सामर्थ्यवान. ना वारा, ना वादळ, ना पाऊस आणि ना ऊन आपल्याला काही करू शकतो. डोळे मिटून स्वतःशीच हसतो. तेवढ्यात त्याला कुठून तरी छिन्नी आणि हातोडीने कोणीतरी दगडावर आघात करण्याचा आवाज येतो. कोण आहे म्हणून तो खाली बघतो तर त्या दगडाच्या पायाशी एक डाग फोडणारा आपल्या अवजारांनी त्या दगडाचे तुकडे पाडत असतो!

तात्पर्य:
माणूस स्वतःकडे जे आहे त्यात कधीच समाधानी राहत नाही. दुसर्यांकडे असलेल्या गोष्टींमुळे ईर्षा करतो.

आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.. 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *